पिस्तुलाचा धाक दाखवून एका लोखंड व्यापाऱ्याला ५० लाख रुपये खंडणी मागितल्याच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी कुख्यात आरोपी राजू भद्रे व त्याच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली. राजू भद्रे मात्र फरार आहे. न्यायालयाने दोघांना १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राजू भद्रे, किरण कैथे, अयुब खान, शेख मुस्ताक अहमद, हिरालाल नामदेव तुपकर व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी किरण कैथे व हिरालाल तुपकर या दोघांना अटक केली. गिरधारी सोहनलाल अग्रवाल (५५), रा. पूर्व वर्धमाननगर, असे फिर्यादीचे नाव असून त्यांचे शास्त्रीनगरात अनंत स्टील नावाचे कार्यालय आहे. अग्रवाल यांनी शंकर पुसाराम मलघडे व त्यांच्या नातेवाईकांकडून १९९९ मध्ये वाठोडा येथे सतरा भूखंड खरेदी केले. तेथे त्यांच्या नावाचा फलकही लावला होता. २४ ऑगस्ट २००८ रोजी शेख मुस्ताक अहमद याने ३० ते ३५ साथीदारांसह या जमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. अग्रवाल तेव्हा छत्तीसगडमध्ये होते. ज्याने त्यांना हे कळविले त्यालाच त्यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले. पोलीस तातडीने वाठोडा येथे पोहोचल्याने शेख मुस्ताकचा जमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न फसला.
गेल्या ऑक्टोबर २०१३ मध्ये अग्रवाल हे कार्यालयात बसले असताना आरोपी राजू भद्रे, किरण कैथे, अयुबखान, शेख मुस्ताक अहमद, हिरालाल तुपकर हे त्यांच्या साथीदारांसह तेथे आले. आरोपींनी ही जमीन विकत घ्यायची असल्याचे सांगितले. अग्रवाल यांनी जमीन विकावयाची नाही, असे त्यांना म्हटले. आरोपी राजू भद्रे याने अग्रवाल यांच्या टेबलावर पिस्तूल ठेवले. ऐकले नाहीत तर गेम करेल, अशी धमकी दिली. इतर आरोपींनी अग्रवाल यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. अग्रवाल ऐकत नसल्याचे पाहून ही जमीन सोडायची नसेल तर ५० लाख रुपये द्यावे लागतील, जमिनीचा ताबा घेतला जाईल, अशी धमकी देत आरोपी निघून गेल्याची तक्रार अग्रवाल यांनी केली. काही दिवसांनंतर अग्रवाल यांचा मुलगा वाठोडा येथे गेला असता भूखंडावर शेख मुस्ताक अहमद व तुपकर यांचा मालकी हक्क असलेला फलक त्याला दिसला. तेथील तारेचे कुंपणही व सिमेंटचे खांबही नव्हते. नंदनवन पोलिसांनी मंगळवारी रात्री आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली.
घटना घडल्यानंतर भीतीमुळे गप्प होतो. मात्र, अनेक भूमाफियांवर गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर कडक कारवाई होत असल्याने घटना घडल्यानंतर सहा महिन्यांनंतर तक्रार नोंदवित असल्याचे अग्रवाल यांनी पोलिसांना सांगितले. या घटनेने खळबळ उडाली. पिंटू शिर्के हत्येप्रकरणी न्यायालयाने राजू भद्रे, किरण कैथेसह इतर आरोपींना जन्मठेप सुनावली आहे. राजू भद्रे व कैथे काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटून आले आहेत. आरोपी किरण उमराव कैथे (रा. भांडे प्लॉट) व हिरालाल नामदेव तुपकर (रा. हिवरी नगर) या दोन आरोपींना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. या दोघांसह राजू भद्रे व टोळीच्या गुन्हेगारीचा आलेख न्यायालयासमोर मांडला. या आरोपींना अटक, पिस्तूल व इतर सामान जप्त करायचे असून त्यासाठी दोन आरोपींना १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील शांतीलाल जयस्वाल यांनी न्यायालयाला केली.
ज्या काळात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे त्याच्या एक महिन्यापूर्वीपासून आरोपी किरण कैथे कारागृहात होता. राजू भद्रे याच्याविरुद्ध सुरू असलेल्या खून खटल्याच्या सुनावणीसाठी नियमितपणे न्यायालयात हजेरी लावत होता. त्यामुळे फिर्यादीला धमकी देऊन खंडणी उकळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. फिर्यादी हा जमिनीचा मालक नसून हिरालाल तुपकरच आहे. खंडणी मागण्याचे हे प्रकरणच बनावट असल्याचा दावा करीत आरोपींचे वकील प्रफुल्ल मोहगावकर व उदय डबले यांनी आरोपींना पोलीस नव्हे तर न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला केली. सरकार व बचाव पक्षांच्या वकिलांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपी किरण व हिरालाल या दोघांना १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
संग्रहित लेख, दिनांक 14th Mar 2014 रोजी प्रकाशित
लोखंड व्यापाऱ्याला खंडणी मागणाऱ्या दोघांना कोठडी
पिस्तुलाचा धाक दाखवून एका लोखंड व्यापाऱ्याला ५० लाख रुपये खंडणी मागितल्याच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी कुख्यात आरोपी राजू भद्रे व त्याच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली.
First published on: 14-03-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two peoples arrested demanding extortion from metal trader