केक्स, कुकीज खायला कितीही आवडत असलं तरी बेकिंगचे नाव घेतले की प्रत्येकाला धडकी भरते. त्यात बेकिंग करायचे म्हणजे चांगला ओव्हन हवा हे नक्की. त्यामुळे या विचारांनी कित्येकजण बेकिंग करण्यापासून लांब पळतात. ही बाब लक्षात घेऊन ओव्हनचा वापर न करता घरच्याघरी सोप्या पद्धतीने बेकिंग करण्याचे धडे शेफ गौतम महर्षी त्यांच्या आगामी शोमधून देणार आहे.
बेकिंग करायचे म्हणजे महागडे ओव्हन आणि भांडी घ्यायची गरज आहे तसेच अंडय़ाचा वापर अनिर्वाय आहे, असा समज जनमानसामध्ये असतो. पण, या दोन्ही गोष्टींना छेद देत नेहमीच्या कुकवेअरमध्येसुद्धा सुंदर बेकिंग करता येऊ शकते हे सांगणारा नवीन शो ‘बेक दो तीन’ खवय्यांच्या लाडक्या ‘झी खाना खजाना’ या वाहिनीवर येणार आहे. शेफ गौतम महर्षी या शोमध्ये पॅन आणि कुकवेअरमध्ये मफिंग्स, पिझ्झा, ब्रेड्स, टार्ट्स सारखे पदार्थ बनवायला शिकवणार आहेत.
सध्याच्या फास्टफुडच्या जमान्यामध्ये या पदार्थावर मुलांचे विशेष प्रेम असते. पण, त्यांच्या किचकट रेसिपीमुळे घरामध्ये हे पदार्थ बनवणे टाळले जाते. तसेच दरवेळी हे पदार्थ बनवण्यासाठी खास साहित्यांची आणि उपकरणांची गरज असतेच असेही नाही. घरातल्या घरात उपलब्ध साहित्यापासूनसुद्धा बेकिंगचे काही उत्तम पदार्थ आपण बनवू शकतो, हा विश्वास प्रेक्षकांच्या मनात निर्माण करण्यासाठी हा शो घेऊन येत असल्याचे, ‘झी खाना खजाना’चे व्यवसाय प्रमुख अमित नायर यांनी सांगितले.