जन्मच मुळी कलासक्त घराण्यातला. आधुनिक मराठी नाटकांचे आद्य प्रवर्तक नाटककार विष्णुदास भावे यांची पणती असलेल्या डॉ. श्यामला भावे यांचे नाव महाराष्ट्रातील आजच्या पिढीला कदाचित परिचित नसेल, परंतु एक काळ या उभयगानविदुषी असलेल्या कलावतीने कर्नाटकच्या राजधानीतून म्हणजे बंगळूरुमधून सारा देश केवळ आपल्या संगीताने पादाक्रांत  केला होता. भावे कुटुंब महाराष्ट्र सोडून बंगळूरुला गेले, याचे कारण विष्णु दिगंबर पलुस्कर हे होते. श्यामलाताईंचे वडील गोविंदराव हे पलुस्करांचे शिष्य. भारतीय संगीताच्या प्रसारासाठी त्यांना तिकडे जाण्याचा आदेश मिळाला आणि कसलाही विचार न करता ते तिथे पोहोचले. श्यामलाताईंनी एकाच वेळी उत्तर हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीतावर आपले प्रभुत्व सिद्ध केल्याने, त्यांना साक्षात सर विश्वेश्वरैया यांनीच ‘उभयगानविदुषी’ ही पदवी दिली. तिचे श्यामलाताईंनी आयुष्यभर चीज केले.

वयाच्या सहाव्या वर्षी पहिल्यांदा गायन केलेल्या या कलावतीने नंतरच्या आयुष्यात संगीताच्या विकासासाठी, प्रसारासाठी अतिशय भरीव कामगिरी केली. पण त्यांच्या भाळी थोर व्यक्तींच्या सहवासाचे जे आशीर्वाद लिहिले होते, ते अद्भुत म्हणावेत असे! म्हणजे, त्यांच्या बारशाला बंगळूरुमध्ये बालगंधर्व आणि मा. दीनानाथ अशा दोन दिग्गजांचे गायन झाले. सर विश्वेश्वरैया यांना डी.लिट. पदवी मिळाल्यानंतर झालेल्या सत्कार समारंभात भारतीय कलांगणात ज्या दोन संगीत परंपरा एकमेकांशी फटकून होत्या, त्यांना एकत्र आणून सर्वाना चकित करणाऱ्या श्यामलाताईंनी नंतरच्या आयुष्यात या दोन्ही परंपरा टिकवून ठेवण्याचे मोठे कार्य केले. कर्नाटक संगीत नृत्य अकादमीच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी केलेली कामगिरी आजही सर्वाच्या स्मरणात राहणारी ठरली आहे. भारतीय संगीताच्या मैफिलीत गायकाच्या मागे दोन तंबोरे असतात. त्यातील एक पंचमाचा, तर दुसरा निषादाचा. श्यामलाताईंनी सहा तारांच्या एकाच तंबोऱ्यात या दोन तंबोऱ्यांना समाविष्ट केले. या प्रयोगाला कलावंतांकडून उत्स्फूर्त वाहवा मिळाली. गायन, वादन आणि नृत्य या संगीताच्या तिन्ही प्रांतांत आपले प्रभुत्व सिद्ध केलेल्या श्यामलाताई दहा-बारा भाषांमध्ये गायन करत असत. पहिल्याच स्वरात संपूर्ण मैफील काबीज करणाऱ्या श्यामलाताई या दोन्ही संगीत परंपरांमध्ये लोकप्रिय आणि अभिजात कलावंत म्हणून रसिकप्रिय झाल्या.

म्हैसूर मुक्त विद्यापीठाने त्यांच्या या कार्याबद्दल सन्माननीय डी.लिट. ही पदवीही त्यांना बहाल केली. विविध वाद्यांचा संग्रह हे त्यांचे अतिशय आवडीचे काम. त्यांच्या घरात अशी अनेक वाद्ये अतिशय जपून ठेवण्यात आली आहेत. सांगलीहून हिंदुस्थानी संगीताचा प्रसार करण्याच्या हेतूने कर्नाटकात पोहोचलेल्या भावे कुटुंबाने तिथल्या समाजाशी आपली नाळ जोडली, हे खरेच. परंतु कर्नाटकातील कलासक्त सामाजिक व्यवहारात तेथील संगीत परंपरेशिवाय गायन करणाऱ्या कलावंतांनाही अतिशय आपलेपणाने वागवले, हे लक्षात घ्यायला हवे. केवळ हिंदुस्थानी संगीत गाणाऱ्या गंगूबाई हनगळ यांनाही कर्नाटकाने संगीतातील सम्राज्ञीपद दिले. कलांच्या क्षेत्रात अन्य राज्यांनी हा कित्ता गिरवणे किती आवश्यक आहे, हे श्यामलाताईंमुळे लक्षात येते. त्यांच्या निधनाने हा दोन परंपरांना सांभाळणारा स्वरदुवा लोपला आहे.