कायम आत्ममग्न असणारी ही व्यक्ती हल्ली मानवी गोतावळयात दिसायला लागल्यानं अनेकांना आश्चर्य वाटायला लागलंय. चार पावलं त्यांच्या जवळ जायला अजूनही कुणाची पावलं धजावत नाहीत. मात्र, मानवी गोतावळयातल्या अलीकडे त्यांच्या होणाऱ्या दर्शनानं चार नाही, पण दोन पावलं त्यांच्याकडे वळायला लागली आहेत. ‘चिरेबंदी वाडय़ा’तील या ‘वास्तुपुरुषा’चे सर्वत्र उमटणारे ‘प्रतिबिंब’ ही त्यांच्या चाहत्यांसाठी मेजवानीच आहे. तरीही पंचाहत्तरी पूर्तीनिमित्त त्यांना भेटायला येणाऱ्यांना तिथेच थांबवत ‘मौनराग’ मात्र कायम ठेवला आहे.
ज्येष्ठश्रेष्ठ नाटककार प्रा. महेश एलकुंचवार यांच्या शिस्त आणि करारी व्यक्तिमत्त्वाचा अनुभव गेल्या सहा दशकांपासून नागपूरकर घेत आहेत. कित्येकांनी त्यांच्या या स्वभाव वैशिष्टय़ावर नाकं मुरडली, तर ज्यांना ते कळले त्यांनी या व्यक्तिमत्त्वाचा तसाच स्वीकार केला. लेखन हा त्यांच्या अंतर्गाभ्याचा प्रतिध्वनी आहे आणि हा प्रतिध्वनी जेव्हा उमटतो तेव्हा कुठलाही अडथळा त्यांना नको असतो. अशावेळी त्यांचा हा नकार अनेकांना खुपतो. मात्र, ज्यांना एलकुंचवार समजले त्यांना हा नकार सहज पचवता येतो. प्रकाशझोतापासून कायम दूर असणाऱ्या एलकुंचवारांच्या स्वभाव वैशिष्टय़ाची जागतिक पातळीवरही चर्चा होत नाही, असे नाही. त्यांच्या शिस्तीचे भोक्ते देशपरदेशात आहेत, म्हणूनच आजही हे व्यक्तिमत्त्व जेव्हा परदेशी पाऊल ठेवतं, तेव्हा तेवढंच अगत्यपूर्ण स्वागत त्यांच होतं. हे करारी व्यक्तिमत्त्व लोकांमध्ये मिसळत नाही याचा अनुभव नागपुरकरांना आहेच, पण गेल्या दोन-चार वर्षांत परिस्थिती बदलली आहे. त्यांच्या या सरमिसळीचाही अनुभव आता ते घेत आहेत. सभागृहात कार्यक्रम सुरू असताना त्यांना शांतता हवी असते. अशावेळी कुणाचाही भ्रमणध्वनी खणखणला तर एलकुंचवारांची ‘वक्र’दृष्टी त्यांच्यावर पडलीच म्हणून समजा, पण अलीकडे त्याबाबतीतही ते थोडे सौम्य झालेले दिसतात. कार्यक्रमस्थळी ठरलेल्या वेळेत पोहोचणारे एलकुंचवार आता कार्यक्रमाला उशीर झाला तरी थांबलेले दिसून येतात. त्यांच्यात हा बदल झाला की त्यांनी घडवून आणला हे ठाऊक नाही, पण त्यांची ही थोडीशी बदललेली शैली नागपूरकरांसाठी सुखद अनुभवाची ठरली आहे.
चाहतावर्ग मोठा
एलकुंचवारी नाटय़सृष्टीच्या अनुभवानंतर त्यांची खोल, स्वतंत्र व समृद्ध जीवनदृष्टी रसिक वाचकांसाठी स्फुरणदायी ठरते. कळत नकळत त्यांचा विकास करते. समकालीन, आधुनिक जीवनातील, मनातील रिक्ततेचे, तुटलेपणाचे दर्शन धडवत असतानाच त्यांच्या कारणांचाही ते कमालीच्या समंजसपणे परिपक्वतेने शोध घेताना दिसतात. त्यामुळेच चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि साहित्यक्षेत्रातील त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. जेव्हा केव्हा या तीनही क्षेत्रातील मंडळी नागपुरात पाऊल ठेवतात, तेव्हा एलकुंचवारांच्या भेटीविना नागपुरातून ते परतल्याचे तरी उदाहरण नाही. अभिनेत्री सोनाली कुळकर्णी यांच्यासाठी ते ‘महेशदा’ आहेत तर अभिनेता नाना पाटेकरांसाठीही असेच काहीसे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Oct 2014 रोजी प्रकाशित
‘चिरेबंदी वाडय़ा’तील ‘वास्तुपुरुषा’चे उमटले ‘प्रतिबिंब’
कायम आत्ममग्न असणारी ही व्यक्ती हल्ली मानवी गोतावळयात दिसायला लागल्यानं अनेकांना आश्चर्य वाटायला लागलंय.

First published on: 09-10-2014 at 09:45 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wada chirebandi vastu purush mahesh elkunchwar