‘राफेल’ लढाऊ विमानांचे देशात आगमन होत असताना भारतीय हवाई दलाच्या पश्चिम विभागाची धुरा एअर मार्शल विवेक राम चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली. या दोन्ही घडामोडींचा थेट संबंध नसला तरी काही समान धागे निश्चित आहेत. लडाख सीमेवर भारत-चीन दरम्यानचा संघर्ष अद्याप पूर्णत: निवळलेला नाही. राफेलची पहिली तुकडी चीनलगतच्या सीमेवर तैनात करण्याचे नियोजन आहे. हवाई दलाच्या पश्चिम विभागावर लडाख, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान या क्षेत्राची जबाबदारी आहे. पाकिस्तान आणि चीनलगत असणाऱ्या या भागात हवाई प्रभुत्व राखणे महत्त्वाचे आहे. हवाई दलाची तलवार म्हणून पश्चिम विभाग ओळखला जातो. त्याच्या अखत्यारीत २०० हवाई तळ आहेत. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा या विभागाची जबाबदारी साडेतीन दशकांहून अधिकचा अनुभव असणाऱ्या विवेक राम चौधरी यांच्याकडे देण्यात आली. याआधी ते शिलाँगस्थित पूर्व विभागाचे वरिष्ठ हवाई दल अधिकारी म्हणून कार्यरत होते. चौधरी हे हवाई दलात डिसेंबर १९८२ मध्ये लढाऊ विमानाचे वैमानिक म्हणून दाखल झाले. त्यांच्याकडे आज तब्बल ३८०० तास हवाई उड्डाणाचा अनुभव आहे. मिग २१, मिग २९, सुखोई ३० आदी लढाऊ विमानांचे त्यांनी सारथ्य केले आहे. प्रमाणित हवाई प्रशिक्षक म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी हवाई दलाच्या जामनगर, श्रीनगर, अवंतीपूर, पुणे अलाहाबाद, दिल्ली अशा अनेक महत्त्वाच्या तळांवर सक्षमपणे काम केले. यात काश्मीरमधील दोन तळांचाही समावेश आहे. पाकिस्तानशी १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धात ते हवाई संरक्षण मोहिमेत सहभागी होते. दिल्लीतील हवाई दल मुख्यालयाचे ते उपप्रमुख असतानाच, राफेलचा कार्यक्रम प्रगतिपथावर होता. हवाई दलाच्या ताफ्यात आधुनिक लढाऊ विमाने समाविष्ट करण्यासाठी स्थापलेल्या उच्चस्तरीय समितीचे ते प्रमुख होते. हवाई दलातील कामगिरीबद्दल त्यांना अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राफेलची पाच विमानांची पहिली तुकडी अंबाला हवाई तळावर दाखल झाली. सैन्य दलाने लडाख क्षेत्रात लष्करी ताकद वाढविण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. या भागात राफेल तैनात करण्यामागे तो उद्देश आहे. अंबाला हवाई तळ पश्चिम विभागाच्या अखत्यारीत येतो. सीमावर्ती भाग अधिकाधिक सुरक्षित राखण्याच्या प्रक्रियेत चौधरी यांचा प्रदीर्घ अनुभव कामी येणार आहे.