दर्शनशास्त्रातील सहा शास्त्रांपैकी एक शास्त्र म्हणजे योगशास्त्र. योगशास्त्राची महती अथर्व वेदांमध्ये वर्णिली असून पतंजली योगसूत्र, बुद्ध कालखंड आणि योगाच्या माध्यमातून ईश्वराशी तादात्म्य भावाने एकरूप होता येत असल्याने योगाचे महत्त्व प्राचीन कालखंडापासून अस्तित्वात असल्याचे मत बालरोग तज्ज्ञ व योगशास्त्राचे अभ्यासक डॉ. अनिरुद्ध गुर्जलवार यांनी मांडले. गोरक्षण सभेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सावानिमित्त भारतीय ज्ञान-विज्ञानावर आयोजित मोरोपंत पिंगळे व्याख्यानमालेतील नववे पुष्प गुंफताना ते बोलत होते.
योगशास्त्रावर अभ्यासपूर्ण विवेचन करताना डॉ. गुर्जलवार यांनी हटयोग, राजयोग आणि अष्टयोगासंबंधीची संकल्पना स्पष्ट केली. आसन, प्राणायाम आदी योगांमध्ये सांगितलेल्या क्रियांतून मनुष्य आरोग्यवर्धन करू शकतो. निरोगी जीवनासाठी योगशास्त्र महत्त्वाचे आहे. वेद, उपनिषद, दर्शन व श्रुती हे व्यक्तीने निर्माण केले नसून योगशास्त्राकडे आध्यात्मिक दृष्टीने पाहायला हवे. योगाभ्यासात प्रारब्ध बदल घडवून आणण्याची शक्ती आहे. चित्तवृत्तीचा विरोध म्हणजे योग होय, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीपाद रिसालदार यांनी केले. संचालन राजेंद्र होले तर वासंती वैद्य यांनी आभार मानले.