आयुष्यामध्ये कधी हसू तर कधी आसू येतच असतात. कधी सुख तर कधी दु:ख तुमच्या पदरात पडत असते. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये एका जागी थांबायचे नसते. कारण आयुष्याचे चक्र हे चालतच राहत असते, तसेच क्रिकेटचेही असल्याचे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला वाटते. आतापर्यंतच्या कर्णधारपदाच्या प्रवासात बरेच चढ-उतार आल्याचे धोनीने सांगितले.
विश्वचषकात बांगलादेशला पराभूत करीत धोनीने विजयाचे शतक साजरे केले, याबाबत विचारले असता धोनी म्हणाला की, ‘‘कर्णधारपदाच्या कारकीर्दीमध्ये आतापर्यंत बरेच चढ-उतार पाहिले आहेत. आयुष्याचे चक्र जसे पूर्ण होत होऊन जिथून तुम्ही सुरुवात केली तिथेच येऊन पोहोचते, तसेच क्रिकेटचेही आहे. जेव्हा तुम्ही सुरुवातीच्या जागेवर येता तेव्हा तुम्ही त्यावेळी त्या गोष्टींचा अधिक सन्मान ठेवत असता.’’
कर्णधारपद म्हणजे काटेरी मुकुट असतो असे म्हटले जाते. एवढी वर्षे भारताचे कर्णधारपद भूषवल्यावर धोनीने आपला अनुभव कथन केला. तो म्हणाला की, ‘‘या प्रवासात आम्ही बऱ्याच वेळा अडखळलो. अखेरच्या षटकांमध्ये भेदक मारा करणारे गोलंदाज आमच्याकडे नव्हते. आमच्याकडे वेगवान गोलंदाज नव्हते, त्याचबरोबर अचूक दिशा आणि टप्प्यावर चेंडू टाकणारे गोलंदाज नव्हते. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही एक चांगला अष्टपैलू खेळाडू शोधू शकलेलो नाही. त्यामुळे या साऱ्या गोष्टी न लपवता, समोर असलेल्या खेळाडूंना सक्षम बनवत या अपेक्षा कशा पूर्ण केल्या जातील, यावर मी भर दिला. जे काही समोर आले त्याच्यामध्ये सुधारणा करत आम्ही पुढे चाललो आहोत.’’
तो पुढे म्हणाला की, ‘‘सातत्याने चांगले क्रिकेट खेळत राहणे, हे एक आव्हान असते. सध्याच्या घडीला आम्ही चांगला खेळ करत आहोत आणि त्याच्या जोरावरच आम्हाला २९ मार्चला अंतिम फेरीत पोहोचायचे आहे. पण त्यापूर्वी सिडनीच्या मैदानात एक मोठे आव्हान आमच्यापुढे आहे. आतापर्यंत जसा चांगला खेळ केला तसाच खेळ या सामन्यात आम्ही करू.’’

कोहली हा मोठय़ा सामन्याचा खेळाडू -धोनी
सिडनी : ‘‘मला वाटत नाही विराट कोहली चुकीचे फटके मारून बाद होत आहे. तो एक आक्रमक फलंदाज आहे, त्यामुळे तो फटके मारणारच. त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने दमदार फलंदाजी केली होती. प्रत्येक सामन्यामध्ये त्याने शतक झळकावयालाच हवे, अशी त्याच्याकडून अपेक्षा करणे चुकीचे ठरेल; पण कोहली हा मोठय़ा सामन्याचा खेळाडू आहे. मोठय़ा सामन्यांमध्ये तो नेहमीच चांगली फलंदाजी करतो,’’ असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले.

लढवय्या धोनी हेच भारताच्या यशाचे गमक -कपिल देव
नवी दिल्ली : भारताला पहिला विश्वचषक जिंकवून देणारे माजी कर्णधार कपिल देव यांनी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वावर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला आहे. धोनीची लढवय्या वृत्ती हेच भारताच्या यशाचे गमक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
‘‘भारताचा हा संघ पूर्णपणे धोनीचाच आहे. नेतृत्व या शब्दाचा अचूक अर्थ धोनीकडे पाहिल्यावर समजतो. धोनीच्या देहबोलीतूनच त्याचे संघावर किती नियंत्रण आहे, हे समजते. तो बहुतांशी वेळा खेळाडूंशी संवाद साधत असतो. खेळाडूंच्या क्षमतेवर त्याचा पूर्णपणे विश्वास असून प्रत्येक खेळाडूला तो आत्मविश्वास देत असतो. त्यामुळेच खेळाडूंची कामगिरी अधिक उजवी होण्यास मदत होते. धोनी एक लढवय्या असून तोच भारताच्या संघाच्या यशाचे गमक आहे,’’ असे कपिल म्हणाले.

विश्वचषक हे गौरवपूर्ण व्यासपीठ -रोहित शर्मा
सिडनी : ‘‘विश्वचषक हे माझ्यासाठी फार मोठे गौरवपूर्ण व्यासपीठ आहे. त्यामुळे विश्वचषकात शतक झळकावण्याचा आनंद अवर्णनीय असाच आहे. जेव्हा संघाला आवश्यकता होती, तेव्हा तेव्हा माझ्याकडून शतक झाले आणि संघ विजयी ठरू शकला, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. सांघिक कामगिरीच्या जोरावर विजय मिळू शकतो, हेच सध्या भारतीय संघाच्या बाबतीतही होताना दिसत आहे. प्रत्येक सामन्यात खेळपट्टीनुसार तुम्हाला खेळ करावा लागतो. यापुढेही कामगिरीत सातत्य ठेवून संघाच्या विजयात हातभार उचलण्यासाठी मी प्रयत्नशील असेल,’’ असे रोहित शर्माने सांगितले.