‘स्वत:कडे मोटार असताना उसेन बोल्ट का धावतो’ या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे; शारीरिक सामर्थ्यांचे सकारात्मक समर्थन घडवण्यात एक वेगळी जिद्द तो त्यातून दाखवत असतो. उसेन बोल्टच्या कामगिरीमुळे पुढच्या पिढय़ांना अशीच प्रेरणा मिळत असते. तसेच गणकयंत्रापासून महासंगणकापर्यंत आकडेमोडीच्या अनेक सुविधा उपलब्ध असताना काही लोक आकडेमोडीत विक्रम करतात, तेव्हा शकुंतला देवी यांची आठवण आल्याशिवाय राहात नाही. भारताच्या नीळकंठ भानु प्रकाश याने ‘जगातील सर्वात वेगवान मानवी गणकयंत्र’ (ह्यूमन कॅलक्युलेटर) हा किताब नुकताच पटकावला आहे. लंडन येथे झालेल्या मेंटल स्पोर्ट्स ऑलिम्पियाडमध्ये त्याने हे सुवर्णपदक मिळवले. गेल्या २३ वर्षांत असा मान पटकावणारा तो पहिलाच भारतीय. वयाच्या विसाव्या वर्षी त्याने केलेली ही कामगिरी स्तिमित करणारीच आहे. प्रकाश हा दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजचा पदवीधर. वयाच्या पाचव्या वर्षी त्याला अपघात होऊन डोक्याला जखम झाली होती. त्या विश्रांतीच्या काळात त्याला गणिती कोडी सोडवण्याचा छंदच जडला. सतत डोळ्यासमोर आकडेमोड दिसू लागली. वयाच्या आठव्या वर्षी त्याने अंकगणिताची स्पर्धा स्थानिक पातळीवर जिंकली. प्रकाशच्या घरात खरे तर कुणीही गणितज्ञ नाही. त्याचे वडील वनस्पतिशास्त्र व जनुकशास्त्र शिकलेले आहेत, ते केचअपचा कारखाना चालवतात. एका बहिणीला फॅशन विषयात रस आहे. प्रकाशने ऑलिम्पियाडमध्ये १६७ गुण मिळवले. एका प्रश्नावर तर त्याने अगदी दशांशापर्यंत अचूक उत्तर दिले, ते पाहून आयोजकही आश्चर्यचकित झाले. गणिती आकडेमोड कागद-पेन्सिल न घेता केवळ मेंदूच्या पातळीवर करणारे लोक फार थोडे, त्यात भारताला श्रीनिवास रामानुजन व शकुंतला देवी यांच्यासारख्यांचा वारसा लाभला आहे.

गुणाकार, भागाकार यांसारख्या गणिती प्रक्रियांत स्कॉट फ्लॅन्सबर्ग व शकुंतला देवी यांनी अनेक विक्रम केले आहेत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार यांत वेगळे विक्रम करण्याचा त्याचा इरादा आहे. प्रकाशने पदवीपूर्वीच ‘एक्स्प्लोरिंग इन्फिनिटिज’ या नवोद्योगाची सुरुवात केली असून गणिताचे धडे घेऊन मुलांची आकलनशक्ती वाढवणारा हा उद्योग आहे. २०१६ नंतर स्पर्धामध्ये भाग घेणे कमी करून त्याच्या या उद्योगावर लक्ष केंद्रित केले. मुलांमधील गणिताची भीती घालवण्याचा त्याचा हेतू होता. आता व्यवसायासाठी प्रसिद्धीला मदत होईल, इतक्याच स्पर्धामध्ये स्वत: भाग घेण्याचा त्याचा इरादा आहे.

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
kasturi cotton
कस्तुरी कॉटन…देशातील सर्वोत्तम कापूस!
World's youngest billionaire List By Forbes
१९ वर्षीय तरुणी ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती? भारतात हा मान कुणाला मिळाला, हे ही पाहा
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?