पराभवाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या पाकिस्तानच्या संघाने झिम्बाब्बेविरुद्धच्या सामन्यात विजयाच्या रियाझाला सुरुवात केली आणि साऱ्यांच्याच मुखातून ‘वाह, वहाब!’ अशी दाद मिळाली. कारण वहाब रियाझच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अटीतटीच्या लढतीत पाकिस्तानने झिम्बाब्वेला २० धावांनी पराभूत करत विश्वचषकातील पहिल्या विजयाची नोंद केली.
पाकिस्तानची प्रारंभी २ बाद ४ अशी दयनीय अवस्था झाली. त्यांची फलंदाजी पुन्हा घसरणार असे वाटत असताना कर्णधार मिसबाह उल हक पुन्हा एकदा संघासाठी धावून आला. पण दुसऱ्या बाजूने एकाही फलंदाजाला त्याला साथ देता आली नाही, अखेर रियाझने त्याला सुयोग्य साथ देत ४८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मिसबाहने ३ चौकारांसह ७३ धावांची संयमी खेळी साकारली. मिसबाह बाद झाल्यावर रियाझने ६ चौकार व एका षटकारानिशी नाबाद ५४ धावा केल्या आणि संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली.
झिम्बाब्वेला ठरावीक फरकाने मोहम्मद इरफान आणि रियाझ यांनी धक्के देत संघाला विजय मिळवून दिला. ब्रेंडन टेलरने (५०) अर्धशतक झळकावत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या होत्या, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. अन्य फलंदाजांनाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. अखेरच्या चार षटकांमध्ये ३४ धावांची गरज असताना शाहिद आफ्रिदीने निर्धाव षटक टाकून झिम्बाब्वेवरील दडपण अधिक वाढवले. पाकिस्तानकडून रियाझ आणि इरफान यांनी प्रत्येकी चार बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान : ५० षटकांत ७ बाद २३५ (मिसबाह उल हक ७३, वहाब रियाझ नाबाद ५४; तेंदाई चटारा ३/३५) विजयी वि. झिम्बाब्वे : ४९.४ षटकांत सर्व बाद २१५. (ब्रेंडन टेलर ५०, मोहम्मद इरफान ४/३०, वहाब रियाझ ४/४५).
सामनावीर : वहाब रियाझ.
३ ब्रिस्बेनमधील गेल्या दहा सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी केल्यावर २००-२५० धावा फटकावून मिळवलेला हा तिसरा विजय आहे.
१४ पहिल्या दहा षटकांमध्ये पाकिस्तानला फक्त १४ धावाच करता आल्या आणि हा आतापर्यंतचा नीचांक आहे.
पन्नास षटके पूर्ण खेळून काढायची आणि संधी मिळाल्यावर मोठे फटके मारायचे हे माझे आणि मिसबाहचे बोलणे फलंदाजीदरम्यान सुरू होते. आमचे वेगवान गोलंदाज आणि अनुभवी शाहिद आफ्रिदीने चांगली गोलंदाजी केली. हा विजय आमच्यासाठी खास आहे.
– वहाब रियाझ, पाकिस्तानचा क्रिकेटपटू.