व्हायोलिन या वाद्याचा शिरकाव भारतीय उपखंडात वसाहतवादानंतरचाच. पण कर्नाटक संगीत या अभिजात संगीतप्रकारात हे वाद्य रुजले. लालगुडी जयरामन यांच्यासारख्या दिग्गजाने कर्नाटकशैलीतील लालित्यपूर्ण व्हायोलिनवादन जगभर नेले. त्याच पिढीतील, पण जयरामन यांनी धरलेल्या लालित्याच्या वाटेऐवजी पारंपरिक, शास्त्रोक्त वाटेवरून टी. एन. कृष्णन चालत राहिले. त्यांचे निधन २ नोव्हेंबर रोजी झाले आणि कर्नाटक संगीताचा परिवर्तनकाळ पाहिलेला एक संगीतकार निमाला.

मंदिरे, श्रीमंत जमीनदार वा विवाहासारखे सोहळे यांतच सीमित झालेली कर्नाटक संगीताची परंपरा ‘तबकडय़ां’च्या व ‘संगीतसभां’च्या काळाकडे सरकत होती तेव्हा- वयाच्या अकराव्या वर्षी (१९३९) पहिले एकल वादन टीएन ऊर्फ त्रिपुनितुर नारायणनायर कृष्णन यांनी केले. त्यांचे वडील गायक व हौशी वादकही, पण आठव्या वर्षीपासून विविध गुरूंकडे व्हायोलिनचाच सराव कृष्णन यांनी केला. किशोरवयातच मद्रासला सीमनगुडी श्रीनिवासन (हेच लालगुडींचेही गुरू) यांच्याकडे शिकण्यासाठी ते आले. त्यागराजांच्या ‘कृती’ घटवून घेणारे सीमनगुडी हे स्वत:देखील काही कृतींचे रचनाकार होते. व्हायोलिन हाच श्वास मानणाऱ्या कृष्णन यांनी प्रत्येक कृती तंतोतंत वाजवताना, तिच्या विस्तारावर अधिक भर दिला. त्यांच्या तरुणपणापासूनचे हे वैशिष्टय़, अगदी १९९०च्या दशकातील त्यांच्या वादनाच्या संचिकांमध्येही (म्युझिक आल्बम) टिकले. प्रयोग असे काही कृष्णन यांनी केले नाहीत. व्हायोलिन विदुषी एन. राजम यांच्यासह कृष्णन यांनी केलेले सहवादन हा ‘प्रयोग’ ठरला; पण त्याचे श्रेय राजम यांना होते. कारण अशा सहवादनात त्या हिंदुस्तानी ढंगाने राग सादर करीत आणि कृष्णन त्याच्या समकक्ष रागाचे कर्नाटकी स्वरूप दाखवीत. भैरवी वाजवीत, तीही कर्नाटक शिस्तीनेच. मात्र त्यामुळेच ‘हरिकम्बोजि’सारख्या रागाचे शुद्ध स्वरूप ते जपू शकले. ‘वातापि गणपति’, ‘बंटुरीतिकोलुम्’ यांसारख्या जवळपास प्रत्येकाने सादर केलेल्या कृती त्यांनी अधिक विस्ताराने मांडल्या. ‘स्वररागसुधा’ या कृतीचा तब्बल अर्ध्या तासाहून अधिक काळ त्यांनी केलेला विस्तार, हा मात्र श्रवणीय अनुभव ठरतो. याचे कारण, त्यांनी रचनांचा केलेला सैद्धान्तिक विचार. हिंदुस्तानी संगीत त्यांना ‘परके’ नव्हते- दिल्ली विद्यापीठात ते संगीताचे प्राध्यापक होते.

पद्मश्री (१९७३), पद्मभूषण (१९९२), त्याआधी मद्रास अ‍ॅकॅडमीचा ‘संगीत कलानिधी’ (१९८०), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७३) असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. संगीत नाटक अकादमीचे ते अध्यक्षही होते.