२२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांना आणि अतिप्रतिष्ठित लोकांना आमंत्रणे देण्यात येत आहेत. तसेच राम मंदिराच्या उभारणीमध्ये ज्यांचा खारीचा वाटा आहे, अशा सामान्य नागरिकांनाही खास आमंत्रणं पाठवली जात आहेत. १९९० मध्ये कारसेवकांवर तत्कालीन मुलायमसिंह यादव यांच्या सरकारनं गोळीबार केला होता. त्यावेळी या कारसेवकांना ओम भारती या महिलेनं स्वतःच्या घरात आश्रय दिला होता. या महिलेलाही प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. ७५ वर्षीय ओम भारती यांनी १९९० साली झालेल्या त्या घटनेचं वर्णन करताना तत्कालीन राजकीय परिस्थितीवरही भाष्य केलं आहे.
आमंत्रण मिळाल्यानंतर ओम भारती यांनी ANI ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “भगवान रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मी पाहू शकणार आहे याचा मला प्रचंड आनंद आहे. पण, मी कारसेवकांचा अपमान, त्यांचं रक्त आणि त्यांचं दु:ख केव्हाच विसरू शकत नाही. विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष अशोक सिंघल यांच्यासह १२५ कारसेवकांना मी माझ्या घरात आश्रय दिला होता. भगवान रामाची मूर्ती योग्य ठिकाणी प्रस्थापित करणं हाच त्यांचा उद्देश होता. परंतु, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राजकीय फायद्यासाठी कारसेवकांवर बेछूट गोळीबाराचे आदेश दिले होते.”
हेही वाचा >> Ram Mandir: राम मंदिरात ‘तिचा’ खारीचा वाटा! स्वच्छता कर्मचारी बिदुलाबाई यांचं योगदान ऐकून धन्य व्हाल
१२५ कारसेवकांची केली होती व्यवस्था
“उत्तर प्रदेशच्या तत्कालीन सरकारने कारसेवकांवर बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे माझ्या संपूर्ण घराचं रूपांतर छावणीत झालं होतं. मी माझ्या घरात जवळपास १२५ कारसेवकांना आश्रय दिला होता. तसंच त्यांची संपूर्ण व्यवस्था केली होती. परंतु, यापैकी कोणी बाहेर पडलं की, त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जात होत्या”, अशी आठवणही ओम भारती यांनी सांगितली.
कोठारी बंधूंनाही दिला होता आश्रय
राम मंदिराच्या आंदोलनादरम्यान जीव गमावलेल्या कोठारी बंधूंनीही ओम भारती यांच्याकडेच आश्रय घेतला होता. त्याबाबत त्या म्हणाल्या, “कोठारी बंधूही माझ्या घरात राहिले होते. माझ्या घरातून ते बाहेर पडताच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.”
काँग्रेसचा प्रयत्न अयशश्वी
“उत्तर प्रदेशातील सरकारने कारसेवकांवर प्रचंड अन्याय केला आहे. काँग्रेसनेही बघ्याची भूमिका घेतली. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतरही काँग्रेसने काहीच मदत केली नाही. राम मंदिर होऊ नये म्हणून त्यांनी प्रचंड मेहनत घेतली; पण त्यांचा प्रयत्न असफल ठरला”, असा आरोपही ओम भारती यांनी केला.
मुस्लीम मतांसाठी तत्कालीन सरकारने दिले आदेश
“मुलायमसिंह यादव यांनी मुस्लीम मतांसाठी कारसेकांवर गोळ्या झाडल्या. कारसेवकांनी काहीच केलं नव्हतं. ते फक्त बसून राहायचे आणि जय श्रीरामाच्या घोषणा देत होते. येथे हिंदू – मुस्लीम असा वाद नव्हताच. मुलायमसिंह यादव यांच्या माणसानेच दगड फेकले असतील. कारसेवकांकडे दगड कुठून येतील? यंत्रणांनी दगडफेक करणाऱ्यांना शोधण्यापेक्षा त्यांनी कारसेवकांवरच गोळीबार केला”,असेही त्या पुढे म्हणाल्या.
मोदी आणि योगींमुळेच मंदिर पूर्ण
“सध्या विरोधी पक्षातील हे नेते राम मंदिराबाबत वक्तव्य करीत आहेत. त्यांनी रामाबाबत केव्हाच श्रद्धा दाखवली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमुळे अयोध्येत आज राम मंदिर तयार होत आहे”, असे म्हणत त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचेही आभार मानले आहेत.
