पत्रकारितेत बातमीदारीचा जो एक थरार असतो, तो शोध पत्रकार अनुभवत असतात. पण आता शोध पत्रकारिता ही अभावानेच आढळून येते. अमेरिकी पत्रकार रॉबर्ट एस. बॉयड यांनी १९७२ मध्ये शोध पत्रकारितेचा उत्तम नमुना असलेली एक बातमी दिली होती. त्याचा विषय होता, उपाध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या थॉमस एफ. इगलटन यांच्या मानसिक आरोग्याचा संशयास्पद इतिहास. त्यावेळी इगलटन यांना मानसिक उपचारांचा भाग म्हणून विजेचे धक्के दिले जात होते. अशी व्यक्ती देशाच्या उपाध्यक्षपदी असणे योग्य नाही, एवढेच दाखवून देण्याचा हेतू या बातमीत होता. या बातमीनंतर इगलटन यांना उमेदवारी मागे घ्यावी लागली. पत्रकारितेतील या यशकथेचे मानकरी असलेल्या बॉयड यांचे नुकतेच निधन झाले.

१९२८ साली शिकागोत जन्मलेले बॉयड १९४५ साली पदवीधर झाले. पुढे सीआयए या गुप्तचर संस्थेत काम करून ते पत्रकारितेकडे वळले. म्हणजे आधीचे क्षेत्र गुपिते शोधण्याचे आणि नंतरचे ती फोडण्याचे. परंतु कुठल्याही पत्रकाराला हेवा वाटावा असे गुण त्यांच्यात होते. १९६७ मध्ये त्यांनी ‘नाइट न्यूजपेपर्स’ व नंतर ‘नाइट रीडर’ या वृत्तपत्रात वॉशिंग्टनविषयक वृत्तप्रमुख म्हणून काम केले. मृदुभाषी व्यक्तिमत्त्वाच्या बॉयड यांना सहा भाषा अवगत होत्या. पण त्यांनी कधी पांडित्याचा आव आणला नाही. राजकीय वर्तुळातील त्यांच्या बातम्या परिणामकारक असत, कारण त्यांच्या बातम्यांचे स्रोत हे आतल्या गोटातले असत. त्यांच्या वार्ताकन कामगिरीत त्यांनी क्युबाचा केलेला दौरा आणि नंतर १९७० मध्ये व्हिएतनाम युद्धावेळी हनोई येथे दिलेली भेट महत्त्वाची होती. अध्यक्ष रीचर्ड निक्सन यांच्यासमवेत ते १९७२ च्या फेब्रुवारीत चीनलाही जाऊन आले.

थॉमस इगलटन यांच्या मानसिक आरोग्याबाबत खात्रीलायक बातमी देताना त्यांनी रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून माहिती मिळवली होती. त्यामुळे बॉयड यांच्या वृत्तान्तानंतर इगलटन यांना त्यांच्यावर मानसिक उपचार सुरू असल्याची कबुली जाहीरपणे द्यावी लागलीच; शिवाय नंतर उमेदवारीही मागे घ्यावी लागली. या बातमीसाठी बॉयड यांना पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या निधनाने एक बुद्धिमान आणि शेवटपर्यंत आजूबाजूच्या घडामोडींबाबत कुतूहल असलेला हाडाचा पत्रकार काळाआड गेला आहे.