शहरातील वाहतुकीचा बोजवारा वाजला असून, मध्यवर्ती भागातील चौकात आणि जुन्या वस्त्यांमधील रस्त्यांवर पायी चालणे जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील रस्ता वाहतूक प्राधिकरणाने शहरात थांबे निश्चित केले असले तरी टप्पा वाहतूक करणारे चारचाकी आणि तीन चाकी वाहने थांब्यावरच थांबतील याचा काही नेम नाही. कुणीही पायी चालताना दिसला की, हे ऑटोचालक लगेच त्याच्या मागावर असतात. वर्दळीच्या चौकात पायी चालणारी प्रत्येक व्यक्ती आपला ग्राहक समजून त्या व्यक्तीला तेथेच गाठण्याचा ऑटोरिक्षा चालकांचा प्रयत्न असतो. याशिवाय शहरात चारचाकी आणि तीन चाकी अवैध वाहने येत आहेत. त्यामुळे चौकात वाहतुकीची कोंडी निर्माण होते. अनेकदा अपघातही होतात.
शहरात सध्या २८५ थांबे देण्यात आले आहेत. या थांब्यांवर किती वाहने एकाचवेळी उभी राहतील, याचे नियम आहेत. परंतु या नियमाचे कुठेही पालन होताना दिसत नाही. शहर बस आणि ऑटोरिक्षा एकाच ठिकाणी उभे असल्याचे चित्र आहे. शिवाय अनेक चौकातून चारचाकी वाहनातून अवैध वाहतूक होत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी डोळेझाक केली आहे. या अवैध वाहतुकीतून वाहनचालकांमध्ये बऱ्याचवेळा हाणामारी देखील झाली आहे. सक्करदरा चौक आणि छत्रपती चौकात अशा वाहनांची रीघ लागलेली दिसते. व्हरायटी चौक तसेच मोर भवन बस स्थानकापासून गिट्टी खदान मार्ग तसेच कामठी मार्गावर परवाना नसूनही चारचाकी वाहने धावत आहेत.
दरम्यान, शहराचा वाढता आकार आणि वाहतूक समस्या बघता आणखी ४० थांबे देण्याचा प्रस्ताव आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. रस्ता वाहतूक प्राधिकरण केवळ थांबे निश्चित करीत असते. अवैध वाहतुकीवर नियंत्रण आणण्याचे काम वाहतूक पोलिसांचे आहे, असेही ते म्हणाले. यासंदर्भात शहर वाहतूक पोलीस उपायुक्त भरत तांगडे यांच्याशी संपर्क साधला असता सुटीवर असल्याचे सांगितले.
शहरातील झांशी राणी चौक, व्हरायटी चौक, गणेशपेठ बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात वाहतुकीची भयंकर कोंडी दर दिवसाला अनुभवायला मिळते. शहराची लोकसंख्या आणि शहर बस व्यवस्था तसेच शहरी ऑटोरिक्षा यांच्या व्यतिरिक्त अनेक खासगी चारचाकी आणि तीन चाकी अवैध वाहतूक शहरात सुरू आहे. यामुळे अनेक चौकात आणि काही मागार्ंवर वाहतूक कोंडी होते. अशा वाहतुकीमुळे अपघात होत आहेत.
शहरात आणखी
४० थांबे देणार
शहरात आणखी ४० देण्याचा प्रस्ताव आहे. वाहतुकीची कोंडी रोखण्याचे काम शहर वाहतूक पोलिसांचे आहे. वाहनांची तपासणी आर.टी.ओ. करतात. परंतु मनुष्यबळ कमी असल्याने याचे प्रमाण निश्चित कमी आहे.
– रवींद्र चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,
नागपूर (शहर)
अवैध वाहतूक
अमरावती मार्ग-व्हरायटी चौक-महाराज-लॉ कॉलेज-रवीनगर कॅम्पस. – हिंगणा मार्ग-झांशी राणी चौक, ते सुभाषनगर, हिंगणा रोड टी-पाईंट – रामेश्वरी मार्ग-यशवंत स्टेडियम, ते रामेश्वरी बस स्टॉप. – मानेवाडा मार्ग- यशवंत स्टेडियम, ते मानेवाडा. – कोराडी मार्ग-साधुवासवानी चौक, ते कोराडी. – काटोल मार्ग-साधुवासवानी चौक ते गिट्टीखदान. – नंदवनमार्ग-मुंजे चौक ते जाधव चौक बस स्टॉप. – गणेशपेठ बस स्टँड मार्ग- झांशी राणी चौकातील पेट्रोल पम्प ते गणेशपेठ बसस्टँड.