‘‘पाण्याबाबत बेजबाबदारपणाची भूमिका भविष्यासाठी अत्यंत घातक असून, पाणी मुबलक असल्याचा समज चुकीचा आहे. भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतीसाठी जल व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. नियोजनाच्या अभावामुळेच पाणी वापरात असमतोल होतो. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब केला पाहिजे,’’ असे मत जलतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगळे यांनी व्यक्त केले.
नरदे येथील शरद साखर कारखान्याच्या वतीने ‘महाराष्ट्राचे पेटते पाणी व ठिबक सिंचनाचा वापर’ विषयावर जयसिंगपूर येथील सोनाबाई इंगळे सभागृहात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर होते.
डॉ.  भोंगळे म्हणाले,‘‘७५० वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी पाण्याचे महत्त्व विशद केले; मात्र आजही आपल्याला पाण्याचे मूल्य कळत नाही. पाणी या मूलभूत घटकामुळेच राष्ट्राची प्रगती होते. पाण्याची उपलब्धता, गरज व वापर याचा ताळमेळ तंत्रशुद्ध रीतीने घातला पाहिजे. पर्जन्यमानाची सरासरी स्थिर राहिली आहे; मात्र उपलब्ध पाण्याच्या व्यवस्थापनात असलेल्या त्रुटी व नियोजनातील चुका यामुळे पाण्याचा सतत अपव्यय होतो. तज्ज्ञांचे संशोधन व समोर आलेल्या सिद्धांतावरून राज्यातील बहतांश शेतजमीन कोरडी राहण्याची भीती निर्माण झाली आहे.’’
राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले,‘‘शिरोळ, हातकणंगले तालुक्यात पर्जन्यमान कमी असले तरी बारमाही वाहणाऱ्या नद्या व उपसा जलसिंचन योजना यामुळे हा भाग समृद्ध बनला आहे; मात्र त्याबरोबरच अति पाणी वापरामुळे क्षारपड जमिनीची समस्या उभी राहिली आहे. राज्यात एकीकडे दुष्काळ असताना ह्य़ा भागात अति पाण्यामुळे जमिनी नापीक बनत आहेत.’’
संचालक डी.बी.पिष्टे यांनी स्वागत केले. एम.एस.माने यांनी डॉ.भोंगळे यांचा परिचय करून दिला. संचालक प्रकाश पाटील टाकवडेकर यांनी आभार मानले. बबन यादव यांनी सूत्रसंचालन केले. थबा कांबळे, कार्मकारी संचालक बी.ए.आवटी यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी, अभियंते, शेतकरी उपस्थित होते.