गेल्या कित्येक दिवसापासून चित्रा वाघउर्फी जावेद ही दोन नावं सतत कानावर पडत आहेत. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतल्यापासून उर्फीबाबत लोकांची उत्सुकता फारच वाढली आहे. उर्फीबद्दल काहीच माहीत नसलेल्यांनाही आता ‘ही उर्फी जावेद नक्की आहे तरी कोण?’, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांनी कितीही नाकारलं तरी उर्फीला त्यांच्यामुळे थोड्या फार प्रमाणात का होईना प्रसिद्धी मिळाल्याचं मान्य करावंच लागेल.

फॅशनच्या नावाखाली अतरंगी, चित्र-विचित्र, तोकडे कपडे घालून मुंबईच्या रस्त्यांवर फिरणारी मॉडेल व अभिनेत्री उर्फी जावेद लोकप्रियता आणि प्रसिद्धीसाठी हे सगळं करतेय, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. चित्रा वाघ यांनी थोबडवल्याची भाषा केल्यापासून तिला जास्तच चेव आला आहे. त्यामुळे इन्स्टाग्राम, ट्वीटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन उर्फी चित्रा वाघ यांना उगाचच डिवचत आहे. आणि विशेष म्हणजे उर्फीने मारलेले तीर नेमके लक्ष्यभेद करत असून त्यामुळे अतिशय क्षुल्लक, नगण्य, अत्यंत सुमार दर्जाच्या या विषयावर राजकारण पोसले जात आहे. त्यामुळेच की काय, कधी काळी महिलांच्या विषयावर बोलणाऱ्या चित्राताईंना चक्क उर्फी जावेद सारख्या विषयावर पत्रकार परिषदा घ्याव्या लागत आहेत.

हेही वाचा>> सुधा मूर्ती स्वत:साठी साडी खरेदी करत नाहीत, कारण…

चित्रा वाघ, तुम्ही कितीही ओरडून सांगितलं, पत्रकार परिषदेतून उर्फी जावेदच्या विषयाचं महत्त्व पटवून दिलं. तरी महिलांच्या इतर गंभीर विषयांपुढे या विषयाचं महत्त्व अतिशय नगण्य आहे. मग उर्फीला थोबडवण्याचा अट्टाहास कशासाठी? कोणी काय घालावं, काय घालू नये, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. किती कपडे घालायचे याची अक्कल प्रत्येकाला असते. तुम्ही आक्षेप घेतल्याने उर्फीला अक्कल येऊन ती चित्रविचित्र कपडे घालून अंगप्रदर्शन करणं बंद करेल, असं तुम्हाला खरंच वाटतं का? उर्फीला धडा शिकवण्यापेक्षा बाकीही इतर बरीच कामं आहेत, ज्यासाठी तुम्हाला पद मिळालं आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष द्या.

उर्फीच्या अंगप्रदर्शनामुळे नग्नतेला वाव मिळतो, असं तुमचं म्हणणं आहे. दीड वर्षांपूर्वी अत्याचाराच्या बळी पडलेल्या नऊ वर्षीय मुलीच्या आईने उर्फीचा व्हिडीओ पाठवल्याचं तुम्ही सांगितलं. पण, या सगळ्यात ती नऊ वर्षाची मुलगी आणि महाराष्ट्रात अत्याचार झालेल्या महिला मात्र बाजूलाच राहिल्या. आणि तुम्ही काहीही कामधंदे नसलेल्या उर्फीला घेऊन बसलात. राज्यात एखाद्या महिलेवर बलात्कार झाला, तर तुम्ही संबंधित सरकारला माध्यमांसमोर येऊन जाब विचारता. मग लगेच महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न उभे राहतात, पण पुढे त्याचं काय होतं? गेल्या वर्षी झालेल्या डोंबिवली बलात्कार प्रकरणाबाबत बोलताना तुमच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. ते खरे होते की खोटे ते तुमचं तुम्हालाच माहीत. पण, पुढे त्या प्रकरणाचं काय झालं? उर्फी विरोधात तुम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली. पण मला सांगा, वर्षभरात किती महिलांवर अत्याचार झाले? किती केसेस दाखल झाल्या? त्या केसेसचं पुढे काय झालं? त्यातील कितींचा निकाल लागला व किती प्रलंबित आहेत? या सगळ्याबाबत माहिती मिळवण्यासाठी कधी पोलिसांत गेलात का?

हेही वाचा>> काकू, आम्ही ऑफिसमध्ये काम करायला जातो, लग्नासाठी मुलं पाहायला नाही!

crime against women

‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’च्या अहवालानुसार, २०२१ वर्षात देशभरात एकूण ४ लाख २८ हजार २७८ महिलांवर अत्याचार झाले. त्यापैकी ३१ हजार ८७८ रेप केसेस आहेत. देशाचं सोडा आपण केवळ आपल्या राज्यापुरतं बोलूया. तर २०२१मध्ये महाराष्ट्रात एकूण ३९ हजार ५२६ महिला अत्याचाराला बळी पडल्या. त्यापैकी २ हजार ५०६ महिलांवर बलात्कार झालेला आहे. यापैकी अर्ध्याहून अधिक केसेस अजूनही प्रलंबित आहेत.

rape cases

हेही वाचा>> Urfi Javed तुला लागली कोणाची ‘उर्फी’…!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलांनी तोकडे कपडे घातल्यामुळे त्यांच्यावर अत्याचार होतात. मुलींचे हे कपडेच बलात्कारासाठी प्रवृत्त करतात, अशी अनेक विधान यापूर्वी करण्यात आली आहेत. काही राजकारण्यांनीही याबाबत त्यांच्या अकलेचे तारे तोडले आहेत. जर खरंच असं असेल, तर बुरख्याने अंग झाकलेल्या किंवा साडी नेसणाऱ्या महिला बलात्काराच्या बळी ठरल्या नसत्या. उर्फीसाठी महिला आयोगावर आरोप करण्यापेक्षा महिलांवर होणारे अत्याचार, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही आयोगाला जाब विचारायला हवा होता. महिलांच्या समस्येबाबत अध्यक्षा रुपाली चाकणकरांना तुम्ही धारेवर धरलं असतं, तर एकवेळ गोष्ट वेगळी होती. पण, उर्फीसाठी महिला आयोगावर ताशेरे ओढण्यात काय पॉइंट आहे? उर्फीच्या विषयावरुन तुम्हाला पुरेसं फुटेज मिळालं आहे. त्यामुळे उर्फी पुराण बंद करुन आता इतर महिलांच्या विषयावर बोला, ही तमाम महिलावर्गाकडून एक नम्र विनंती!