गेल्या शनिवार-रविवारी सुट्टी असल्याने आम्ही काही मित्र-मैत्रिणींनी अलिबागला जायचं ठरवलं. ठरल्यानुसार गेलो, दोन दिवस फिरलो आणि मी परत यायला निघाले. परत येताना सर्वांचे प्लान्स थोडे वेगळे होते, त्यामुळे मी बोटीने अलिबागहून मुंबईला यायला निघाले. पहिल्यांदाच मी बोटीने येणार होते, त्यामुळे जरा टेन्शन आलं होतं, त्यात मला निघायला उशीर झाला. कशी-बशी बस पकडून मांडव्याला पोहोचले, तिकीट घेतलं आणि फेरीच्या रांगेत उभी राहिले. पहिल्यांदाच बोटीचा प्रवास तोही एकटीने करत होते, त्यामुळे तिथं रिझर्व्हेशनसारखा प्रकार असतो की काय, त्याची कल्पना नव्हती. बॅग घेतली आणि आत गेले. फेरीबोट फुल्ल झाली होती, माझ्याबरोबरचे काही जण जागा नसल्याने खाली उतरले, पण मला मात्र वाट बघणं हा पर्याय नव्हता, त्यामुळे मी नजर फिरवून जागा शोधू लागले.

मी सून आहे म्हणून सासूने मला मध्यरात्री…

एका कोपऱ्यात पाहिलं तर एक ५५ वर्षांच्या काकू होत्या. माझ्याकडे बघून गोड हसल्या, मला त्यांच्याजवळ थोडी जागा दिसली, मी त्यांना विचारलं की तिथं कोणी बसलंय का? तर त्या नाही म्हणाल्या. मी तिथे गेले आणि त्यांनी आणखी जागा करून दिली आणि ‘अगं तुझ्यासाठीच जागा ठेवलीये’, म्हणत खुदकन हसल्या. मीही त्यांना स्माइल देत बॅग घेऊन त्यांच्या शेजारी बसले. त्या खूप उत्साही होत्या. माझ्याशी गप्पा मारू लागल्या, ‘कुठे राहतेस, काय करतेस?’ सगळं विचारलं. मीही उत्तरं दिली. तेवढ्यात त्या त्यांच्याबदद्ल सांगू लागल्या. “मी नवऱ्याबरोबर त्याच्या शाळेतल्या मित्र-मैत्रिणींच्या गेट टूगेदरला आले होते. आता सगळे जण परत जातोय. १९७५ साली तिसरीत शिकणाऱ्या त्या सर्वांनी अलिबागला भेटायचं ठरवलं.” त्यातली मला आवडलेली गोष्ट म्हणजे ते सर्व बॅचमेट्स त्यांच्या पार्टनर्सना घेऊन आले होते. बाकीचे लोक तिथे होतेच, पण त्या काकू प्रचंड उत्साही. अगदी सगळ्यांचे फोटो काढण्यापासून ते गाणी गात सर्वांचं लक्ष त्या वेधून घेत होत्या.

…तर काळजी नसावी!

मला क्षणभर त्यांच्याकडे पाहून वाटलं की, किती स्वच्छंदी आहेत त्या. अगदी कशाचीही पर्वा न करता त्या ‘तो’ क्षण इतरांपेक्षा जास्त आनंदाने जगतायत. समुद्रातून जाताना सूर्याचा फोटो काढणं असो वा नवीन दिसलेल्या जहाजाचा फोटो काढणं, गाणी गाताना, सोबत आणलेली चॉकलेट्स सर्वांना वाटताना, मित्र-मैत्रिणींचे फोटो काढताना त्यांचा उत्साह मात्र तसूभरही कमी होत नव्हता. तासभराच्या त्या प्रवासात मला जराही जाणवलं नाही की, त्यांना मी पहिल्यांदा भेटतेय. ग्रूपमधले बाकीचेही त्यांच्या उत्साहाचं कौतुक करत होते. तासभराचा प्रवास संपला आणि गेटवेला पोहोचलो. तिथेही त्यांनी माझी बॅग काढून देण्यास मदत केली आणि तेवढंच गोड हसत पुन्हा कधी तरी भेटू असं म्हणत मला बाय म्हणाल्या.

पुरुषांना मोकळ्या विचारांची मैत्रीण चालते, पण मग बायको का नाही?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिथून निघाल्यावर विचार मनात आला, खरंच त्या काकूंसारखं आनंदाने जगतो का आपण? त्यांच्याप्रमाणे लहान लहान गोष्टी करताना, अनुभवताना आपल्याला तितका उत्साह असतो का? त्यांच्याइतकं स्वच्छंदी, हसून जीवन जगायला आपल्याला जमतं का? हे विचार विचार डोक्यात सुरू होते. इतक्यात टॅक्सी घरासमोर पोहोचली अन् मी माझ्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आले. पुन्हा एकदा त्या काकूंचं गोड स्मितहास्य आठवलं आणि माझ्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटलं. मग स्वतःलाच म्हटलं त्यांच्यासारख्या जगतेय की नाही हे माहीत नाही, पण हसू तरी नक्कीच शकते!