मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील एटीव्हीएम मशिन्सच्या बाजूला ‘फॅसिलिटेटर’ उभे करून एक एटीव्हीएम यंत्र अडवण्यापेक्षा रेल्वेने तिकीट खिडक्या वाढवायला हव्या, अशी मागणी प्रवासी व कर्मचारी संघटना करत आहेत. हे फॅसिलिटेटर नेमण्याऐवजी रेल्वेने तिकीट खिडक्यांवरील कर्मचारी वाढवल्यास प्रवाशांचा जास्त फायदा होईल, असा दावा प्रवासी संघटना करत आहेत. तर फॅसिलिटेटर नेमणे म्हणजे तरुणांना रोजगार नाकारण्याचा प्रकार आहे, असे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे.
मध्य रेल्वेने सीव्हीएम कुपन्सना सक्षम पर्याय देण्यासाठी स्थानकांवरील एटीव्हीएम यंत्रांची संख्या वाढवली आहे. या यंत्रांवरून प्रवाशांनी स्वत:हून तिकीट काढणे अपेक्षित आहे. स्मार्टकार्डचा वापर करून तिकीट कसे काढावे, याबाबत सुरुवातीला प्रवाशांना त्रास झाला होता. त्यातूनच फॅसिलिटेटर ही संकल्पना मध्य रेल्वेने अस्तित्वात आणली. मध्य रेल्वेच्याच काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या तासांनंतर काही ठरावीक रकमेवर या एटीव्हीएम यंत्रांच्या बाजुला नियुक्त केले. हे फॅसिलिटेटर आपल्याजवळील स्मार्टकार्डावरून प्रवाशांना तिकिटे काढून देतात. सध्या मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर एकूण ६८९ फॅसिलिटेटर आहेत.
एटीव्हीएम यंत्राचा हेतू हा प्रवाशांनी आपली तिकिटे स्वत: काढावीत, हा आहे. बहुतांश स्थानकांवर दोनच एटीव्हीएम यंत्रे असतात. त्यापैकी एका एटीव्हीएम यंत्रावर फॅसिलिटेटर असल्याने स्मार्टकार्ड धारकांना एकाच यंत्राचा लाभ मिळतो. स्मार्टकार्ड असणाऱ्यांनाही रांगेत उभे राहूनच तिकीट काढावे लागत असेल, तर मग स्मार्टकार्डचा फायदा काय, असा प्रश्न काही प्रवासी करत आहेत. तर एटीव्हीएम यंत्रासमोर रांगा वाढवण्यापेक्षा रेल्वेने एक कर्मचारी नेमून तिकीट खिडकी उघडावी. त्यामुळे जास्त तिकिटांचा खप होईल, असा दावा प्रवासी संघटनांनी केला आहे.
मात्र तिकीट खिडकीवर कर्मचारी बसवण्यासाठी रेल्वेकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तिकीट खिडक्यांची संख्या वाढवणे शक्य नसल्यानेच आम्हाला हे इतर पर्याय शोधावे लागत आहेत. प्रवाशांना या सोयीचा चांगलाच फायदा होत आहे, असा दावा मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी केला.