“अग सोनू, मी जरा बाहेर जातेय… गॅस वर कुकर ठेवलाय. तीन शिट्या झाल्या की गॅस बंद कर. विसरू नकोस!” घरोघरी असे संवाद नेहमीचे. सकाळच्या घाईच्या वेळी तर सोसायट्यांमध्ये कुकरच्या शिट्यांची जुगलबंदीच ऐकू येते. किती ते आवाज प्रदूषण, शिट्टी वाजण्याबरोबर अन्नपदार्थाचे पोषक घटक गुलाब पाण्यासारखे हवेत आणि भिंतीवर उडताहेत आणि गॅसची उधळपट्टी! पण तुम्हाला हे माहितीय का, की कुकरची शिट्टी हा केवळ एक सुरक्षिततेचा उपाय आहे. भाराभर शिट्ट्या केल्या म्हणजेच अन्न छान शिजतं असा अर्थ मुळीच नाही. किंबहुना एकही शिट्टी न करताही कुकरमध्ये पदार्थ छान शिजवता येतो. आश्चर्य वाटलं ना?…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रेशर कुकरमध्ये पुरेशी वाफ जमा झाल्यानंतर जास्तीची वाफ बाहेर जावी, कुकरचं भांडं फुटू नये म्हणून वाफ जाण्याच्या छोट्या भोकावर योग्य वजन ठेवतात. हीच कुकरची शिटी. म्हणजेच वाफ बाहेर पडताना येणारा शिट्टीचा आवाज ही त्या गृहिणीला हाक मारण्यासाठी नसून कुकरचं भांडं अतिदाबानं फुटून अपघात होऊ नये याची सुरक्षा व्यवस्था आहे. १९८२ पासून मी एक स्त्री वैज्ञानिक या नात्यानं ‘प्रेशर कुकरच्या शिट्या करू नका’ असं वेगवेगळ्या माध्यमातून सांगत आले आहे. घरचा गॅस सिलिंडर दुप्पट काळ टिकला तर किती बरं! गॅसचे पैसे वाचले, गॅस न मिळण्याची भीती कमी झाली आणि स्वयंपाक अधिक चविष्ट आणि पौष्टिक झाला तर किती छान! आता असा पूर्ण देशाचा विचार केला तर कोट्यावधी रुपये वाचतील…

आणखी वाचा : बिनपाण्यानं करा… शॅम्पू!

फक्त प्रेशर कुकरच्या शिट्या न केल्यामुळे हे होईल? आणि भात, वरण, उसळ सर्व नीट शिजेल का?… हो हो हो! त्यासाठी या तीन गोष्टी केल्या पाहिजेत- एकतर कुकरच्या तळाला कमी, गरजेइतकंच पाणी घालायचं, कुकर लावल्यावर पाहिल्यापासून मध्यम ज्योत ठेवून गॅस वापरायचा आणि कुकरच्या शिट्या नाही करायच्या किंवा फक्त १ शिट्टी झाल्यावर अगदी बारीक गॅस ठेवून ५-१० मिनिटं शिजवायचं.

सगळे पदार्थ करताना, अगदी चहाचं पाणी उकळतानादेखील जर मध्यम ज्योत ठेवण्याची सवय लावली तर गॅस म्हणजे इंधनाची खूप बचत होते. शिवाय या विषयावर काम करणाऱ्या संस्था असं सांगतात, की गॅसवर ठेवायचं भांडं ज्योतीच्या तीनपट किंवा आणखी मोठं हवं, म्हणजे बरीचशी उष्णता त्या पातेल्याला मिळते. भांडं लहान किंवा ज्योत खूप मोठी असेल, तर ३० ते ६० टक्के उष्णता आजूबाजूची हवा, शेजारचं भांडं आणि जवळ उभ्या राहाणाऱ्या बाईचं डोकं तेवढं गरम करते! कुकर झाल्यावर वा पोळ्या केल्यावर तुमचं स्वयंपाकघर जास्त गरम झालंय असं तुम्हाला वाटतं का?… तसं असेल तर तुम्ही गॅस जाळून अन्न शिजवताना बरोबर आजूबाजूची हवादेखील गरम करत आहात! मी २००८ मध्ये ‘स्वयंपाकघरात विज्ञान’ ही ३५ मिनिटांची शैक्षणिक चित्रफीत तयार केली आहे आणि ती यू ट्यूबवर ‘डॉ. स्मिता लेले’ या वाहिनीवर मोफत पाहण्यास उपलब्ध आहे.

आणखी वाचा : मोठी लागून गेली इंग्लंडची महाराणी…

कुकरच्या शिट्ट्या न करता पोषणमूल्यं चांगली मिळतील याचं एक उदाहरण सांगता येईल. भात शिजवताना उष्णता देण्याचा प्रकार कोणता वापरला (शेगडी की गॅस की मायक्रोवेव्ह), उष्णता पुरवण्याचा वेग- म्हणजे बिर्याणीसारखा ‘दम’ देऊन म्हणजे हळूहळू शिजवला की झटपट, प्रेशर कुकरमध्ये शिजवला की भांड्यात भांडं ठेवून, वगैरेनुसार भाताची नुसती चवच नाही तर भाताचे गुणसुद्धा बदलतात.

शेवटी एकच आवाहन करावंसं वाटतं, ‘चतुरां’नो तुम्ही चाणाक्ष तर आहातच. आपलं ज्ञान स्वयंपाकघरात वापरू या, ‘असं का’ आणि ‘असं का नाही’ हे प्रश्न स्व:ताला विचारू या. आपला वेळ आणि इंधन वाचवू या आणि पोषण वाढवू या!

dr.smita.lele@gmail.com


मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How pressure cookers actually work benefits of pressure cooking nrp
First published on: 14-09-2022 at 11:37 IST