ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानोत्तर चाचण्यांना चकवा देत पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला पुन्हा सत्ता मिळाली असली तरी अलीकडे ऑस्ट्रेलियाला राजकीय अस्थैर्याचा सामना करावा लागत आहे. या अस्थर्याच्या काळात, ऑस्ट्रेलियाला नवी दिशा देणारे माजी पंतप्रधान बॉब हॉक यांचे नेतृत्व उठून दिसते. आठ वर्षे पंतप्रधानपद भूषविणारे बॉब यांचे गेल्या आठवडय़ात निधन झाले. कामगार चळवळीतील कुटुंबात १९२९ मध्ये त्यांचा जन्म झाला. मी एके दिवशी पंतप्रधान होणार, असे वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांनी मित्रांना सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात वयाच्या पन्नाशीनंतर त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. तत्पूर्वी पर्थ, ऑक्सफर्ड व कॅनबेरा येथे शिक्षण घेतल्यानंतर ते कामगार चळवळीत सहभागी झाले. ऑस्ट्रेलियन कौन्सिल फॉर ट्रेड युनियनचे संशोधन अधिकारी या नात्याने त्यांनी, कामगारांना अधिक वेतनमान मिळावे, यासाठी देशाच्या वेतन लवादापुढे कामगारांची बाजू भक्कमपणे मांडली. लवादाने युनियनच्या बाजूने दिलेल्या निकालात त्यांचे महत्त्वाचे योगदान मानले जाते. मजूर पक्षाच्या इतर नेत्यांप्रमाणेच कामगार पक्षातूनच त्यांचे नेतृत्व उदयास आले. पण राजकारणातील प्रत्यक्ष सहभागानंतर त्यांनी झटपट पक्षात स्थान निर्माण केले. ते १९८० मध्ये संसदेत गेले. १९८३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान माल्कम यांचा पराभव करून मजूर पक्षाकडून बॉब हे पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरले. मजूर पक्षाची शकले सांधण्याबरोबरच देशातील आर्थिक सुधारणांवर त्यांनी भर दिला. बॉब यांच्या धोरणांपैकी ‘मेडिकेअर’ ही सार्वजनिक आरोग्य योजना महत्त्वाची मानली जाते. पर्यावरण संवर्धन, मानवाधिकार, संरक्षण क्षेत्रातही बॉब यांचे मोठे योगदान आहे. ऑस्ट्रेलियात अर्थव्यवस्थेची दारे खुली करताना जाचक कर व परवाना पद्धतीत त्यांनी आमूलाग्र बदल केला.  १९९१ मध्ये पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्या-नंतरही महत्त्वाच्या विषयांवर भूमिका मांडण्याची परंपरा त्यांनी कायम राखली. इराक युद्धातील ऑस्ट्रेलियाच्या सहभागास त्यांनी विरोध नोंदवला होता. ते बीअरप्रेमी आणि क्रिकेटप्रेमी म्हणूनही ओळखले जात. राजकीय निवृत्तीनंतर ते वैवाहिक आयुष्यातील वादळामुळे चर्चेत आले. त्यांनी पत्नी हॅझेल यांच्याशी काडीमोड घेऊन १९९५ मध्ये दुसरे लग्न केले. मात्र दिलखुलास नेतृत्व म्हणून ऑस्ट्रेलियन जनतेचे त्यांच्यावरील प्रेम कायम राहिले. सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन सरकार चालविण्याची त्यांची हातोटी ऑस्ट्रेलियात वाखाणली जाई. ऑस्ट्रेलियाच्या राजकीय इतिहासात मजूर पक्षाचे सर्वाधिक यशस्वी नेते ठरलेले बॉब हॉक १६ मे रोजी निवर्तले.