भारतात पुरुष हा कुटुंबाचा प्रमुख असतो, परंतु राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत पुरुषांऐवजी कुटुंबातील ज्येष्ठ महिला ही कुटूंब प्रमुख राहणार आहे. महिला सक्षमीकरण व दारुडय़ा पतीकडून धान्य विक्रीची शक्यता लक्षात घेता कुटुंब प्रमुख म्हणून महिला राहणार आहे. त्यामुळे आता शिधापत्रिकेवर पुरुषांऐवजी कुटूंब प्रमुख म्हणून महिलेच्या नावाची नोंद होणार आहे. दरम्यान, जानेवारीपासून महाराष्ट्रात अन्नसुरक्षा योजना लागू होणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी या अधिनियमातील कलम १३ मधील तरतुदीनुसार शिधापत्रिकेवर कुटुंबातील १८ वष्रे वा त्यावरील वयाच्या कुटुंबातील ज्येष्ठ महिलेच्या नावासमोर कुटुंब प्रमुख, असा शिक्का मारणे आवश्यक आहे. भारतात कुटूंब प्रमुख म्हणून पुरुष असतो, परंतु या योजनेत महिलेकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामागे महिला सक्षमीकरण हे एक प्रमुख कारण असले तरी ग्रामीण भागात बहुतांश पुरुष दारूच्या आहारी गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मद्याच्या आहारी गेलेला पुरुष दोन व तीन रुपये किलो दराने मिळणारे धान्य बाजारात विकण्याची शक्यता लक्षात घेता कुटुंब प्रमुख म्हणून महिलेची निवड करण्यात आलेली आहे.
बीपीएल योजनेच्या शिधापत्रिकेवर प्राधान्य कुटूंबातील लाभार्थी, असा शिक्का मारावयाचा आहे. या सर्व शिधापत्रिका २८ डिसेंबरपूर्वी जमा करायच्या आहेत. शिक्का मारण्याची कार्यवाही पूर्ण होताच संबंधित रास्त भाव दुकानदारांकडून परत करण्यात येणार आहे.
या जिल्ह्य़ातील १४ लाख ३६ हजार ८७६ लोकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी आर.एस. आडे यांनी दिली. या जिल्ह्य़ाची लोकसंख्या २२ लाख ४ हजार ३०७ आहे. त्यात ग्रामीण भागातील लोकसंख्या १४ लाख २४ हजार ४२४, तर शहरी भागातील लोकसंख्या ७ लाख ६९ हजार ८६८ आहे. अन्नसुरक्षा योजनेत ग्रामीण भागातील १० लाख ८७ हजार १२० लोकांना, तर शहरी भागात ३ लाख ४९ हजार ६६ लोकांना लाभ मिळणार आहे. या जिल्ह्य़ात बीपीएलधारक १ लाख ७ हजार ४५५, तर अंत्योदयचे १ लाख ३१ हजार ११२ शिधापत्रिकाधारक आहेत. एपीएलचे १ लाख ६७ हजार शिधापत्रिकाधारक आहे.