News Flash

विरूपाक्ष कुलकर्णी

संरक्षण खात्याच्या हाय एक्सप्लोजिव्ह कारखान्यात इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून काम करीत असलेल्या विरूपाक्ष यांना साहित्याची फारच आवड होती

विरूपाक्ष कुलकर्णी

केवळ उत्तम अनुवादक अशी विरूपाक्ष कुलकर्णी यांची ओळख नाही. उमा विरूपाक्ष यांचे पती म्हणूनही त्यांची खास अशी ओळख साहित्य जगताला आहे. पतीने मराठीतील साहित्य कन्नडमध्ये अनुवादित करायचे, तर पत्नी उमाताईंनी कन्नड भाषेतील कलाकृतींचा मराठी अनुवाद करायचा. अनुवाद के वळ शब्दाला शब्द असा न करणे अभिप्रेत असते. त्यामध्ये त्या कलाकृतीचा सारा गर्भ उतरला पाहिजे, अशी अपेक्षा असते. विरूपाक्ष यांनी केलेले कन्नड अनुवाद शेजारच्याच कर्नाटकात खूप वाचकप्रिय झाले. उमाताईंना महाराष्ट्राने त्यांच्या कार्याबद्दल कौतुकाची शाबासकीही दिली. परंतु हे काम या पतीपत्नींनी मिळून के ले.

संरक्षण खात्याच्या हाय एक्सप्लोजिव्ह कारखान्यात इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून काम करीत असलेल्या विरूपाक्ष यांना साहित्याची फारच आवड होती. कर्नाटकातून पुण्यात आल्यानंतर त्यांची ही आवड टिकली, याचे कारण पत्नी उमा यांची त्यांना साथ होती. या दोघांनी मिळून दोन्ही भाषांमधील साहित्याच्या चौकटी अधिक मोठ्या के ल्या. विरूपाक्ष यांनी के वळ अनुवाद के ले नाहीत, तर पत्नीला मराठीतून अनुवाद करण्यासाठी सक्रिय प्रोत्साहन दिले. उमाताईंना कन्नड लिपी वाचता येत नाही, म्हणून विरूपाक्ष त्यांच्यासाठी कन्नड साहित्याचे वाचन ध्वनिमुद्रित करून ठेवत. कार्यालयातून ते परत येईपर्यंत उमाताईंचे काम चाले. नंतर त्यावर आणि एकूणच साहित्यावर साधकबाधक चर्चा होई आणि तो अनुवाद वाचकांपर्यंत पोहोचे. गेली सुमारे चार दशके  हा अनुवादयज्ञ व्यवस्थितपणे सुरू राहिला. विरूपाक्ष यांच्या अचानक झालेल्या निधनाने त्यात खंड पडला आहे. मितभाषी, तरीही आपल्या मुद्द्यावर ठाम असणारे विरूपाक्ष साहित्यविषयक कार्यक्रमांना हजेरी लावत. त्याबद्दल मृदू भाषेत क्वचित टिप्पणीही करत. परंतु स्वत: कोणी ज्येष्ठ साहित्यिक आहोत, आपल्या नावावरही पंचवीसहून अधिक अनुवाद प्रसिद्ध आहेत, असा आविर्भाव त्यांच्या वर्तनातून कधीही प्रतीत होत नसे.

‘लोकसत्ता’मध्येच प्रकाशित झालेल्या त्यांच्या लेखात विरूपाक्ष यांनी लिहिले आहे की, दोघांचाच संसार असल्यामुळे आम्हाला स्वत:चा अवकाशही मिळत होता. मुळात दोघांमध्येही मोकळा संवाद असल्यामुळे विसंवादाला फारसा वाव राहिला नाही. आकड्यांच्या हिशेबात उमाताईंच्या नावावर असलेले अनुवादित साहित्य अधिक. पण विरूपाक्ष यांना त्याचे कधीच वैषम्य वाटले नाही. ‘करंटे पुरुषच असा विचार करतात’, असे त्यांचे चोख उत्तर असे. सहजीवन अधिक समृद्ध कसे होईल आणि त्यातून समाजालाही काही कसे देता येईल, याचा हा विचार विरूपाक्ष सतत करीत. मराठीजनांना एरवी अन्य भाषांबद्दल, (त्यातही विशेषत: कन्नडबद्दल) असलेला दुराग्रह दूर करून अन्य भाषांमधील उत्तम साहित्यानुभव देण्यासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आणि आपल्या पत्नीलाही त्या कार्यात सामावून घेतले. मराठी साहित्यिकांच्या साहित्यकृती कन्नड भाषकांपर्यंत पोहोचविण्याची त्यांची कामगिरी म्हणूनच अधोरेखित करणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 12:05 am

Web Title: virupaksha kulkarni profile abn 97
Next Stories
1 डॉ. बी. बी. गायतोंडे
2 वीरा साथीदार
3 तु. शं. कुळकर्णी
Just Now!
X