नववर्षांचे निमित्त साधून वाहतूक पोलिसांनी मद्यपि चालकांविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केली आहे. मात्र ही कारवाई करताना एखादा मद्यपि चालक विनापरवाना आढळला तर त्याला दुसऱ्या दिवशी उपायुक्तांकडे हजेरी लावावी लागणार आहे. या प्रक्रियेमुळे वाहतूक पोलिसांमध्ये कमालीची नाराजी आहे. यामुळे आमच्यावरील ताण विनाकारण वाढणार आहे. पहाटेपर्यंत कारवाई करायची आणि पुन्हा आरोपींना न्यायालयात तसेच उपायुक्तांकडे हजर करण्याचा दुहेरी त्रास या पोलिसांना सहन करावा लागणार आहे.
वाहतूक पोलिसांनी मद्यपि चालकांविरुद्ध सुरू केलेली कारवाई १ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या कारवाईवर स्वत: वरिष्ठ निरीक्षक नजर ठेवणार आहेत. परवाना नसलेल्या मद्यपि चालकाची कसून तपासणी करावी. वेळ पडल्यास गाडीचीही झडती घ्यावी, असे वाहतूक पोलिसांना सांगण्यात आले आहे. परंतु एखादा चालक परवाना नाही, असे सांगत असेल तर त्याची झडती कशी घ्यायची, असा प्रश्न वाहतूक शिपायांना पडला आहे. अशावेळी संबंधित मद्यपि चालकाकडून आरोप केला जाण्याची शक्यता आहे. अशावेळी आता या चालकाला आपल्यासमोर हजर करा. आपण त्याची उलटतपासणी घेऊ, असे पूर्व-पश्चिम तसेच उत्तर विभागाचा कार्यभार सांभाळणारे उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे आमच्यावरील ताण कमालीचा वाढणार आहे, अशा तक्रारी वाहतूक पोलिसांकडून केल्या जात आहेत.
बऱ्याच वेळा मद्यपि चालकावर कारवाई केल्यानंतर त्याच्याकडे परवाना नसल्यास त्याच्याकडून दंड आकारला जातो. परंतु परवाना निलंबित होऊ शकतो. त्यामुळे चालकच परवाना लपवितात. अशा चालकांना आळा बसण्यासाठी ही कारवाई आहे. आपण स्वत: त्याची तपासणी करणार आहोत
– प्रताप दिघावकर, उपायुक्त, वाहतूक पोलीस.