News Flash

अ‍ॅड. रोहित देव

न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या प्रकरणांचा मसुदा तयार करण्यात तरबेज असलेल्या देवांचे इंग्रजीवर कमालीचे प्रभुत्व आहे.

अ‍ॅड. रोहित देव 

शांत व मृदू स्वभावाचे म्हणून ओळखले जाणारे अ‍ॅड. रोहित देव यांच्या महाधिवक्तापदावरील निवडीने राज्याच्या उपराजधानीला हा मान पाचव्यांदा मिळाला आहे. ५१ वर्षांचे देव मूळचे नागपूरचेच. येथील हिस्लॉप महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर त्यांनी डॉ. आंबेडकर विधि महाविद्यालयातून कायद्याची पदवी मिळवली. येथील प्रसिद्ध वकील अ‍ॅड. सुबोध धर्माधिकारी यांच्याकडे काही काळ सहायक म्हणून काम केल्यानंतर देव यांनी जिल्हा तसेच उच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली सुरू केली.

वेगवेगळ्या न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रकरणे हाताळण्याचा ३० वर्षांचा अनुभव पाठीशी असलेले देव विद्यार्थिदशेत काही काळ पत्रकार म्हणून काम करत होते. आता बंद पडलेल्या ‘नागपूर टाइम्स’मध्ये त्यांनी दोन वर्षे उपसंपादक म्हणून नोकरी केली. न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या प्रकरणांचा मसुदा तयार करण्यात तरबेज असलेल्या देवांचे इंग्रजीवर कमालीचे प्रभुत्व आहे. गेल्या काही महिन्यांपासून कार्यकारी महाधिवक्ता म्हणून काम बघणारे देव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांच्या निकटच्या वर्तुळातील म्हणून ओळखले जातात. या दोन्ही नेत्यांनी आघाडी सरकारच्या काळात अनुशेष निर्मूलनाच्या मुद्दय़ावर उच्च न्यायालयात धाव घेतली होती, तेव्हा देव यांनीच त्यांची बाजू प्रभावीपणे मांडली होती. अनुशेषाच्या मुद्दय़ावर राज्यपालांनी दिलेले निर्देश सरकारने पाळणे बंधनकारक आहे की नाही, या मुद्दय़ावरचा तत्कालीन सरकारतर्फे गुलाम वहानवटी यांनी केलेला युक्तिवाद देव यांनी खोडून काढला होता व फडणवीस आणि गडकरी हा लढा जिंकले होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी गैरव्यवहाराच्या आरोपावरून भाजपची सत्ता असलेली नागपूर महानगरपालिका बरखास्त केली होती. नंदलाल समिताने दिलेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हाही देव हे फडणवीसांच्या मदतीला धावून आले व त्यांनी न्यायालयीन लढा देत बरखास्तीचा हा निर्णय बेकायदेशीर ठरवला होता. राज्याच्या विक्रीकर खात्याचे तसेच नागपूर विद्यापीठाचे विशेष वकील म्हणूनही देव यांनी प्रभावी कामगिरी बजावली आहे. देव गेल्या दोन वर्षांपासून येथील खंडपीठात केंद्राचे असिस्टंट सॉलिसिटर जनरल म्हणून काम बघत होते. त्यांना लवकरच न्यायाधीश म्हणून नेमले जाणार अशी चर्चा विधि वर्तुळात होती. त्यामुळेच त्यांना महाधिवक्ता म्हणून नेमणूक देण्यात विलंब झाला. देव यांच्या पत्नी अस्मिता येथील भोसला सैनिकी शाळेत शिक्षिका असून ते विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे जावई आहेत. देव यांचे मोठे बंधू शिरीष देव भारतीय हवाई दलात एअर मार्शल असून सध्या ते इस्टर्न कमांडचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. अरविंद बोबडे, व्ही. आर. मनोहर व अलीकडच्या काळात राजीनामा दिलेले सुनील मनोहर व श्रीहरी अणे यांच्यानंतर देव यांना हा मान मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 3:30 am

Web Title: advt rohit dev
Next Stories
1 जॉर्ज मायकेल
2 बापू लिमये
3 शंख घोष
Just Now!
X