संगीतजगतातील वैयक्तिक आणि सामूहिक ओळख किती वेगळा परिणाम करू शकते, याचा प्रत्यय गेल्या आठवडय़ांमध्ये झालेल्या दोन मृत्यूंच्या बाबतीत दिसून आला. ‘पॉप कल्चर’ ढवळून काढणाऱ्या डेव्हिड बोव्हीच्या मृत्यूनंतर त्याच्या व्यक्तिमत्त्वापासून संगीताचे विच्छेदन जोमाने सुरू आहे. याच महिन्यात त्याच्या प्रसिद्ध झालेल्या अल्बममधील गाण्यांचा अन्वयार्थही संगीतपंडितांकडून जातीने काढला जातो आहे, पण त्याचसोबत ‘ईगल’ या रॉकबॅण्डचा संस्थापक गायक ग्लेन फ्रे या बोव्हीइतक्याच प्रभावशाली संगीतकाराचा याच काळात झालेला मृत्यू झाकोळला जातोय. ग्लेन फ्रे कोण हा प्रश्न पडेलच, मात्र ‘टेक इट इझी’, ‘पीसफुल टूनाइट’, ‘टकिला सनराइझ’, ‘ऑलरेडी गॉन’ ही गाणी ऐकली की, अरे ही तर आपण कुठल्या तरी जाहिरातीत किंवा कुठल्यातरी आपल्याच देशी गाण्यांत आढळल्याचे वाटू लागेल. भारतात एमटीव्ही क्लासिक पाहणाऱ्यांचे किंवा पूर्वीचे ९२.५ एफएम (पूर्णच इंग्रजी असणाऱ्या काळातील) ऐकणाऱ्यांचे कान ‘ईगल्स’ने संपृक्त झाले होते. १९९० नंतर भारतात जितके रॉक बॅण्ड आले, त्यांचे ‘हॉटेल कॅलिफोर्निया’ हे गाणे दैवत होते. (अमेरिकेतील चिरतरुण मनांतून अजूनही ते हद्दपार झालेले नाही. ) अन् भारतीय घरांत डेकस्टॉप पीसी सार्वत्रिक झाला तेव्हा ग्लेन फ्रेची सारी गाणी ईगलच्या रूपाने संगणकांच्या हार्डडिस्कवर जमली होती.
काहीच वर्षांपूर्वी दिवाळखोरीत गेलेल्या डेट्रॉइट या शहरात १९४८ मध्ये जन्मलेल्या ग्लेन फ्रे याने स्थानिक बारमध्ये गिटार वाजविण्यापासून संगीत कारकीर्दीला सुरुवात केली. संगीतातील बीटल्स, बायर्ड्स आणि साहित्यातील जॅक कॅरुअ‍ॅकच्या प्रभावातून तेथे बॅण्ड घडविला. करिअर घडवायला निघालेल्या गायिका मैत्रिणीला सोबत करण्यासाठी लॉस एंजेलिसला दाखल झाल्यानंतर त्या मैत्रिणीऐवजी ग्लेन फ्रे यांचेच करिअर बहरून आले. डॉन हेन्ले या मित्रासोबत तयार झालेल्या ईगल्स या बॅण्डने बीटल्सइतकीच लोकप्रियतेची उड्डाणे केली. व्हिएतनाम युद्ध, कुटुंब, लग्न संस्थांचे विघटन आणि तत्कालीन अमेरिकी तरुणांची धुसफुस ग्लेन फ्रे यांच्या शब्दांनी रॉक सुरावटीत मिसळून गेली. गिटार वादनाच्या श्रीगणेशा करण्यापासून ते त्यात मास्टरी मिळविणाऱ्या रॉक वादकांची नव्वदोत्तरीची संपूर्ण पिढी ग्लेन फ्रे यांच्या संगीतावर पोसली. त्यांनी वैयक्तिक अल्बमही काढले आणि बऱ्याच प्रसिद्ध झालेल्या चित्रपटांत त्यांचा अभिनयही झळकला. मात्र ईगल बॅण्डच्या सामूहिक ओळखीने त्यांच्या वैयक्तिक श्रेयाचा व्हायला हवा तितका गाजावाजा झाला नाही. कैक ग्रॅमी आणि पुरस्कार पदरी पडूनही ईगल मेंबर अशीच ओळख जिवंतपणी राहिली. मृत्यूनंतर आता त्यांचा चाहतावर्ग हे बदलायला सरसावलाय.