‘मूठभर धान्य आणि एक रुपया द्या’ या संकल्पनेतून विद्रोही साहित्य संमेलन सुरू झाले. सरकारकडून कोणतीही देणगी न घेता गेली १२ वर्षे या संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे. आमच्या संमेलनात झालेल्या अनेक ठरावांपैकी काही महत्त्वाच्या ठरावांची अंमलबजावणीही झाली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सरकारकडून मिळणारी २५ लाखांची देणगी बंद करणे, हे आमचे पुढील लक्ष्य आहे, अशी माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी ‘वृत्तान्त’ला दिली.
‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे करणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दरवर्षी राज्य शासनाकडून ही देणगी कशासाठी, असा सवाल करून प्रा. परदेशी म्हणाल्या, आजवर झालेल्या आमच्या सर्व संमेलनांत आम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मिळणारी २५ लाखांची ही देणगी बंद करावी, असा ठराव मंजूर करत आलो आहोत. आजवर आम्ही जे वेगवेगळे ठराव आमच्या विद्रोही साहित्य संमेलनातून मंजूर करत आलो आहोत, त्यातील काही ठरावांची पूर्तता झाली आहे.
पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील बडव्यांकडून होणारी विठ्ठल-रखुमाईची पूजा बंद करणे हे निर्णय झाले आहेत. याची मागणी आम्ही सातत्याने ठरावाच्या रूपात आमच्या विद्रोही साहित्य संमेलनातून केली होती, असेही प्रा. परदेशी यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Aug 2014 रोजी प्रकाशित
साहित्य संमेलनाची २५ लाखांची देणगी रोखण्यासाठी ‘विद्रोही’ सज्ज!
‘मूठभर धान्य आणि एक रुपया द्या’ या संकल्पनेतून विद्रोही साहित्य संमेलन सुरू झाले. सरकारकडून कोणतीही देणगी न घेता गेली १२ वर्षे या संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे
First published on: 19-08-2014 at 06:25 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidrohi sahitya sanmelan