पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग या मुंबईतील मुख्य रस्त्यांना जोडणारा सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता येत्या आठवडाभरात सुरू होत आहे. हा रस्ता सुरू झाल्यानंतर कलानगर जंक्शन, शीव आणि अमर महल जंक्शन येथील वाहतूक कोंडी सुटेल, असा दावा एमएमआरडीएतर्फे केला जात आहे. कलानगर जंक्शन आणि शीव येथील वाहतूक कोंडीबाबत हे खरे असले तरी या नव्या मार्गामुळे अमर महल जंक्शनजवळील छेडानगर बसस्टॉप परिसर आणि कुर्ला पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्गाजवळील परिसर ही वाहतूक कोंडीची दोन नवीन ठिकाणे तयार होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे टोलचा भरुदड भरून वांद्रे-वरळी सागरी सेतूने दक्षिण मुंबईकडे जाणारे प्रवासीही आता या जोडरस्त्याने घाटकोपरला येत पूर्व मुक्तमार्गावरून दक्षिण मुंबई गाठण्यास पसंती देण्याचीही शक्यता आहे. परिणामी पूर्व मुक्तमार्गावरील रहदारी वाढण्याची शक्यता आहे.
सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता सुरू झाल्यानंतर पूर्व ते पश्चिम द्रुतगती महामार्ग हा प्रवास फक्त १५-२० मिनिटांत पूर्ण होणार असल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे. हा दावा खरा ठरला, तरी या नव्या मार्गामुळे काही ठिकाणच्या वाहतूक कोंडीत भर पडणार असून काही ठिकाणी नव्याने वाहतूक कोंडी निर्माण होणार आहे. यात कुर्ला पश्चिम येथील हलाव पूल, सीएसटी रोड यांचा समावेश आहे. कालिना येथून उड्डाण पुलावरून एलबीएस रोड ओलांडल्यानंतर या पट्टय़ात वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल. कुर्ला पश्चिमेकडून सुटणारे अनेक बसमार्ग याच रस्त्याने लाल बहादूर शास्त्री मार्गाकडे येतात. हा भाग दाट वस्तीचा असून येथे रस्ता वाढवण्यासाठीही जागा नाही.
जगातील पहिला डबलडेकर उड्डाण पूल असलेल्या या रस्त्याची एक मार्गिका कुर्ला पूर्व येथे नेहरूनगर परिसरात उतरते. या परिसरात एक शाळा असून हा रस्ता सदैव गजबजलेला असतो. कुर्ला स्थानकात येणाऱ्या मुख्य मार्गावरही प्रचंड रहदारी असल्याने या परिसरात वाहतूक कोंडी होणार आहे.
हा जोडरस्ता अमर महल जंक्शनजवळ संपतो, त्या ठिकाणी छोटा उड्डाण पूल बांधला आहे. या उड्डाण पुलाची एक मार्गिका ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर उतरते, तर एक मार्गिका या रस्त्यावर येण्यासाठी मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेला आहे. हा परिसर छेडानगर म्हणून ओळखला जातो. जोडरस्त्यावरून ठाण्याच्या दिशेने येणारी वाहने छेडानगर बसस्टॉपजवळ उतरणार आहेत. दक्षिण मुंबई, दादरच्या दिशेने येणारी वाहने, चेंबूरकडून अमर महल जंक्शनवरून ठाण्याकडे वळलेली वाहने अशी सर्वच वाहने येथे एकत्र येऊन येथे वाहतूक कोंडी होणार आहे.
सागरी सेतूवरील वाहतूक पूर्व मुक्तमार्गावरून?
पश्चिम उपनगरांतील लोकांना दक्षिण मुंबईत येण्यासाठी माहीम, वांद्रे, दादर हा वाहतूक कोंडीचा मार्ग टाळण्यासाठी बांधलेल्या वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून सध्या दिवसाला सुमारे ३७,५०० गाडय़ा प्रवास करतात. मात्र हा रस्ता वापरण्यासाठी टोलचा भरुदड भरावा लागतो. त्यानंतरही वरळी येथे अटारिया मॉलजवळ आणि पेडर रोडवरील वाहतूक कोंडीचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागतो. परतीच्या प्रवासातही बाबूलनाथ, पेडर रोड, हाजीअली जंक्शन, वरळी अटारिया मॉल आणि सागरी सेतू संपल्यानंतर पश्चिम द्रुतगती महामार्ग या ठिकाणच्या वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते.
हा मनस्ताप आणि टोलचा भरुदड टाळण्यासाठी या ३७,५०० पैकी बहुतांश गाडय़ा सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याचा आसरा घेतील. या जोडरस्त्यावरून पूर्व द्रुतगती महामार्ग, तेथून घाटकोपर-मानखुर्द रस्त्यावरून पूर्व मुक्तमार्गाद्वारे दक्षिण मुंबईत येणे या प्रवाशांना सोपे पडणार आहे. एमएमआरडीएच्या म्हणण्याप्रमाणे पश्चिम ते पूर्व द्रुतगती महामार्ग हे अंतर १५-२० मिनिटांत पार पडले, तर या गाडीवाल्यांची चांगलीच सोय होणार आहे. पण त्यामुळे पूर्व मुक्तमार्गाच्या तोंडावर आणि दक्षिण मुंबईतील टोकाला वाडीबंदर येथे वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Apr 2014 रोजी प्रकाशित
सांग सांग भोलानाथ, वाहतूक कोंडी सुटेल काय?
पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग या मुंबईतील मुख्य रस्त्यांना जोडणारा सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता येत्या आठवडाभरात सुरू होत आहे.
First published on: 15-04-2014 at 06:25 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will solved traffic problem