एका अज्ञात तरूणाचा खून करून धडावेगळे केलेले शिर मंगळवेढा तालुक्यात विहिरीत सापडून नऊ महिने उलटले तरी या प्रकरणाचा छडा लागत नसल्याने पोलीस तपास यंत्रणेने गुन्ह्य़ाची उकल होण्यासाठी प्लॅस्टिक ऑफ पॅरिसच्या साह्य़ाने मृताचा हुबेहूब चेहरा तयार केला आहे. त्यासाठी पुण्याच्या तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. अशा प्रकारे खून प्रकरणातील मृताची ओळख पटण्यासाठी तसेच मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्य़ात प्रथमच या कलातंत्राचा वापर करण्यात आला आहे.
नऊ महिन्यापूर्वी म्हणजे १८ एप्रिल २०१३ रोजी जुनोनी गावच्या शिवारात दामू आनंदा इंगोले यांच्या शेतातील विहिरीत ३० वर्षांच्या एका अज्ञात तरूणाचा खून करून त्याचे धडावेगळे केलेले शिर टाकून देण्यात आल्याचे आढळून आले होते. हे शिर एका पिशवीत होते. पिशवीवर ‘देहू तीर्थक्षेत्र’ असा मजकूर होता. मंगळवेढा पोलिसांनी मृताची ओळख पटविण्याचा व त्या आधारे मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यास यश आले नाही.
यासंदर्भात मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या खूनप्रकरणाचा छडा लावण्यासाठी मृताचा चेहरा प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यक विभागप्रमुख डॉ. भोई यांची भेट घेऊन त्यांचा अभिप्राय घेतला गेला. त्यानंतर पुण्यातील भारतीय कॉलेज ऑफ फाईन आर्टमधील तज्ज्ञ गिरीश चरवड यांच्याकडे मृताचे डिजिटल रेखाचित्र काढले. चरवड यांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या साह्य़ाने मृताचा चेहरा असलेले शिर हुबेहूब तयार केले. यात सुपर इंपोझिशन प्रक्रिया केल्याचे पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी सांगितले. खुनाच्या गुन्ह्य़ाचा तपास होण्यासाठी सोलापूर जिल्ह्य़ातील हा पहिलाच प्रयोग असून पुण्यात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याकांडातील मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी या तंत्राचा उपयोग केला गेला. त्यासाठी चरवड यांची मदत घेण्यात आल्याचेही कोळेकर यांनी नमूद केले.