आजचा जमाना ‘लाइफ कोच’चा आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी पूर्वी गुरूची कृपादृष्टी लाभत असे; आजच्या काळात तेच काम ‘लाइफ कोच’ म्हणजे जीवन मार्गदर्शक करीत आहेत. सिलिकॉन व्हॅलीतील अ‍ॅपलचे स्टीव्ह जॉब्ज व गुगलचे लॅरी पेज यांच्यासारख्या बलाढय़ संगणकतंत्र कंपन्यांच्या संस्थापक-संचालकांना रूढार्थाने घडवण्याचे काम एका व्यक्तीने केले होते, त्यांचे नाव बिल कॅम्पबेल. त्यांचे नुकतेच कर्करोगाने निधन झाल्यामुळे अनेकांचा मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक गेला. कुठलीही कंपनी हा काही निर्जीव प्रकार नसतो, त्यात माणसे घडवावी लागतात, तरच उद्योगात भरारी घेता येते, हे कॅम्पबेल यांचे सूत्र होते.
विल्यम व्हिन्सेंट कॅम्पबेल यांचा जन्म १९४० मधला. पीट्सबर्गमधील होमस्टेड येथे त्यांचे बालपण गेले. लहानपणी त्यांना फुटबॉलची आवड होती. पुढे कोलंबिया विद्यापीठाच्या फुटबॉल संघाचे ते कर्णधार होते. अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवीनंतर ते फुटबॉलचे प्रशिक्षक होते, १९७९ मध्ये ते कंपनी क्षेत्राकडे वळले. सिलिकॉन व्हॅलीच्या चढत्या आलेखात कॅम्पबेल यांनी पडद्यामागे राहून माणसे घडवण्याचे काम केले. स्टीव्ह जॉब्ज यांना तर ते भावासारखे होते. त्यांची ओळखच ‘द कोच’ अशी होती. माहिती तंत्रज्ञानातील पायाभूत कंपन्या असलेल्या अ‍ॅपल व गुगल या दोन कंपन्यांची सुरुवातीची वाटचाल १९८० च्या दशकात झाली, त्या वेळी कॅम्पबेल यांनी अनौपचारिक पद्धतीने या कंपन्यांच्या प्रमुखांशी संवाद ठेवून या कंपन्यांची एक वेगळी संस्कृती साकार केली. सिलिकॉन व्हॅलीत स्टार्ट अप म्हणजे नवउद्यमांची संस्कृती रुजत असताना कॅम्पबेल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. युरोपच्या ईस्टमन कोडॅक या कंपनीतून ते १९८३ मध्ये पहिल्यांदा सिलिकॉन व्हॅलीत आले. अ‍ॅपल कंपनीत ते विपणन खात्याचे उपाध्यक्ष होते. स्टीव्ह जॉब्ज यांनी १९९७ मध्ये धडाक्यात पुनरागमन करीत आयपॉड, आयफोन, आयपॅड ही लोकप्रिय उत्पादने साकार केली त्याचे कॅम्पबेल हे साक्षीदार. कुणी सल्ला मागितला तर ते फुकट देत असत, कारण समाजाचे देणे आपण लागतो असे ते मानत. गुगलमध्येही त्यांनी अशीच भरीव कामगिरी केली होती. अ‍ॅमॅझॉन, गो कॉर्पोरेशन या कंपन्यांनाही दिशा देण्याचे काम त्यांनी केले होते. ‘इनटय़ुइट’ या आर्थिक सेवा सॉफ्टवेअर कंपनीचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी होते. माहिती तंत्रज्ञानातील नव्या दमाच्या नेतृत्वाची पिढी त्यांनी घडवली. ‘‘संभाव्य ग्राहकांची खुशामत करून विक्री वाढवण्यापेक्षा ‘माझे उत्पादन हे असे आहे आणि त्याने तुमचा हा फायदा होईल’ हे त्यांना सांगा’’.. ‘‘हुशारी शिकवून येत नाही, चोख काम कसे करावे हे शिकवता येते; पण कामात चुका होणारच’’ किंवा ‘‘मी ज्या लोकांना नोकरीवरून कमी केले, त्यांत काम न करणारे कमी होते.. वर्तणूक आणि स्वभाव हे अधिक लोकांची नोकरी जाण्याचे कारण होते’’ हे बिल यांचे सांगणे, नव्या व्यवसायसंस्कृतीची ग्वाही देणारे होते.