सरत्या आर्थिक वर्षांत वेस्टर्न कोल फिल्ड्ने ४२.२९ मिलियन टन कोळशाचे उत्पादन केले असून ४१.९७ मिलियन टन कोळसा पुरवल्याची माहिती वेकोलिचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक दिनेशचंद्र गर्ग यांनी पत्रकार परिषदेत दिली. कन्हान परिसरातील खाणींमध्ये लवकरच सीआयएसएफचे संरक्षण दिले जाणार आहे.
सरत्या आर्थित वर्षांत (२०१२-१३) वेकोलिने प्रत्येक पाळीत २.९७ टन कोळशाचे उत्पादन केले. रेल्वेद्वारे २१.३५ मिलियन टन कोळशाची वाहतूक केली. आधीच्या तुलनेत १६.८ टक्के ही वाढ आहे. एकूण कोळशाच्या उत्पादनात १०.०५ मिलियन टन म्हणजे ११२ टक्के वाढ केली. वीज उद्योगांच्या कोळसा पुरवठय़ात २.६ टक्के झाली. वीज उद्योगात ३०.००८ मिलियन टन पुरवठा करण्यात आला. सिमेंट उद्योगांना २.०६०, पोलाद उद्योगांना ०.२८१, स्पंज पोलाद उद्योगांना ०.३५५ मिलियन टन कोळसा पुरवला गेला. वणी उत्तर क्षेत्रातील घोसा खाणीत २.१० कोटी रुपयांचे कोळसा हाताळणी यंत्र लावण्यात आले. त्यामुळे १.१ मिलियन टन कोळसा फोडला जातो.
चंद्रपूर क्षेत्रातील पद्दमापूर खुल्या खाणीत ४.७५ कोटी रुपये खर्चून, नायगाव क्षेत्रात १.०८ रुपये तर उकनी खुल्या खाणीत १.६३ कोटी रुपये खर्चून रस्ते तयार करण्यात आले.
वेकोलिला ई लिलावाद्वारे ३९२.११ कोटी रुपये उत्पन्न झाले. ४२८.८७ कोटी रुपये करपूर्व लाभ मिळाला. यंदा १९४.८० कोटी रुपये लाभांश देण्याचे ठरविण्यात आले आहे.
राज्य शासनाला विविध करापोटी १ हजार ५२९.६९ कोटी रुपये प्रदान करण्यात आले. भूमिगत खाणींमध्ये खननासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. भूमिगत खाणींमध्ये खनन करताना दगड कोसळू नये यासाठी तसेच लांब अंतर पायी चालण्याने वेळ व श्रम वाचावा यासाठी यंत्राणा कार्यान्वित केली जात आहे.
वेकोलिच्या क्षेत्रात ६५ हजार ५२० मीटर खनन केले गेले. पाथाखेडा क्षेत्रातील शक्तीगड भागात ६०.५६ मिलियन टन कोळसा साठा असल्याचे उघड झाले.
कन्हान परिसरात अवैध खनन तसेच कोळसा चोरीचे प्रमाण वाढले असून त्यावर आळा घालण्यासाठी खाणींच्या परिसरात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात केले जाणार आहेत.
रूपक दयाल, सुशील बहल व ओमप्रकाश या संचालकांसह वेकोलिचे विविध अधिकारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.