महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्यावर प्रचंड निष्ठा असलेले बिनीचे युवा कार्यकर्ते मंगेशकुमार मुंगळे व संजय हाडे यांच्या नेतृत्वातील कार्यकर्त्यांच्या एका समूहाने गेल्या चौदा वर्षांतील त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा सविस्तर अहवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कृष्णकुंजवर सादर केला.
यामध्ये वाहतूक सेनेचे विनायक हाडे, रवी कदम, दुर्गेश मोरे यांच्यासह मनसेच्या अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांचा समावेश होता. राज ठाकरे यांच्यावर प्रखर निष्ठा ठेवून मंगेशकुमार मुंगळे यांनी तत्कालीन शिवसेनाप्रणीत भारतीय विद्यार्थी सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून बहुमोल कार्य केले आहे. त्यांना मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा संघटक म्हणून संजय हाडे यांनी बहुमोल साथ दिली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चौदा वर्षांत जिल्ह्य़ात केलेल्या राजकीय, सामाजिक व रचनात्मक अशा विविध कार्याचा चौदाशे पानांचा अहवाल मंगेशकुमार मुंगळे व संजय हाडे यांनी नुकताच राज ठाकरे यांना सादर केला. कार्यकर्ता समूहाने मुंबईतील कृष्णकुंजमध्ये राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी जिल्ह्य़ाच्या संघटनात्मक बांधणीच्या संदर्भात विशेष चर्चा करून संघटना अधिक जोमाने वाढविण्याचे अभिवचन दिले. राज ठाकरे यांनी मुंगळे व संजय हाडे यांच्या निस्वार्थ कार्याचे कौतुक केले. जिल्ह्य़ात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्या क्रमांकाची राजकीय व सामाजिक संघटना व्हावी, या दृष्टीने अथक प्रयत्न करण्याचे निर्देश मंगेशकुमार मुंगळे व संजय हाडे यांना दिले. मुंगळे व हाडे यांनी पक्ष प्रमुखांच्या प्रेरणादायी आशीर्वादाबद्दल आभार मानले आहेत.