सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकावर कोणता ना कोणता ताण आहेत. स्त्रियांना तर जास्त ताणाला सामोरं जावं लागतं. घर, संसार, मुलंबाळं, नातेसंबंध, पैसे, आर्थिक स्थिती, नोकरी, वर्किंग डे, सुट्टी, घरच्या जबाबदाऱ्या, सणसमारंभ ही यादी न संपणारीच असते. त्यामुळे आपण अनेकदा आपल्या क्षमतेपेक्षाही जास्त काम करतो. साहजिकच याचा परिणाम म्हणजे आपल्याला प्रचंड मानसिक थकवा येतो. त्यामुळे नवीन काही सुचणं शक्यच होत नाही. आपण पुन्हा पुन्हा त्याच चक्रात अडकत जातो. मानसिक थकव्याचा परिणाम साहजिकच आपल्या शरीरावर होतो आणि मग अनेक शारीरिक समस्या निर्माण होतात. हा ताण, मानसिक थकवा कमी करण्यासाठी काही अगदी साध्या सोप्या टीप्स

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : आहारवेद : गर्भवतीची मळमळ थांबविणारी संत्री

थोडा वेळ एकटे राहा
स्वत:साठी फक्त पाच मिनिटं काढा. एखाद्या खोलीत किंवा सगळ्यांपासून दूर फक्त पाच मिनिटं बसा. शांतपणे डोळे मिटा. सगळे विचार मोकळे सोडून द्या. शरीर अगदी सैलसर सोडा आणि शांतपणे श्वास घ्या. डोळे बंद करा आणि तळहात एकमेकांवर घासा. या मसाजमुळे तुम्हाला नक्कीच शांत वाटेल. एकाग्रता वाढायला मदत होईल. कामाच्या ठिकाणीही छोटासा ब्रेक घेऊन तुम्ही हा उपाय करु शकता.

छोटासा ब्रेक घ्या
तुमच्या नोकरीतून किंवा रोजच्या कामातून कदाचित तुम्हाला सुट्टी घेणं कदाचित शक्य नसेल, तर किमान रोज एक छोटासा ब्रेक नक्की घ्या. ऑफिसमध्ये काम करत असाल तर लंच टाईम किंवा टी टाईममध्ये थोडा वेळ तुमच्या डेस्कपासून दूर जा. पाच दहा मिनिटं चाला, कुणाशीतरी गप्पा मारा, ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त इतर बोला. घरी असाल तर तुमच्या कामातून ब्रेक घ्या आणि चहा-कॉफी प्या, गच्चीवर किंवा गार्डनमध्ये दहा मिनिटांचा तरी वॉक घ्या. महिन्यातून एखादा दिवस तरी कुठेतरी लांब फिरायला जा.

आणखी वाचा : विश्लेषण: गर्भाशय मुखाचा कर्करोग किती गंभीर? लस किती परिणामकारक?

भरपूर झोप घ्या
घरच्यांकडे लक्ष देण्याच्या गडबडीत स्त्रिया त्यांच्या झोपेकडे पूर्ण दुर्लक्ष करतात असं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यांची पूर्ण आणि शांत झोप होत नाही. क्वालिटी स्लीप म्हणजे चांगली झोप घेणं तुमच्या शारीरिक, मानसिक आणि अगदी भावनिक आरोग्यासाठीही अत्यंत गरजेची आहे. मानसिक आणि शारीरिक थकवा दूर करण्यासाठी आपली कमीत कमी ७ ते ८ तासांची पूर्ण आणि शांत झोप व्हायलाच हवी. झोपण्याआधी मोबाईल किंवा अन्य गॅझेट्स बघणं टाळा, त्याऐवजी एखादं पुस्तक वाचा, गरम पाण्यानं आंघोळ करा,योगा करा.

नियमित व्यायाम करा
नियमित व्यायाम शारीरिक आरोग्यासाठी तर चांगला आहेच. पण नियमित व्यायामाने आपली एनर्जी लेव्हल, मूड, मेंदूचं कार्य या सगळ्यांवरच सकारात्मक परिणाम होतो. व्यायामामुळे रिलॅक्स वाटतं आणि मानसिक थकवाही कमी होतो. त्यामुळे कितीही धावपळ असली तरी रोज किमान काही मिनिटं तरी व्यायामासाठी काढाच.

डाएट आणि भरपूर पाणी
धकाधकीत तुमच्या आहाराकडे दुर्लक्ष करु नका. व्यवस्थित संतुलित आहार घ्या, भरपूर पाणी प्या. कामाच्या नादात खूप वेळ उपाशी राहू नका. नाहीतर पित्त, चक्कर येणं, थकवा असे त्रास होऊ शकतात. अनेकदा बायका जे आहे ते खाऊन वेळ निभावून नेतात. त्यानं पोटही भरत नाही किंवा त्रास होतो. थोडंसं नियोजन करा. ब्रेकफास्ट, जेवण यांच्या वेळा चुकवू नका. म्हणजे तुम्हाला सतत थकवा जाणार नाही.

आणखी वाचा : घर आणि करिअर : स्वर्ग यापुढे थिटा पडे! – किशोरी शहाणे-विज

रिलॅक्सिंग थेरपी
शक्य असेल तर रोज योगाभ्यास करा. निदान मेडिटेशन, ध्यानधारणा, प्राणायाम हे तरी नियमित करा. त्याशिवाय मसाज, एरोमाथेरपी, मसल्स रिलॅक्सेशन अशा रिलॅक्सिंग गोष्टींचा आधार घ्या. जेव्हा जमेल तेव्हा हेड मसाज, बॉडी मसाज केल्यानेही बरंच शांत वाटतं.

स्ट्रेस बॉल स्क्विझ करा
घरात किंवा ऑफिसमध्ये खूप प्रेशर असलं की खूप वैताग येतो. कधीकधी चिडचिड होते, संतापही होतो. अशा वेळेस स्क्विझ बॉल म्हणजे ज्याला स्ट्रेस रिलॅक्सिंग बॉल म्हटलं जातं तो घ्या आणि तो काही वेळ हातानं दाबा. तणाव, राग कमी करण्याचा हा एक साधा सोपा उपाय आहे.

पाळीव प्राण्यांबरोबर खेळा
तुमच्याकडे तुमचा एखादा पेट असेल तर त्याच्याशी रोज थोडा वेळ खेळणं हा मानसिक थकव्यावर उत्तम उपाय आहे. त्यामुळे तुमच्या आवडत्या पाळीव प्राण्याबरोबर खेळण्यासाठी काही वेळ तरी काढाच.

आणखी वाचा : विवाह समुपदेशन: ‘सोलमेट’चा वैवाहिक नात्याला धोका?

लिहून काढा
तुम्हाला ज्या गोष्टींनी त्रास होतोय, तणाव निर्माण होतो त्या गोष्टी लिहून काढा. डोक्यात अनेक गोष्टींचा एकाच वेळेस विचार सुरु असला की गोंधळ उडतो. त्यामुळे तुमची एक यादी बनवा. त्यात प्राधान्याने करण्याच्या गोष्टी आधी लिहा. शक्य असेल तर रात्री झोपण्यापूर्वी डायरी लिहा. किंवा सकाळी ज्या गोष्टींची यादी केली होती त्यातल्या कोणत्या पूर्ण झाल्या आहेत त्यावर खूण करा. यामुळे तुमचा नियोजनातला गोंधळ कमी होईल.

मित्र-मैत्रिणींशी बोला
आपल्याला मित्र मैत्रिणी चांगलं ओळखत असतात. जवळच्या मित्रांशी बोलल्यानं आपला ताण तरी कमी होतोच पण आपल्या डोक्यात काय चाललं आहे हे त्यांना चांगलं माहिती असल्यानं ते आपल्याला त्यावर मार्गही सांगतात. तसंच काहीवेळ त्यांच्याशी गप्पा मारल्यानं रिलॅक्सही होतं.

(शब्दांकन : केतकी जोशी)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are you overburdened or stressed then follow these tips vp
First published on: 24-12-2022 at 12:24 IST