16 July 2019

News Flash

एस. संबंदम् शिवचारियार

शिवचारियार यांच्या निधनाची वार्ता गेल्या बुधवारी, १९ जून रोजी आली.. नाडि, तमिळ, ग्रंथ लिप्यांतील अनेक हस्तलिखिते पोरकी झाली.

एस. संबंदम् शिवचारियार

पुद्दुचेरीतील ‘फ्रेंच इन्स्टिटय़ूट’च्या ग्रंथालयातील दुर्मीळ हस्तलिखितांच्या ठेव्याला युनेस्कोने ‘जागतिक वारसा’ अशी मान्यता दिली, याचे श्रेय मोठय़ा प्रमाणात एस. संबंदम् शिवचारियार यांच्या परिश्रमांना जाते. सन १९६९ पासून या संस्थेशी एकरूप होण्यापूर्वी त्यांनी तंजावूरचे सरस्वती महाल ग्रंथागार, चेन्नईतील शासकीय हस्तलिखितागार, ‘म्हैसूर ओरिएंटल रीसर्च लायब्ररी’ आदी संस्थांसह काम केले होते. कसले काम? – ठिकठिकाणांहून जुन्या हस्तलिखितांचा शोध घेणे, त्यांतील लिपी-आशय जाणून त्यांचे आधी वर्गीकरण करणे, मग लिपी प्राचीन असेल तर तिचे लिप्यंतर देवनागरीत करणे आणि मूळ हस्तलिखिताला छापील ग्रंथरूप देणे.. हे सारे! हे काम त्यांनी जवळपास एकहाती केले. आजच्या तमिळ लिपीपूर्वी जी प्राचीन ‘ग्रंथ’(/ग्रंथा) लिपी होती, तिचा छापखाना उभारण्यासाठी देखील संबंदम् शिवचारियार यांनीच सर्व खटपटी केल्या. हा छापखाना उभा राहिला, शिवचारियार यांनी संपादित केलेले अनेक ग्रंथ त्यामुळे लोकांहाती पोहोचले.

शिवचारियार यांच्या निधनाची वार्ता गेल्या बुधवारी, १९ जून रोजी आली.. नाडि, तमिळ, ग्रंथ लिप्यांतील अनेक हस्तलिखिते पोरकी झाली.

तरुणपणापासून या हस्तलिखितांचा शोध त्यांनी सुरू ठेवला होता. त्यांचा जन्म सहा जानेवारी १९२७ चा आणि वयाच्या सातव्या वर्षीपासून वडिलांनी शिकविलेले धार्मिक विधींचे काम त्यांनी अस्खलितपणे करून दाखविले होते. पण निव्वळ या पौरोहित्यात त्यांचे मन रमेना. तरुणपणीच त्यांना आध्यात्मविषयक प्रश्न पडू लागले, त्यांचा शोध ते ग्रंथांतून घेऊ लागले. वयाच्या ऐन विशी-बाविशीत त्यांनी हस्तलिखितांचा शोध सुरू केला आणि पंच्याहत्तरी झाली तरी भ्रमंती सुरूच राहिली. अगदी वयाच्या नव्वदीतही ते या हस्तलिखितांमध्ये गढलेले असत.

फ्रान्सचा ‘ऑद्र्र दे पाम अकादेमीक’ हा प्रतिष्ठेचा नागरी पुरस्कार त्यांना २००९ साल मिळाला, तेव्हा ‘आठ हजार हस्तलिखिते आहेत एकूण- त्यापैकी फक्त २५ टक्के हस्तलिखितांवरच मी काम करू शकलो, आणखी बरेच काम बाकी आहे’ असे ८३ वर्षांचे संबंदम् शिवचारियार म्हणत होते! शैव पंथाचे आध्यात्मसाहित्य, ‘शैवागम’ हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय होता. फ्रेंच इन्स्टिटय़ूटच्या ‘शैवागम माले’चे ते संपादकही होते. त्यांच्या निधनाने प्राचीन आध्यात्मसाहित्याच्या अभ्यासाचा एक दुवा निखळला आहे.

First Published on June 25, 2019 12:03 am

Web Title: s sambandam shivacharyar profile abn 97