04 March 2021

News Flash

बॅरी जेन्किन्स

ही नाटय़मयता त्यांच्या आयुष्यात जन्मापासून कायम आहे.

बॅरी जेन्किन्स

मनोरंजनाच्या निकषांवर यंदा सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या, नामांकनांच्या आकडेवारीत विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या आणि जगभरात सारखाच बोलबाला झालेल्या ‘ला ला लॅण्ड’ या चित्रपटाला सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला असला, तरी सवरेत्कृष्ट चित्रपटाचा मान हा बॅरी जेन्किन्स यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मूनलाइट’ या चित्रपटाला मिळाला. गेल्या वर्षी कृष्णवंशीयविरोधी म्हणून झालेली तिखट टीका यंदाच्या ऑस्करमध्ये धुऊन निघाली. पण मूनलाइटला पुरस्कार जाहीर होतानाही जेन्किन्स यांच्याबाबत असाधारण नाटय़ घडले.

ही नाटय़मयता त्यांच्या आयुष्यात जन्मापासून कायम आहे. १९७९ साली मियामीमधील लिबर्टी या गुंड-पुंड आणि अमली पदार्थाचे वर्चस्व असलेल्या वातावरणात जन्मलेल्या जेन्किन्स यांना बापाने हा आपला मुलगा नाही, असा दावा करीत नाकारले. त्यानंतर आई-वडिलांच्या विभक्त आयुष्यात जेन्किन्स यांची रवानगी नातेवाईकांकडे आश्रितरूपात झाली. या काळात त्यांची आई अमली पदार्थाच्या व्यसनात बुडाली. या सगळ्या दु:खांचे बुरूज खांद्यावर वाहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. मियामीमधील वातावरणाचा आपल्यावर परिणाम न होऊ देता सुरुवातीला फुटबॉलमध्ये करिअर करण्याचे त्यांनी ठरविले. मात्र ते सोडून फ्लोरिडामध्ये सिनेमाचे शिक्षण घेतले. सिनेमाच्या शिक्षणानंतर लघुपट बनवता बनवता मित्राकडून १५ हजार डॉलर कर्ज काढून त्यांनी एक पूर्ण लांबीचा सिनेमा २००८ साली बनविला. ‘मेडिसिन फॉर मेलॅन्कली’ या चित्रपटाला समीक्षक-परीक्षकांनी नावाजले, मात्र व्हावा तितका आर्थिक फायदा न मिळाल्याने सुरू केलेली चित्रपटांवरील कामे सोडून द्यावी लागली. या दरम्यान, मिस्त्रीकामासोबत व्हिडीओ कंपनी उभारण्याचे, टीव्ही मालिकांसाठी पटकथा लिहिण्याचे विविधोद्योग त्यांनी केले. मात्र दोन वर्षांपूर्वी टेरेल ऑलविन मॅक्कार्नी या नाटककाराने मियामी शहराविषयी लिहिलेल्या नाटकाची संहिता हाती लागल्यावर त्यांनी ‘मूनलाइट’ची संकल्पना विकसित केली. हा चित्रपट नाटकावर बेतला असला, तरी त्यात बॅरी यांचे अनुभवधागेही एकरूप झाले आहेत. जेन्किन्स यांनी लहानपणी पाहिलेल्या व्यक्ती, वातावरण आणि स्वत:च्या दु:खांच्या अवस्था चित्रपटामध्ये ओतल्या आहेत. अन्याय आणि जगताना श्वेतवर्णीयांशी करावा लागणारा संघर्ष यांवर कृष्णवर्णीयांवरील सिनेमा बेतलेले असतात. इथे मात्र तो पारंपरिक भाग येत नाही. भीषण लहानपणापासून मध्यम वयापर्यंत विविध टप्प्यांवर एका व्यक्तीचा स्वशोध चित्रपटामध्ये मांडताना, जेन्किन्स निष्णात डॉक्टरसारखी काळजी घेताना दिसतात. मियामी येथेच काही काळापूर्वी पोलिसांनी हकनाक केलेल्या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या हत्येनंतर संपूर्ण अमेरिकाभर निषेध आणि बंडाचा झेंडा उभारला गेला होता. त्याचे गडद पडसाद चित्रपटातील नायकाला मिळणाऱ्या अभूतपूर्व सहानुभूतीस कारणीभूत आहेत. अर्थात, दिग्दर्शक म्हणून जेन्किन्स यांना अमेरिकेतील सध्याच्या वातावरणाचा, ऑस्करच्या अलीकडेच झालेल्या उपरतीचा फायदा झाला, असे म्हटले जात असले, तरी ते खरे नाही. दीड लाख डॉलर इतक्या (ला ला लॅण्डच्या तीसपट कमी) खर्चामध्ये त्यांनी हा चित्रपट बनविला. ना त्याची प्रसिद्धी करण्याइतपत पैसा होता, ना त्याचा प्रचार करण्याइतपत ओळखी. तरीही या चित्रपटाला फिल्म फेस्टिव्हल्समधून समीक्षकांनी उचलून धरले. चित्रपट मुख्य प्रवाहामध्ये विक्रम करणाऱ्या, तिकीटबारी गाजविणाऱ्या सर्वच सिनेमांसोबत लढत मानाच्या साऱ्या पुरस्कारांवर  नाव कोरीत ऑस्कपर्यंत दाखल झाला, तरी तो विजयी होण्याची शक्यता सर्वात कमी मानली जात होती.

या वर्षी लोकप्रिय झालेल्या  कॉलसन व्हाइटहेड या लेखकाच्या अंडरग्राऊंड रेलरोड या खूपविक्या (बेस्टसेलर) पुस्तकावर ते आता चित्रपट बनवीत आहेत. यंदाच्या ऑस्करच्या रूपाने मिळणाऱ्या अनेक गोष्टींमुळे तो चित्रपटही अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या अर्वाचीन इतिहासाचे एक पान उलगडणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 3:31 am

Web Title: barry jenkins
Next Stories
1 प्रा. डॉ. अंजली रॉय
2 डॉ. केनेथ जोसेफ अ‍ॅरो
3 क्रेसिडा डिक
Just Now!
X