मुंबईतील रेल्वे फलाटांची कमी उंची प्रवाशांसाठी जीवघेणी ठरत असल्याने आता ही उंची वाढवण्याचे काम रेल्वे प्रशासन हाती घेणार आहे. या कामाची सुरुवात शुक्रवारी घाटकोपर स्थानकातील फलाट क्रमांक एकवरूनच होणार असून लवकरच उर्वरित ५४ स्थानकांतील फलाटांची उंची वाढवण्यात येणार आहे, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित खासदार किरीट सोमय्या यांनी केली. सोमय्या यांनी बुधवारी दिवसभर रेल्वेसंबंधी विविध अधिकाऱ्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
घाटकोपर येथे धावती गाडी पकडण्याच्या नादात फलाट आणि गाडी यांच्या पोकळीत पडलेल्या मोनिका मोरे या १६ वर्षीय मुलीला दोन्ही हात गमवावे लागले होते. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी फलाट व गाडी यांच्यातील या जीवघेण्या पोकळीबाबत प्रचंड रान उठवले होते. रेल्वेमंत्री मल्लिकार्जून खरगे यांच्या मुंबई भेटीदरम्यान त्यांनी मोनिका मोरे हिच्या वडिलांसह रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन ही समस्या त्यांच्या कानावर घातली होती. त्यानंतर खरगे यांनीही ही पोकळी कमी करण्यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. रेल्वे प्रशासनानेही फलाटाची उंची जास्तीत जास्त किती सेंमीपर्यंत वाढवता येईल, याबाबत आरडीएसओकडून अहवाल बनवून घेतला. तसेच फलाटाची उंची वाढवण्यासाठी दोन वर्षांचे वेळापत्रक आखून प्रत्येक वर्षांसाठी ८-८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत किरीट सोमय्या निवडून आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा या प्रश्नाचा पाठपुरावा केला. बुधवारी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम, एमआरव्हीसीचे अध्यक्ष राकेश सक्सेना, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या सर्वाची भेट घेऊन त्यांनी मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या समस्या आणि त्यावरील उपाय यांबाबत चर्चा केली. या चर्चेनंतर बोलताना मुंबईतील ५४ स्थानकांतील फलाटाची उंची वाढवण्यात येणार असल्याची माहिती दिली. या कामाची सुरुवात शुक्रवारी घाटकोपर स्थानकातील फलाट क्रमांक १च्या कामापासून होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.