“लहानपणी चंद्र माझ्याबरोबर येतोय असं मला वाटायचं, प्रत्यक्षात त्यानं खरंच मला इथपर्यंत, माझ्या स्वप्नपूर्तीपर्यंत आणून सोडलं आहे. लहानपणीचं माझं कुतूहल आता माझं वास्तव बनलं आहे…” अंतराळात जाण्याचं स्वप्न पूर्ण होत असलेल्या जान्हवी डांगेतीची ही प्रतिक्रिया. ही फक्त प्रतिक्रिया नाही तर ही कहाणी आहे स्वप्नांची, जिद्दीची आणि महिला सशक्तीकरणाचीही. आंध्र प्रदेशातील छोटंसं शहर पलकोल्लूमधली जान्हवी डांगेती आता २०२९ मध्ये भारताची युवा अंतराळवीर म्हणून अंतराळात जाणार आहे. टायटन्स स्पेसच्या पहिल्या दोन भ्रमणांसाठी ॲस्ट्रोनॉट कँडिडेट (ASCAN) म्हणून तिची अधिकृतरित्या निवड झाली आहे.
२०२६ पासून पुढील तीन वर्षांमध्ये जान्हवीला अंतराळवीराचं अत्यंत खडतर प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे. टायटन स्पेसच्या ASCAN कार्यक्रमांतर्गत हे प्रशिक्षण तिला दिलं जाईल. यामध्ये उड्डाणाचं तंत्र, अंतराळात राहण्यासाठीचं, वैद्यकीय आणि मानसिक ताकद वाढवण्यासाठी हे विशेष प्रशिक्षण असेल. याबाबतची माहिती जान्हवीनं तिच्या स्वत:च्या इन्टाग्राम पेजवरून दिली आहे. NASA मधील अंतराळवीर कर्नल (निवृत्त) विल्यम मॅक आर्थर ज्युनिअर हे टायटन स्पेस मिशनचे नेतृत्व करणार आहेत.
अर्थातच जान्हवीला अवकाशात भरारी घेण्याचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी भरपूर परिश्रम घ्यावे लागले आहेत. ११ वर्षांची असताना जान्हवीनं NASA बद्दल पहिल्यांदा ऐकलं होतं. तिचं शालेय शिक्षण तिच्या मूळच्या म्हणजे गोदावरी जिल्ह्यातून झालं. त्यानंतर तिनं पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून (LPU) इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये इंजिनीअरिंगची पदवी घेतली. जान्हवीची आई पद्मश्री आणि वडील श्रीनिवास हे दोघेही कुवेतमध्ये राहतात. २०२२ मध्ये जान्हवी सर्वांत तरुण Analogue Astronaut बनली. Analogue Astronaut म्हणजे पृथ्वीवरच अंतराळ मोहिमांसारखं वातावरण निर्माण केलं जातं आणि त्या डमी मोहिमांमध्ये सराव केला जातो. दक्षिण पोलंडमधील क्रॅकॉ येथील ॲनालॉग ॲस्ट्रोनॉट ट्रेनिंग सेंटर ( AATC) मधली ती पहिली भारतीय आहे. नासा आणि अन्य आंतरराष्ट्रीय एजन्सींच्या वतीने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांतही ती सहभागी झाली होती. तसेच हवाई येथे पॅन-स्टार्स दुर्बिण वापरून प्रत्यक्ष वेळेत लघुग्रह शोधण्याच्या मोहिमेतही ती सहभागी झाली होती. तिची निष्ठा, जिद्द बघून नासामधील एका ज्येष्ठ अंतराळवीरानं ‘तुझ्यामध्ये मला छोटी कल्पना चावला दिसते,” असे उद्गार काढले होते. जान्हवी हा तिचा गौरव समजते. अंतराळात वावरण्यासाठी अंतराळवीरांना शून्य गुरुत्वाकर्षणात राहण्याचं प्रशिक्षण स्कूबा डायव्हिंगमधून दिले जाते अशी माहिती जान्वहीला मिळाली. त्यानंतर ती दररोज २५ किलोमीटर सायकल चालवत पोहण्याचा सराव करण्यासाठी जाऊ लागली. तिचा सराव, चिकाटी यामुळे ती देशातील सर्वांत लहान वयाची ॲडव्हान्स्ड स्कूबा डायवर बनली. नासाच्या १० दिवसांच्या विद्यार्थ्यांसाठीच्या कार्यक्रमत ती सहभागी झाली होती. या कार्यक्रमात जाणारी ती पहिली भारतीय होती. त्यावेळेस तिच्या डोळ्यांत अश्रू होतं. कारण आपण आपल्या स्वप्नापासून आता फार दूर नाही हे तिच्या लक्षात आलं होतं. २०२९ मध्ये टायटन स्पेससाठीच्या पहिल्या लो अर्थ ऑर्बिट (LEO) मोहिमेत ती सहभागी होईल. या मोहिमेअंतर्गत ती दोन वेळा पृथ्वीची प्रदक्षिणा करेल. त्याचबरोबर ३ तास शून्य गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात ती तरंगेल आणि एकाच दिवसात दोन वेळेस सूर्योदय आणि सूर्यास्त बघेल.
जान्हवीचं हे यश म्हणजे जागतिक अंतराळ मोहिमेत मूळ भारतीय वंशाच्या लोकांचा सहभाग वाढत आहे याचंच उदाहरण आहे. आजही छोट्या शहरांमध्ये मुली शिकल्या तरी त्यांच्यासाठी मर्यादित करियरचे पर्याय असतात असा समज आहे. इंजिनीअरिंग किंवा मेडिकल किंवा प्राध्यापक, शिक्षक होणं यापलिकडेही करिअर असू शकतात हे अनेकजणींनी सिद्ध केले आहे. स्वप्नं बघायला कोणत्याही मर्यादा नसतात तशा ती पूर्ण करायलाही कोणत्याही मर्यादा नसतात हेच जान्हवीनं सिद्ध केलं आहे. जिद्द, चिकाटी आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर एक दिवस चंद्रावर जाण्याचं जान्हवीचं स्वप्नं पूर्ण होणार आहे. ज्या मुली मोठी स्वप्नं बघतात पण आत्मविश्वासाच्या अभावी धाडसी पाऊल उचलायला घाबरतात अशा अनेक मुलींसाठी जान्हवीची ही यशोगाथा प्रेरणादायी आहे.