स्वपक्षातील नेत्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल वरिष्ठांकडे तक्रार करून झाली, विरोधी पक्षांनी असुरक्षित नगरसेविकांची पाठराखण करीत महापौरांना पालिका सभागृह तहकूब करण्यास भाग पाडले. मात्र या प्रकरणाची ‘मातोश्री’ने अजूनही दखल घेतलेली नाही. उलटपक्षी असुरक्षित नगरसेविकांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास बंदी करण्यात आली आहे. वर या नगरसेविकांना त्रास देणाऱ्या नेत्याला पाठीशी घालण्याच्या जोरदार हालचाली शिवसेनेत सुरू झाल्या आहेत. कंत्राटदारांना धमकावून या नगरसेविकांच्या विरोधात उभे करण्याचा कुटील डाव रचण्यात आला आहे. त्यातच पक्षप्रमुखांनीही अद्याप या नगरसेविकांना भेट देऊन त्यांची बाजू ऐकण्याचे कष्ट घेतलेले नाहीत.
स्वपक्षीय नेत्याकडून कामात अडथळा आणला जात असल्याने माजी महापौर शुभा राऊळ, आपल्या ताटाखालचे मांजर होण्यास तयार नसल्याने मोबाईल क्रमांक शौचालयात लिहून त्रास दिलेल्या शिवसेना नगरसेवक शीतल म्हात्रे, एका नेत्याच्या समर्थकाचा स्टॉल हलविण्याचा आग्रह धरणाऱ्या भाजप नगरसेविका मनीषा चौधरी यांना फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नेत्याविरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा आणि मनसेच्या नगरसेविकांनी गोंधळ घालून दोन दिवस पालिका सभागृह तहकूब करण्यास महापौरांना भाग पाडले होते.
महापौरांच्या दालनात गाऱ्हाणे मांडणाऱ्या नगरसेविकांचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून मोबाईलवर छायाचित्रण केले. त्यामुळे चवताळलेल्या नगरसेविका त्यांच्या अंगावरही धावून गेल्या. पण घोसाळकर यांना जाब विचारण्याचे धारिष्टय़ शिवसेनेच्या एकाही पदाधिकाऱ्याने दाखविले नाही. ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी असुरक्षित नगरसेविकांना भेटण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही भेट अद्याप झालेली नाही.
आपली तक्रार करणाऱ्या नगरसेविकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न या नेत्याने सुरू केले आहेत. त्यासाठी कंत्राटदारांना हाताशी धरण्यात येत आहे. ‘नगरसेविका आपल्याकडे पसे मागतात, अशी तक्रार करा’, असा दबाव कंत्राटदारांवर आणण्यात येत आहे. तसेच नगरसेविकांना मदत करणाऱ्या पक्षातील कार्यकर्त्यांनाही धमकावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.
इतकेच नव्हे तर तडकाफडकी उपशाखाप्रमुखही बदलण्यात आले. मनीषा चौधरी यांनी केलेल्या तक्रारीमुळे संतापलेल्या या नेत्याने काँग्रेसचे खासदार आणि मनसेच्या आमदाराची भेट घेऊन आगामी निवडणुकीमध्ये भाजपची कोंडी करण्यासाठी व्यूहरचना आखल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ‘हे गणपती (नगरसेविका) पाच वर्षांनी बुडवायचे आहेत. ‘मातोश्री’ही आपले काही वाकडे करू शकत नाही.’, अशा बढाया हा नेता आपल्या समर्थकांकडे मारत आहे.

घोसाळकरांविरुद्ध एफआयर दाखल करण्याची मागणी
महापौर दालनात गाऱ्हाणे मांडणाऱ्या नगरसेविकांचे मोबाइलवर छायाचित्रण करणारे शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी करीत सर्वपक्षीय नगरसेविकांनी आर-मध्य आणि आर-दक्षिण प्रभाग समितीचे कामकाज सोमवारी बंद पाडले. शिवसेना-भाजप युतीच्या नगरसेविकांची अवहेलना करणाऱ्या नेत्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका संध्या दोशी यांनी बैठकीत मुद्दा उपस्थित केला. त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दर्शविला आणि घोसाळकर यांचा निषेध करीत बैठक तहकूब करण्याची मागणी केली. प्रभाग समिती अध्यक्ष मनीषा चौधरी यांची मागणी मान्य करीत बैठक तहकूब केली.