कशाहीवर वाद घालू शकणारे गप्पिष्ट साहित्यप्रेमी बंगालीजन कदाचित आता, १७ नोव्हेंबरला निधन झालेल्या आलोकरंजन दासगुप्तांना कवी म्हणून मोठे मानायचे की समीक्षक आणि कवितेचे अभ्यासक- अनुवादक म्हणून त्यांची महत्ता मान्य करायची, याबद्दलही वाद घालू शकतील! आलोकरंजन दासगुप्ता हे १९७१ नंतर जर्मनीत, हायडेलबर्ग शहरात राहात आणि तिथेच त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांच्या जर्मन पत्नी एलिझाबेथ यांनी दिली. त्यानंतर पश्चिम बंगाल आणि बांगलादेश- दोन्हीकडल्या वृत्तपत्रांनी उत्कटपणे बातम्या दिल्या. बंगालबाहेरील बडय़ा इंग्रजी वृत्तपत्रांनीही ‘साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी’ अशी त्यांची ओळख मथळय़ात सांगितली.

ती ओळख तेवढीच नव्हे, हे बंगालीजनांना माहीत आहे. १९९२ मध्ये ‘मोरोमी करत’ या त्यांच्या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीने गौरविले हे खरेच. पण त्याआधी ‘बंगाली काव्यातील गेयतेची सतराव्या शतकापर्यंत झालेली घडण’ हा त्यांचा पीएचडीचा प्रबंध, किंवा ‘गुटे आणि टागोर : पूर्व-पश्चिम संवादाचा आढावा’ हा अभ्यासही ग्रंथरूपाने प्रकाशित झाला होताच. ‘जीबनानंदो’ हे रवीन्द्रनाथांनंतरचे महत्त्वाचे बंगाली कवी जीवनानंद दास यांच्या काव्याचा परामर्श घेणारे चरित्र, जादवपूर विद्यापीठात ‘तौलनिक साहित्याभ्यास’ हा विभाग १९५० च्या दशकात सुरू करणाऱ्या बुद्धदेव बोस यांचे चरित्र हेही आलोकरंजन दासगुप्तांनीच लिहिले होते; शिवाय ‘श्ॉडो ऑफ काइट अ‍ॅण्ड अदर एस्सेज’सारखे निबंधांचे पुस्तकही. त्यांच्या एकंदर २५ पुस्तकांत काव्यसंग्रह निम्म्याहून कमीच. त्यात जर्मन कवितांचे बंगालीत अनुवाद, बंगाली तसेच संथाळीतील कवितांचे इंग्रजी आणि जर्मन भाषेत अनुवाद, जर्मन कवी रायनर मारिआ रिल्केच्या काव्याचा अभ्यास हेही. (बरे, ‘विंदा’ आणि ‘गो. वि.’ अशी करंदीकरी फाळणी न करताच हे सारे!)

‘कॅलकॅटा’ म्हणवण्यातच धन्यता मानणाऱ्या १९३३ सालच्या कोलकात्यात ते जन्मले, विश्वभारतीपासून ते प्रेसिडेन्सी कॉलेजपर्यंत शिकून २४ व्या वर्षी पीएच.डी. झाले, त्याआधीच कवितेने त्यांना गाठले. पण १४ वर्षे जादवपूर विद्यापीठात तौलनिक साहित्याभ्यास आणि वयाच्या ३८ व्या वर्षीपासून हायडेलबर्ग विद्यापीठात ‘भारतीय साहित्य व तत्त्वज्ञान’ हे विषय त्यांनी शिकवले. जर्मनीचा ‘गुटे पुरस्कार’ (१९८५) तसेच शांतिनिकेतनाचा रबिन्द्र पुरस्कार (१९८७) यानंतर साहित्य अकादमी पुरस्कारही त्यांना मिळाला. या पुरस्कारांत न मावणारे बंगालीप्रेम आणि त्याचा आविष्कार म्हणून चतुरस्र अभ्यास करणाऱ्या दासगुप्तांची मूळ प्रेरणा ‘कविता’ हीच राहिली!