कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे यांची ग्वाही ; ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट

लोकप्रिय निर्णय घेऊन प्रसिद्धीचा झोत स्वत:वर ओढवून नंतर कटकट मागे लावून घेण्यापेक्षा विद्यापीठाच्या कमकुवत बाजू बळकट करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी जीर्ण विषय बाजूला ठेवून परीक्षा पद्धतीत येत्या दोन वर्षांत सुधारणा करणार असल्याची ग्वाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ काणे यांनी दिली. कुलगुरूंनी गुरुवारी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन मनमोकळ्या गप्पा केल्या.  
येत्या दोन वर्षांत ५०: ५० ही परीक्षा पद्धत लागू करण्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. त्यासाठी आलेल्या आणि पुढे येणाऱ्या सूचनांचा अभ्यास करणार आहे. दोन महिने त्याचा अभ्यास करून नंतर काही निर्णयापर्यंत येता येईल. हे वर्ष विद्यापीठाच्या निवडणुकीत जाणार असल्यामुळे प्राधिकरणे गठीत व्हायला पुढील वर्ष उजाडेल. लोकशाही मार्गाने या परीक्षा पॅटर्नवर चर्चा झाल्यानंतरच तो लागू करेपर्यंत दोन वर्षेतरी लागतील. त्यासंबंधीचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन विद्यापीठाच्या संकेतस्थळावर करणार असून विद्यमान परीक्षा पद्धतीचे फायदे-तोटे आणि नवीन पद्धतीचे फायदे-तोटे त्यात दाखवले जाईल. यापेक्षा कोणाला वेगळी व्यवस्था सुचवायची असेल तर सुचवावी, असे आवाहन डॉ. काणे यांनी केले.
प्राध्यापकांवर या परीक्षा पद्धतीचा भार वाढेल, हा कांगावा असल्याचे स्पष्ट करीत डॉ. काणे म्हणाले, आताच्या घडीला प्राचार्य मूल्यांकनासाठी पाठवत नाही. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावावी लागते. ती वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यापेक्षा ५०: ५० पद्धतीत वस्तुनिष्ठ प्रश्न राहतील. विद्यार्थ्यांमागची एटीकेटी, जंपिंग, कॅरिऑन सारखी डोकेदुखी बंद होईल. पेपर सेटिंगसाठी शिक्षकांची आवश्यकता भासणार नाही. स्पॉट व्हॅल्युएशन केंद्र बंद पडतील. यापद्धतीत विद्यापीठावरील पुनर्मुल्यांकनाचा भार कमी करता येईल आणि वेळच्यावेळी सत्र सुरू होतील. प्रश्नपेढी तयार करण्याचे काम निरंतरपणे शिक्षकांकडून होत राहील. विद्यापीठाचे परीक्षा विभागातील मनुष्यबळ ४० ते ५० वर येऊन उर्वरित सव्वाशे लोकांना विद्यापीठाच्या विभागांमध्ये पाठवता येईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.
परीक्षा विभागात प्रशासनाचा अनुभव असल्याने कुलगुरूपदाचा एक महिना मस्त गेला. विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक पद जबाबदारीचे आणि मनस्तापाचे असते. लोकांकडून कामे करून घेणे अवघड असले तरी आपल्या भारतीयांचा नकारात्मक, कारकुनी कल असतोच.
‘होत नाही’, ‘वेळ लागेल’, ‘कठीणच आहे’, अशी वाक्य आधी ऐकावी लागतात, याकडे त्यांनी अंगुलीनिर्देश केला. एमकेसीएलवर रोष असणाऱ्यांनी पर्यायी व्यवस्था सांगावी, असे आवाहन करीत त्यांनी चॉईस बेस क्रेडिट सिस्टिमचे फायदे-तोटे, सद्य:स्थितीत विद्यापीठासमोरील पुनर्मूल्यांकनाचे आव्हान, विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय वसतिगृह, विद्यापीठाच्या पदव्या इत्यादी विषयांवर कुलगुरूंनी चर्चा केली.
विद्यार्थी संघटना कॅरिऑन, जंपिंगमध्ये, अटेम्पन्ट वाढवण्यात यावेत म्हणून मोर्चे आणतात. आंदोलने करतात. मात्र, एखाद्या हुशार मुलाचे वर्ष वाया जात असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी संघटना पुढे येत नाहीत. तसेच कालबाह्य़ अभ्यासक्रम बदलण्यात यावा, यासाठी विद्यापीठावर कधी मोर्चे आणले जात नाहीत, अशी खंत कुलगुरूंनी व्यक्त केली.

डॉ. काणे उवाच..
– आधीच्या कुलगुरूंनी केलेल्या चुका मी करणार नाही.
– नागपूर विद्यापीठ सुमारे चार लाख विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी रेल्वे आहे.
– प्रथम श्रेणी आणि तिसऱ्या श्रेणीचे डबे या रेल्वेला जोडले आहेत.
-‘आदर्शवादा’ने विद्यापीठ चालत नाही सर्वाना घेऊन चालावे लागते.
-आपल्याकडची अनेक महाविद्यालये आयआयटीच्या तोडीची आहेत.
कुलगुरूंचा एक महिना पूर्ण
नागपूर विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. काणे यांना आज एक महिना पूर्ण झाला. एक महिन्यापूर्वी ते कुलगुरू पदाच्या मुलाखतीसाठी मुंबईत होते. तोपर्यंत कुलगुरूपदाच्या मुलाखतीचा अनुभव त्यांच्या गाठीशी नव्हता. मात्र प्र-कुलगुरू म्हणून मुलाखतीचा अनुभव त्यांना आहे. त्यानिमित्त राजभवनात जाऊन कुलपतींशी रूबरू होण्याची संधी त्यांना मिळाली.