“माझं ठरलंय. आज सगळ्यांशी गोड गोडच बोलायचं. कोणालाही ओरडायचं नाही, रागवायचं नाही. चिडायचं सुद्धा नाही, सौजन्यसप्ताह नाही निदान सौजन्यदिवस तरी बाळगते.” तिच्या या बोलण्याकडे त्याने पूर्ण दुर्लक्ष केलं. त्याला माहिती होतं की हे गोड बोलणं वगैरे तिचं काम नाही. त्यामुळे त्याच्या चेह-यावरच्या माशीने सुद्धा हलण्याचे कष्ट घेतले नाही. “लवकर निघ. बस तशीही चुकलीच आहे.” त्याने समोरच्या लॅपटॉपवरचं लक्ष ढळू न देता तिला म्हटलं. तिच्या आठ्यांवरुन तिला काहीतरी सुनवायचं होतं हे त्यालाही कळलं. पण तिनेच आवरतं घेतलं. आजच्या गोड बोलण्याची सुरुवात आपल्या घरापासून आणि आपल्या माणसापासूनच करायची असं तिने मनोमन ठरवलं. कपाळावरची वक्ररेषा ओठांवर आणली. “हरकत नाही, पुढची पकडेन. इतकं काय त्यात. किती काळजी करतोस तू माझी.” तिचं गोड बोलणं न पचल्याने तो खदाखदा हसायला लागला.

आणखी वाचा : भोगीची आमटी : एक चवदार आठवण

How To Make Raw Banana Chivda
Raw Banana Chivda: मुलांच्या खाऊच्या डब्यासाठी बनवा ‘कच्चा केळींचा चिवडा’ ; चटपटीत अन् पौष्टिक पदार्थ कसा बनवायचा? साहित्य, कृती लिहून घ्या
five powerhouse superfood is helpful for good for blood health
Superfood For Blood Health : रक्त शुद्ध व निरोगी ठेवण्यासाठी हे पाच सुपरफूड्स ठरतील फायदेशीर
How to care for your lips in monsoon Do This Home Remedy To Keep Lips Soft In The Rain
Lip Care in Monsoon: पावसाळ्यात ओठांची काळजी कशी घ्याल? मऊ ओठांसाठी ‘या’ सोप्या टीप्स फॉलो करा
law for laughing in japan
जपानमध्ये चक्क हसण्यासाठी कायदा? काय आहे कारण?
Slum sale allowed if name in eligibility list till 2010 under Slum Rehabilitation Scheme Mumbai
पात्रता यादीत नाव असल्यास झोपडी विकण्याची मुभा मिळणार! घर विकण्यासाठी मात्र पाच वर्षांचीच मुदत
Benefits Of Drinking Tulsi Water
तुळशीचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे वाचा; सर्वाधिक फायद्यांसाठी कसे करावे सेवन? वाचा आहारतज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला
weight gain and exercise
झटपट वजन कमी करण्यासाठी उच्च तीव्रतेचा व्यायाम केल्यामुळेही वाढू शकतं वजन? तज्ज्ञ काय सांगतात…
Why you should steer clear of sprouted potatoes
कोंब आलेले बटाटे खाताय? थांबा, असे करण्यापूर्वी बटाट्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घ्या

स्वतःचाच संकल्प आवडल्याच्या खुशीत ती निघाली खरी पण बसस्टॉपवर बस चुकायची ती चुकलीच. १० मिनिटं पुढच्या बससाठी थांबल्यावर त्या बसमध्ये चढायला मिळेना इतकी गर्दी झाली. शेवटी रिक्षाचा पर्याय तिने नाखुशीनेच निवडला. आता तिच्या या ‘गोड गोड’ दिवसाची खरी कसोटी होती. एकतर भर्रकन जाणा-या रिक्षा थांबवणं हीच एक मोठी डोकेदुखी त्यात ती चुकून थांबली तर त्यांच्या आपल्याला घेऊन जाण्यासाठी विनवण्या करण्यात निम्म आयुष्य तिथंच संपून गेल्यासारखं वाटतं. पण हे सगळे विचार बाजूला सारुन तिने धीर करुन कधी नव्हे तो बसस्टॉपच्या बाजूलाच उभ्या असलेल्या रिक्षावाल्याला विचारलं. “परतीचं भाडं मिळत नाही तिथून.” रिक्षावाल्याने दात कोरत उत्तर दिलं. जगातली सगळी घाई एकीकडे आणि त्याचा निवांतपणा एकीकडे. “मिळेल अहो. चला तर. फार काही लांब नाही इथून.” शक्य तितका जिभेवर ताबा ठेवत ती त्याला म्हणाली. “नाय ओ म्यॅडम. दुसरी बघा तुम्ही.” तिच्याकडे ढुंकूनही न बघता तो तिला म्हणाला. अजून दहा मिनिटं तीन रिक्षावाल्यांची मिनतवारी केल्यानंतर कुठे तिला एका रिक्षावाल्याने हो म्हटलं. ‘दिवस सुरु सुद्धा नाही झाला आणि माझ्यातला गोडवा आताच संपायला लागलाय.’

आणखी वाचा : मी सून आहे म्हणून सासूने मला मध्यरात्री…

ऑफिसमध्ये बॅग ठेवते न ठेवते तोच शिपाईकाका समोर उभे. “मॅडम, उशीरा आलात आज. साहेबांनी बोलावलंय. मूड काय ठीक दिसत नाही.” हवामान खात्याचा बेभरवशी रिपोर्ट सांगावा तसा शिपाईकाका तिला निरोप देऊन गेले. ती लगबगीने साहेबांच्या कॅबिनमध्ये गेली. ‘काही झालं तरी आपण गोडच बोलायचं.’ तिने मनाशी ठरवलं. “या रिपोर्टमध्ये फारच चुका आहेत, तुमच्याच टीममेंबरने बनवलाय ना, बघा काम करा यावर आणि मला आज डे एण्डला द्या जरा वाचण्यालायक रिपोर्ट.” दिवसरात्र खपून बनवलेल्या त्या रिपोर्टमध्ये नेहमीसारखे स्वल्पविराम आणि पूर्णविरामाच्या चुका काढणाऱ्याला खरंतर चांगलं सुनावूनच विराम दिला पाहिजे असं आलं तिच्या मनात. पण फक्त मनातच ओठावर नाही. “सॉरी सर, मी स्वतः जातीने लक्ष घालते यात. तुम्ही काळजी करु नका. अन् मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा.” तिने शक्य तितक्या गोड आवाजात बोलण्याचा प्रयत्न केला. “हं.” तिच्या इतक्या गोड बोलण्याला किमान एक हसू तिला अपेक्षित होतं. पण ते राहिलं दूरच तिच्या शुभेच्छांकडे सरळ सरळ दुर्लक्ष केलं गेलं होतं.

आणखी वाचा : आरोग्य : थंडीत पांढरे तीळ खाल्ल्यानं स्रियांना मिळतील ‘हे’ फायदे

संध्याकाळी घरी आल्यावर तिने जाहीर केलं की ती काही आता हे गोड बोलणं सुरु ठेवणार नाही. “बसं झालं. लोकांना किमतच नाहीये सौजन्याची. समोरचा छान हसून तुमच्याशी गोड बोलतोय तर तुम्ही निदान हसून त्याला प्रतिसाद तरी द्या. इथे तर लोक ढुंकूनसुद्धा पाहत नाही. काय अर्थ आहे याला..श्शी.”

आणखी वाचा : नवा कम्फर्ट झोन

“गोड बोलायचं हे लोकांनी थोडं ठरवलं होतं, ते तर तू ठरवलं होतंस ना, मग लोकांवर कशाला उगाच जबाबदारी टाकते आहेस गोड बोलण्याची..तुला बोलायचं होतं तू बोललीस. त्यांनी तसं वागावं ही अपेक्षा करणं चुकीचं आहे ना.” तिच्यापुढे वाफाळत्या चहाचा कप ठेवत तो म्हणाला. “सोड ना आता. गोड वाग, कडू वाग कशीही वाग, लोक त्यांना हवे तसेच तुझ्याशी वागणार आणि बोलणार. तू ठरवायचं तुला कसं वागायचं. बाकी मकरसंक्रांत आहेच की आठवण करुन द्यायला, गोड गोड बोलण्यासाठी.”

समोर ठेवलेल्या तीळाच्या लाडवाचा तोबरा तोंडात भरत तिने त्याच्याकडे पाहून गोड हसत सौजन्यदिवसाचा समारोप केला!