स्त्रीच्या जन्माची इतिकर्तव्यता आई होण्यातच आहे, स्त्रीने करिअरसाठी मातृत्व नाकारणे हा तर स्वार्थीपणाचा कळस आहे ही मानसिकता केवळ भारतीय किंवा पौर्वात्य समाजांपुरती मर्यादित नाही, तर पाश्चिमात्य समाजही यातून बाहेर पडलेले नाहीत. त्यात हॉलिवूडसारख्या मुक्त आणि व्यक्तिवादी समजल्या जाणाऱ्या विश्वातही मुलाला जन्म न दिल्याबद्दल एखाद्या स्त्रीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रकार घडू शकतो याचा प्रत्यय जेनिफर अ‍ॅनिस्टन या प्रख्यात अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून आला आहे.

आणखी वाचा : एकटेपणा, साचलेपण छंदच दूर करतात- अभिनेत्री सारिका

‘फ्रेण्ड्स’सारख्या दीर्घकाळ चाललेल्या टीव्ही मालिकेतील भूमिकेमुळे तसेच अनेक चित्रपटांमुळे कायम प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या जेनिफर यांना त्यांच्या वयाच्या तिशी-चाळिशीत ‘मूल नसणे’ या बाबीवरून अनेक आरोपांचा सामना करावा लागला होता, जेनिफर यांना मूल नसल्यावरून माध्यमांनी दीर्घकाळ केलेल्या गॉसिपचाही खूप त्रास त्यांना सहन करावा लागला, असे जेनिफर यांनी ‘बीबीसी’ला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नमूद केले. जेनिफर सांगतात, “आई होण्याची शक्यता होती त्या वयात या दोषारोपांमुळे मी मूल होण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले, आयव्हीएफच्या अनेक सायकल्समधून गेले, चायनीज टी पिण्यापर्यंत अनेक उपाय करून पाहिले. माझ्यासाठी हा काळ खूपच खडतर होता. प्रजननक्षम वयाचा टप्पा निघून गेल्यानंतरही मूल जन्माला घालता यावे म्हणून मला ‘एग्ज फ्रीज’ करून ठेवण्याचा सल्ला दिला असता, तर मी तेही केले असते.”

आणखी वाचा : अभियंता ते लेफ्टनंट गव्हर्नर…असा आहे अरुणा मिलर यांचा प्रवास

तब्बल दहा वर्षे चाललेल्या ‘फ्रेण्ड्स’ मालिकेतील जेनिफर यांची व्यक्तिरेखा जगभरातील प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय होती आणि त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही प्राप्त झाले. जेनिफर यांच्या अनेक चित्रपटांतील भूमिकाही गाजल्या. त्यांनी २००६ मध्ये एका लघुपटाचे दिग्दर्शनही केले. जेनिफर या जगातील सर्वाधिक मानधन प्राप्त करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहेत. सामाजिक कामांसाठी सढळ हाताने देणग्या देणाऱ्या म्हणून त्या ओळखल्या जातात. अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या त्या खंद्या समर्थक आहेत.

आणखी वाचा : स्त्रियांनो, मधुमेह टाळण्यासाठी काळजी घ्या!

एखादी अभिनेत्री लग्नबंधनात अडकल्यानंतर लगेचच ती गरोदर आहे की नाही याबद्दल अटकळ बांधणे, ती गरोदर नसेल तर त्यामागे काय कारणे असतील यांबद्दल तर्कवितर्क लढवणे या प्रकारांमध्ये भारतातील प्रसारमाध्यमेही किती टोकाला जाऊ शकतात हे आपण अनेक अभिनेत्रींबद्दल पाहत आलो आहोत. हॉलिवूडमध्येही पेज थ्री प्रकारची माध्यमे यात आघाडीवर आहेत. करिअरसाठी मातृत्व नाकारत असल्याच्या आरोपांच्या दबावाखाली आपण गरोदर होण्यासाठी सगळे प्रयत्न करत असताना, माध्यमे मात्र जेनिफर अ‍ॅनिस्टन गरोदर आहे व आपले गरोदर असणे गुप्त ठेवत आहे अशा स्वरूपाच्या बातम्या देत होती, असे जेनिफर यांनी नमूद केले.

आणखी वाचा : त्वचा कोरडी पडते? अशी घ्या काळजी…

२०००च्या दशकाच्या सुरुवातीला जेनिफर आणि अभिनेता ब्रॅड पिट लग्नबंधनात अडकले. २००५ मध्ये हे दोघे एकमेकांपासून विभक्त झाले. जेनिफर यांनी करिअरसाठी आई होण्यास नकार दिल्यामुळेच या दोघांचा घटस्फोट झाला; अशा चर्चांना त्यावेळी उधाण आले होते. त्यानंतर २०१५ मध्ये जेनिफर यांनी अभिनेता जस्टिन थेरॉक्स याच्याशी लग्नगाठ बांधली पण हे लग्नही फार काळ टिकू शकले नाही. ‘करिअरसाठी मातृत्व नाकारणारी स्त्री’ अशी जेनिफर यांची प्रतिमा निर्माण केली गेली. मात्र, आपल्या घटस्फोटांमागील कारण मूल न होऊ देणे हे अजिबात नव्हते, असे जेनिफर स्पष्ट करतात. ‘मूल नको असे मी कधीच म्हटले नव्हते’ असे त्या सांगतात.

आणखी वाचा : मधुमेहापासून बचावासाठी काय कराल, काय टाळाल?

हॉलिवूडमधील स्टार्सबद्दल गॉसिप्स छापणारी टॅब्लॉइड्स म्हणजे कॉमिक बुक्स आहेत असे समजून त्याकडे दुर्लक्ष करायचे कितीही ठरवले, तरी त्यांत छापून येणाऱ्या गोष्टींचा त्रास होतो, असे जेनिफर सांगतात. अखेरीस या चर्चांना वैतागून २०१६ मध्ये त्यांनी ‘द हफिंग्टन पोस्ट’ या वृत्तपत्रात यावर लेख लिहिला. ‘फॉर द रेकॉर्ड’ या शीर्षकाखालील लेखात जेनिफर यांनी लिहिले होते: “सर्वांच्या माहितीसाठी सांगते की मी गरोदर नाही. मात्र, माझ्या गरोदरपणाबद्दलच्या बातम्यांनी मी विटून गेले आहे. ‘पत्रकारिते’च्या नावाखाली एखाद्या स्त्रीची सतत परीक्षा बघत राहण्याच्या वृत्तीचा मला संताप वाटतो. मातृत्वाबद्दलचे प्रश्न, दोषारोप जवळजवळ दशकभर सहन केल्यानंतर मी हे लिहीत आहे.” माध्यमांच्या लेखी स्त्रीची किंमत केवळ तिच्या आई होण्यातच आहे का, असा प्रश्न जेनिफर यांनी या लेखाद्वारे विचारला होता.

आणखी वाचा : विश्लेषण : बॉलिवुड अभिनेत्री आणि प्रेग्नन्सी; करिअरवर काय परिणाम होतो? आलिया भट्टमुळे चर्चेला उधाण!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मातृत्वाबद्दल अटकळ असण्याचे वय आता जेनिफर यांनी ओलांडले आहे. ५३ वर्षीय जेनिफर सांगतात, “एकेकाळी आई होण्यासाठी सगळे प्रयत्न केले, पण आता ती वेळ निघून गेली आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आई झाले नाही याबद्दल आता मला अजिबात वाईट वाटत नाही. मूल होऊ न शकल्यामुळे करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करता आले, अनेक उत्तमोत्तम भूमिकांना न्याय देता आला याचा आता आनंद वाटतो.” स्त्री कितीही यशस्वी असली, तरी ती आई होऊ शकली नसेल तर सगळे व्यर्थ हा समज चुकीचा आहे. मूल न होण्याविषयी विचारले जाणारे प्रश्न दुखावणारे असतातच; पण एखाद्या स्त्रीला मूल नाही यावरून तिला स्वार्थी ठरवणे अधिक दुखावणारे आहे, असे मात्र त्या आवर्जून नमूद करतात.