‘आम आदमी’च्या समस्यांविषयी आज चर्चा होते पण डॉ. राममनोहर लोहिया यांनी १९६४-६५ मध्ये संसदेत ‘आम आदमी’च्या कमाईवर चर्चा केली होती, त्यात त्यांनी ही कमाई दिवसाला तीन आणे असल्याचे सांगितले होते. हा आकडा त्यांना अर्थतज्ज्ञ व साहित्यिक, विचारवंत प्रा. कृष्णनाथ शर्मा यांनी काढून दिला होता. आम आदमीची कमाई रोज १५ आणे आहे, असे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना वाटत होते त्यांचा भ्रम त्या वेळी लोहियांनी शर्माच्या मदतीने दूर केला होता. विद्वान प्राध्यापक, अर्थशास्त्रज्ञ व बौद्ध तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक असलेले प्रा. कृष्णनाथ शर्मा यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक समाजवादी विचारवंत काळाच्या पडद्याआड गेला आहे.
आचार्य नरेंद्र देव यांच्या प्रेरणेने ते १९५० मध्ये समाजवादी आंदोलनात सहभागी झाले होते. आदिवासींचे जीवन समजून घेण्यासाठी ते पाच वर्षे बस्तरच्या जंगलात राहिले होते. १९५६ मध्ये काशी विश्वनाथ मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी राजनारायण यांच्याबरोबर तुरुंगवास पत्करला होता. प्रा. कृष्णनाथ यांचा जन्म १९३४ मध्ये उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला. १९६१ मध्ये ते काशी विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक झाले व १९९४ मध्ये विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाले. डॉ. राममनोहर लोहिया यांच्या आंदोलनांमध्ये ते सक्रिय होते. १९९२ मध्ये उत्तर प्रदेश सरकारने त्यांना लोहिया पुरस्कार प्रदान केला. त्यांचे बौद्ध धर्माविषयीचे ज्ञान पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अलीकडेच गौरवले. विचारसरणीच्या भिंती ओलांडणारा विद्वान असेच त्यांचे वर्णन करावे लागेल. ‘इम्पॅक्ट ऑफ फॉरेन एड’, ‘लद्दाख में राग विराग’, ‘किन्नर धर्म लोक’, ‘स्पीति में बारिश’, ‘पृथ्वी परिक्रमा’, ‘बौद्ध निबंधावली’, ‘अरुणाचल यात्रा’ व ‘हिमालय यात्रा’ ही त्यांची साहित्यसंपदा आहे. ‘जन’, ‘मनकाइंड’, ‘अंग्रेजी हटाव’ या नियतकालिकांचे ते संपादक होते. सारनाथ येथील तिबेट विद्या संस्थानशीही ते जवळून संबंधित होते. अखेरच्या काळात त्यांनी वैराग्य पत्करले होते व कर्नाटकमधील जे. कृ ष्णमूर्ती फाउंडेशन परिसरात त्यांचे अखेरचे वास्तव्य होते. ब्रह्मविद्या परंपरेचे पाईक असलेले शर्मा हे ज्येष्ठ विचारवंत जे. कृष्णमूर्ती व दलाई लामा यांचे सहकारी होते. अर्थशास्त्रापेक्षा हिंदी साहित्यिक म्हणून ते प्रसिद्ध होते. संपत्तीचा लोभ न ठेवता केवळ ज्ञानसाधना करणारे प्रा. कृष्णनाथ शर्मा खरे संतांचे जीवन जगले. असे आजकाल खूप कमी पाहायला मिळते. प्रसारमाध्यमांच्या झोतापासून ते नेहमी दूरच राहिले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Sep 2015 रोजी प्रकाशित
प्रा. कृष्णनाथ शर्मा
आम आदमीची कमाई रोज १५ आणे आहे, असे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना वाटत होते .
Written by रत्नाकर पवार

First published on: 10-09-2015 at 01:41 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Profile of mr krushnanath sharma