संगीताची निर्मिती नैसर्गिक प्रेरणेतून होते हे खरे असले तरी त्यात मानवी मेंदूचा फार मोठा वाटा असतो. एवढेच नव्हे तर, संगीत श्रवणानंतर आपल्याला येणाऱ्या सुखावह, तरल अनुभूतीतही मेंदूचीच भूमिका महत्त्वाची असते. मेंदूला संगीताची ओळख कशी पटते हा फार गूढ प्रश्न आहे. त्या प्रश्नावर काम करणारे डॉ. रॉबर्ट झाटोरी यांना यंदा दी रॉयल नेदरलँडस अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेचा प्रतिष्ठेचा काव्‍‌र्हालो-हेनकेन पुरस्कार जाहीर झाला आहे. आपली चेतासंस्था संगीतनिर्मिती व संगीत आनंद या दोन्हीत महत्त्वाची भूमिका पार पाडते. लोक संगीत वेगवेगळ्या माध्यमांतून ऐकतात व त्याची त्यांना येणारी अनुभूती वेगवेगळी असते, असे झाटोरी यांनी संज्ञापनाचा मूलभूत आविष्कार असलेल्या संगीताच्या मानवी बोधनाबाबत म्हटले आहे. एखादे संगीत गोड वाटते तर दुसरे कर्णकटू, पण हा फरक माणूस कसा करू शकतो याचा उलगडा त्यांनी केला आहे. त्यांच्या मते आपल्या मेंदूच्या डाव्या अर्धगोलार्धात गाण्याच्या सुरावटींवर बोधनात्मक प्रक्रिया केली जाते, तर उजव्या अर्धगोलार्धात त्याचा गोडवा नोंदवला जातो! आतापर्यंत आपल्याला हे माहिती आहे की, मेंदूच्या डाव्या भागाला इजा झाली तर बोलण्यावर, भाषा समजण्यावर अनिष्ट परिणाम होतो तर उजव्या भागात काही दोष असेल तर तुम्ही संगीताचा आनंद नीट लुटू शकत नाही. झाटोरी यांच्या गटाने एफएमआरआय म्हणजे चुंबकीय सस्पंदन पद्धतीने मेंदूचा अभ्यास केला. लोक जेव्हा भावविभोर संगीताचे श्रवण करतात तेव्हा त्यांना जास्त चांगली अनुभूती येते. त्या संगीताच्या परमावधीला ते आनंदाने शहारतात, रोमांचित होतात. मेंदूतून डोपामाइन नावाचे रसायन सुटल्याने त्यांना हा आनंद मिळतो. जीवनसंघर्षांत टिकून राहण्यासाठी जेव्हा आपण अन्नसेवन वा इतर गोष्टी करतो तेव्हाही डोपामाइनच महत्त्वाची भूमिका पार पाडते. पण संगीत आणि मेंदूविज्ञान यांची मैफल जुळवण्याचे काम झाटोरी यांनी केले. त्यांचा जन्म ब्युनॉस आयर्सचा. मानसशास्त्र व संगीत यांचा त्यांनी बोस्टन विद्यापीठात अभ्यास केला. त्यांनी २००६ मध्ये इंटरनॅशनल लॅबोरेटरी फॉर ब्रेन म्युझिक अँड साऊंड रीसर्च ही संस्था माँट्रियल येथे स्थापन केली. त्यांना यापूर्वी न्यूरो प्लास्टिसिटी पुरस्कार, ह्य़ुज नोवेल्स पारितोषिक, ऑलिव्हर सॅक्स पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले. त्यांच्या या पुरस्काराने त्यांच्यातील वैज्ञानिक व संगीतप्रेमी अशा दोन्हींना न्याय मिळाला आहे.