पुरातत्त्व संशोधक, इतिहासाचे साक्षेपी अभ्यासक, व्यासंगी वाचक, निरीश्वरवादी असलेले डॉ. यशवंत रायकर यांनी पुरातत्त्वज्ञ म्हणून दिलेले योगदान हे मोलाचे आहे. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाने पुरातत्त्व, धर्म व इतिहासाच्या क्षेत्रात केलेले संशोधन व लेखन हे देशाला प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांच्या निधनाने भारतीय पुरातत्त्व विषयातील एका पर्वाची अखेर झाली.

डॉ. रायकर यांचा जन्म १५ मार्च १९३२ रोजी अलिबाग येथे झाला. येथेच शालेय जीवन पूर्ण करून ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले. पुरातत्त्व इतिहासाची त्यांना आवड असल्याने बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठातून त्यांनी १९६५ मध्ये पीएच.डी. मिळवली. त्यानंतर लगेचच ते भोपाळच्या रीजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पीएच.डी. व प्राध्यापकीच्या अनुभवानंतर त्यांनी केंद्र सरकारच्या पुरातत्त्व खात्यात काम करण्यास सुरुवात केली. या काळात ते अरुणाचल प्रदेशमध्ये होते. तेथील इटा फोर्ट व अंदमान येथे उत्खनन करत अनेक बाबी त्यांनी प्रकाशात आणल्या. १९८० मध्ये ते मुंबईत आले व त्यांनी नेहरू सेंटर येथे ज्येष्ठ संशोधक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. ज्येष्ठ संशोधक व त्यांच्या आजवरच्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी येथेही आपल्या कामाची छाप उमटविली. येथील डिस्कव्हरी ऑफ इंडिया या प्रकल्पावर काम करणाऱ्यांपैकी ते एक असून त्यांनी या प्रकल्पाच्या स्थायी प्रदर्शनाच्या आराखडानिर्मितीत मोलाची कामगिरी केली. येथून निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांनी वृत्तपत्रात विविध सदरे लिहिणे सुरू केले. जगाला परिचित नसलेली अज्ञात मुंबई त्यांनी लोकांपुढे मांडली. त्यांच्या राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘मुंबई- ज्ञात व अज्ञात’ या पुस्तकातून या शहराला लाभलेला १५ शतकांचा वारसा, परकीय सत्तेच्या खाणाखुणा, मुंबई ज्यांनी ज्यांनी राखली त्या अनेक अज्ञात बाबींचा त्यांनी आढावा घेतला.
चिकित्सक व शास्त्रीय दृष्टिकोन बाळगल्याने ते निरीश्वरवादाकडे झुकलेले होते. साक्षेपी दृष्टीने चिंतन करण्याचा स्वभाव असल्याने त्यांनी धर्मावर लिखाण करण्यास सुरुवात केली. त्यांचे ‘अथातो ज्ञानजिज्ञासा’ हे दोन भागांतील पुस्तक अगदी अलीकडे प्रसिद्ध झाले. त्याचप्रमाणे ‘अथातो धर्मजिज्ञासा’ हे पुस्तक लिहून त्यांनी धर्माचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. बालपणीच्या आठवणींचा धांडोळा घेणारे ‘दामू देवबाग्याची दुनिया’ हे आत्मचरित्रपर पुस्तक त्यांनी लिहिले होते. शेवटपर्यंत त्यांचे लेखन सुरूच होते.