गेले १८ दिवस अभिनेत्री मयुरी देशमुख व्हिएतनाममध्ये अगदी मनसोक्त सुट्ट्या एन्जॉय करताना दिसली. यादरम्यानचे काही सुंदर फोटोही तिने सोशल मीडियाद्वारे शेअर केले. बऱ्याच जणांनी तिच्या फोटोंचं, लूकचं कौतुकही झालं. पण काहींना मात्र ती फिरायला गेल्याचं खटकलं. म्हणतात ना ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ याच वर्गामध्ये मोडणारे ते लोक असावेत. काय तर म्हणे “अंग मयुरे नवरा स्वर्गवास होऊन एक वर्षही झालं नाही आणि तू फिरायला लागलीस, फोटो काढायला लागलीस, एन्जॉय करायला लागलीस.” सुरज बोराडे नावाच्या व्यक्तीने मयुरीच्या फोटोंवर केलेली कमेंट दिवसभर डोक्यामधून काही गेली नाही. याच पार्श्वभूमीवर मयुरीला सुनावणाऱ्या व्यक्तीला लिहिलेलं हे पत्र…

पत्राची सुरुवात प्रिय… लिहून करतात खरं पण सुजर बोराडे तुझ्यासाठी हा शब्द लिहिणं योग्य वाटत नाही. कारण तुझी विचारसरणीच चीड आणून देणारी आहे. सेलिब्रिटी मंडळींना सुनावणारे, त्यांच्यावर कमेंट करणारे, ट्रोल करणारे सोशल मीडियावर लाखो सापडतील यामध्ये वाद नाही. पण म्हणून तुझ्यासारखा विचार करणाऱ्या आणि कमेंट करणाऱ्या लोकांना प्रत्येकवेळी उत्तर न देता सोडून देणंही योग्य वाटत नाही.

आता तूच याची सुरुवात केली म्हणून सांगते कसंय ना वयाच्या तिशीमध्ये अचानक नवरा गमावलेल्या स्त्रीचं दुःख तू काय समजणार? जर तिला स्वतःसाठी वेळ द्यावा वाटला तर त्यात तुझं कुठे काय गेलं… आपल्या जोडीदाराच्या हजारो आठवणी, हातांच्या बोटांवर न मोजता येणारे क्षण, पावलोपावली असणारी त्याची साथ हे फक्त तिलाच माहीत असतं. तिचा नवरा तिच्यासाठी काय होता, काय आहे आणि यापुढेही काय राहील हे तुला तिने सांगण्याची गरज नाही.

आणखी वाचा – “नवरा जाऊन वर्षही झालं नाही आणि तू फिरतेयस” म्हणणाऱ्या युजरला मराठी अभिनेत्रीचं चोख उत्तर

अरे सूरज मयुरीने ऐन तारुण्यात नवरा गमावला म्हणून तिनं जगणं सोडून द्यायचं का? स्वतःलाही वेळ द्यावा, नेहमीच्या रटाळ दिवसांमधून बाहेर पडावं असं तिलाही वाटलंच असेल की… म्हणून गेली ती व्हिएतनामला… त्यात तिचं काय चुकलं? तुमच्यासारख्या लोकांमुळेच मयुरीसारख्या कित्येक मुलींना लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर, आता थोडं सांभाळूनच वाग असे सल्ले दिले जातात. खरं तर हे सल्ले ऐकूनच त्यांची जगण्याची इच्छा मरत असावी…

नवरा गेला म्हणजे स्त्रीने आयुष्यच जगणं सोडून द्यावं असा जर तुमचा समज असेल तर असे विचार बदलण्याची तुम्हाला गरज आहे, त्या स्त्रीला नाही. जोडीदाराशिवाय जगणं काय असतं? हे नवरा गमावलेल्या एका स्त्रीला जाऊन विचार… तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुला मिळतील. आता मीच तुला एक प्रश्न विचारते जर एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीला गमावलं तर त्यालाही तू अशाप्रकारेच बोलणार का? ….मग प्रत्येकवेळी स्त्रीच का?

छे, रे! तुमच्यासारख्या लोकांना महत्त्व देणारी मयुरी नाही. तिने एव्हाना कलाक्षेत्रामध्येही पुन्हा नव्या जोमाने काम करायला सुरुवात केली. मी तर म्हणते अशांना स्त्रियांनी महत्त्वच देऊही नये… पण सूजरसारख्याच कित्येक लोकांचा विधवा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा भलताच वेगळा असतो. तिने तिच्या चौकटींमध्येच राहवं अशी चीड आणून देणारी अपेक्षा लोकांची… अशा लोकांच्या कानशिलात लगावणारं एक उदाहरण म्हणजे पूर्व लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये १५ जून २०२० रोजी चीनसोबत झालेल्या संघर्षात बिहारचे नाईक दीपक सिंह शहीद झाले. दीपक यांची पत्नी रेखा देवी या तर फक्त २३ वर्षांच्या आहेत.

आणखी वाचा – वयाच्या ३१व्या वर्षी नशिबाने माझा नवरा हिरावून नेला पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेखा देवी या मूळच्या मध्य प्रदेशातील रीवा येथील आहेत. त्यांनी सैन्यात भरती होण्यासाठी महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्या लष्करात अधिकारी म्हणून काम करणार आहेत. इतकंच नव्हे तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना दीपक यांच मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आलं. बघा अवघ्या विशीमध्ये रेखा यांनी एक नवरा गमावलेली स्त्री काय करू शकते हे दाखवून दिलं. सूरज सारख्या अनेक लोकांची या पत्रामधून कान उघडणी करणं महत्त्वाचं वाटलं. कारण तसं झालं नाही तर मयुरीसारख्या कित्येक स्त्रियांना तुम्ही यापुढेही ऐकवत राहणार आणि ऐन तारुण्यात जोडीदार गमावलेल्या स्त्रियांच्या मनाचं खच्चीकरण करणार. बस्सं… थांबवा आता हे सगळं!