डॉ. दीपक गौतम
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांमध्ये पाठदुखीचा त्रास हा अत्यंत सामान्य, पण गंभीर आरोग्याचा प्रश्न बनला आहे. ही पाठदुखी त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये आणि एकूण आरोग्यावर परिणाम करते. मासिक पाळी, गर्भधारणा किंवा रजोनिवृत्ती दरम्यान हार्मोनल बदलांमुळे हाडांची घनता आणि स्नायूंच्या बळकटीवर परिणाम होतो. व्हिटॅमिन डी किंवा कॅल्शियमची कमतरता निर्माण होते, ताण, शारीरिक हालचालींचा अभाव आणि संधिवात किंवा ऑस्टियोपोरोसिस यांसारख्या परिस्थितींमुळे पाठ आणि हाडांमध्ये वेदना होऊ शकतात. स्नायू किंवा हार्मोनल समस्या व्यवस्थापित करण्यासाठी तसेच सतत पाठीच्या वेदना सतावत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

महिलांनी नियमितपणे या चाचण्या करायलाच हव्या

रूमेटॉइड फॅक्टर (आरएफ) आणि अँटी-सीसीपी चाचणी : ही महिलांमध्ये सांधेदुखी, स्नायुंचा कडकपणा आणि सूज निर्माण करणारे संधिवात यांसारखे ऑटोइम्यून विकार आहेत का हे तपासण्यासाठी फायदेशीर ठरते.

व्हिटॅमिन डी३ आणि कॅल्शियम : हाडं आणि स्नायूंमधील वेदना या व्हिटॅमिन डी३ आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतात. ही चाचणी तुम्हाला व्हिटॅमिन डी३ आणि कॅल्शियम कमतरता आहे का हे जाणून घेण्यास आणि कमतरता असल्यास तज्ज्ञांच्या मदतीने ते दूर करण्यास मदत करू करते. पुरेसे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम पातळी राखण्यासाठी तज्ज्ञ पूरक आहार घेण्याचा सल्ला देतात.

डेक्सा स्कॅन (हाडांच्या खनिज घनता चाचणी) : ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पोस्टमेनोपॉझल महिलांसाठी ही चाचणी आवश्यक आहे. ही चाचणी ऑस्टियोपोरोसिस किंवा हाडं लवकर कमकुवत होणे याचा शोध घेण्यास मदत करते.

पूर्ण रक्त गणना (सीबीसी) आणि आयन (लोह) प्रोफाइल : लोहाच्या कमतरतेमुळे किंवा असंतुलनामुळे महिलांना अनेकदा हाडं आणि स्नायूमध्ये वेदना किंवा थकवा जाणवतो. म्हणून सीबीसी चाचणी केल्यास हिमोग्लोबिन आणि लोह पातळी जाणून घेण्यास मदत होते. जर ही पातळी कमी असेल तर त्वरित तज्ञाची मदत घ्या.

एमआरआय : ही चाचणी मऊ उती, डिस्क, लिगामेंट आणि नसांना प्रतिमा पाहण्यास मदत करते आणि त्यामुळे समस्य शोधण्यास मदत होते.

मज्जातंतू वहन अभ्यास (Nerve Conduction Study – NCS) : ही एक वैद्यकीय चाचणी आहे जी मज्जातंतूंमधून विद्युत आवेग किती वेगाने जातो हे मोजते. या चाचणीमुळे मज्जातंतूंना झालेली इजा किंवा त्यांचे कार्य तपासता येते आणि याला मज्जातंतू वहन वेग चाचणी असेही म्हणतात. या चाचणीत, त्वचेवर लावलेल्या इलेक्ट्रोडच्या मदतीने मज्जातंतूंना उत्तेजित केले जाते आणि त्यांची विद्युत वहन क्षमता तपासली जाते.

महिलांनी वेळोवेळी वरील चाचण्या केल्यास त्या निरोगी राहण्यास मदत होते. तुमच्या पाठदुखीकडे दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरू शकते त्यामुळे वेळीच या चाचण्या करून घ्या.

(लेखक ऑर्थोपेडिक सर्जन आहेत.)