शहरीकरण, वृक्षतोड, मग पर्यावरणवाद्यांचा आक्षेप, जागरूक नागरिकांचीही त्यांना साथ.. सरकारची या आंदोलकांना आश्वासने आणि सरकारी बाबू मात्र ढिम्मच.. हे चित्र देशातल्या कुठल्याही शहरात दिसू शकणारेच; पण याला अपवाद म्हणजे बेंगळूरु – कारण इथे एस. जी. नेगिनहाळ होते!

बेंगळूरुत ‘लालबाग’ आणि ‘कबन पार्क’ ही उपवने १७६० मध्ये हैदरअलीच्या फर्मानामुळे फुलली, ब्रिटिश काळात रस्त्यांवरही वृक्षलागवड झाली. पण १९६० नंतर शहरीकरणाच्या नावाखाली रस्तोरस्ती झाडांची कत्तल होत गेली आणि १९८०च्या दशकात ती शिगेला पोहोचली, तेव्हा बांदीपूर अभयारण्यात उत्तम काम करून दाखवणारे भारतीय वन सेवेचे अधिकारी नेगिनहाळ यांना ‘बंगलोर शहर वन क्षेत्रा’त आणवण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री गुंडुराव यांनी घेतला. रस्तारुंदी, पूलबांधणी आदी शहरीकरणाचे सारे चोचले पुरवूनही वृक्षतोड टाळता येते, हे नेगिनहाळ यांनी दाखवून दिले. रहिवाशांमध्ये वृक्षजागृतीचे काम करणारे नेगिनहाळ, शक्यतोवर लोकांना हवे असलेले वृक्ष त्या-त्या भागात लावून घेत. शहराचा अति-गजबजलेला, म्हणून वृक्षतोड झालेला ‘मॅजेस्टिक’ भाग नेगिनहाळ यांनी अक्षरश: रातोरात हिरवा केला. या बस स्थानकापासून आनंद राव चौकापर्यंतच्या एक किलोमीटरच्या पट्टय़ात प्रचंड रहदारी असल्याने मध्यरात्रीनंतर खड्डे करून, आधीच १५ फुटांपर्यंत वाढलेली झाडे ट्रकने आणून लावण्याचे काम उजाडण्यापूर्वीच त्यांनी फत्ते केले. हे एका प्रकारचे प्रशासकीय कौशल्य; तर शहरभर ३५० वृक्षमित्र नेमून त्यांच्याकरवी देखरेख आणि जागृती करविणे, हे दुसऱ्या प्रकारचे! दिल्लीत ‘शक्ति स्थल’ या इंदिरा गांधींच्या स्मृतिस्थळी वृक्षयोजनेसाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी नेगिनहाळ यांना खास पाचारण केले होते. हेही काम त्यांनी केले, पण त्यांचे आणखी महत्त्वाचे काम म्हणजे बांदीपूर हे कर्नाटकातील पहिले ‘व्याघ्र अभयारण्य’ नावारूपाला आणणे. ‘एस.जी.’ (सेतुराम गोपाळराव) हे मूळचे धारवाडचे आणि वडीलही वनाधिकारी; त्यामुळे उत्तर कर्नाटकातील वनसंपदेविषयी त्यांचा विशेष अभ्यास होता. सालीम अलींच्या पक्षी-सर्वेक्षणात उत्तर कर्नाटकातून मदत करणाऱ्या एस.जीं.नी ‘फॉरेस्ट ट्रीज् ऑफ वेस्टर्न घाट’ हे पुस्तकही लिहिले. वन्य-छायाचित्रणाचा छंद जोपासून, देशपातळीवरली बक्षिसेही मिळवली. ‘इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार’ (२००५) हा सरकारी, तर जिंदाल फाऊंडेशनचा कारकीर्द गौरव (२०१९) त्यांना मिळाले होते.

‘‘प्राणवायू- कर्बवायू संतुलनासाठी माणशी दोन झाडे लावा’’ असा संदेश देणाऱ्या एस.जीं.ना अखेर करोनामुळे कृत्रिम, वैद्यकीय प्राणवायूची गरज भासली. त्यातच, २ मे रोजी त्यांचे निधन झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.