News Flash

ताठ कण्याचं झाड

माझ्यावर त्यांचा विश्वास होता.

मुंबई हे भारताचे आर्थिक राजधानीचं शहर. या शहरावर अनभिषिक्त साम्राज्य होतं बाळासाहेब ठाकरे यांचं. बाळासाहेबांना एक ज्वलंत व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखलं जातं. पण मी त्यांच्यातला हळुवार माणूस पाहिला आहे. शिखांचा इतिहास समजून घेतल्यावर गदगदून जाणारे बाळासाहेब पाहिलेत. कामगारांवर कोसळणाऱ्या आपत्तींविरुद्ध बोलणारा, सीमाप्रश्नावर कडाडून बोलणारा, वडिलांची महाराष्ट्र आणि मराठीसंबंधीची भूमिका अधिक प्रखरपणे मांडणारा कणखर नेता म्हणून मला ते माहिती आहेत. शिवसनिकांविषयी त्यांना खूप अभिमान होता. ज्याला त्यांनी आपलं म्हटलं त्याच्यासाठी ते काहीही करत असत. लोकांनी हे जवळून अनुभवलं आहे.

माझ्यावर त्यांचा विश्वास होता. शिखांविषयी काहीही असलं तर ते मला त्यासंबंधी विचारत, चर्चा करत. आमच्यापैकी कोणी त्यांच्याकडे गेले की ते त्याला विचारत, ‘‘कुलवंतजींना भेटलात का? त्यांचा सल्ला घेतला का?’’ त्या व्यक्तीला ते थोडं थांबायला सांगत आणि मला बोलावून घेत. त्याच्या प्रश्नासंबंधी बोलत आणि मगच आपली प्रतिक्रिया देत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. एकदा शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष आणि काही मंडळी त्यांना भेटायला गेली होती. त्यांनाही साहेबांनी विचारलं होतं, ‘‘कुलवंतजी कुठं आहेत?’’

सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत एक बडे शीख धर्मोपदेशक व प्रचारक आले होते. त्यांच्यासोबतच्या ताफ्यातील मंडळी येताना उघडय़ा जीपमधून हातात बंदुका, तलवारी वगरे घेऊन आली होती. बाळासाहेबांना हे कळलं. त्यांनी लगेच माझ्याशी संपर्क साधला आणि ही मंडळी कोण आहेत, त्यांचा मुंबईत येण्याचा उद्देश काय आहे, वगरे विचारलं. मला त्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. मी चौकशी करून त्यांना योग्य ती माहिती दिली. साहेबांचं समाधान झालं.

१९८४ मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची अतिशय दुर्दैवी हत्या झाली होती. सर्व देशभरात शीख समाजाविरोधात प्रक्षोभ उसळला होता. त्यामुळे शिखांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली होती. भाजपचे नेते प्रमोद महाजन हे माझे अतिशय जवळचे स्नेही. त्यांनी मला सुचवलं- ‘‘तुम्ही मुंबईतल्या शीख समाजाची एक सभा बोलवा. त्या सभेला सर्व पक्षांच्या नेतेमंडळींना बोलवा. मी त्या सभेचं प्रास्ताविक करीन.’’ मला ती कल्पना पटली. अर्थात यासंबंधी बाळासाहेबांचा सल्ला घेतल्याखेरीज काही करणं योग्य ठरणार नव्हतं. मी त्यांच्याकडे गेलो. साहेबांसोबत प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे, बहुधा जोशी सर अशी मोजकी मंडळी बसली होती. साहेबांना ही कल्पना आवडली. ते म्हणाले, ‘‘सर्वच पक्षांना निमंत्रण द्या. मुख्यमंत्रीही आले पाहिजेत. अन्य राजकीय पक्षांचे प्रमुख आले पाहिजेत. मीही स्वत: येतो.’’ प्रमोद महाजनांचा पुढाकार आणि बाळासाहेबांचा शब्द पुरेसा होता.

मग मी पुढाकार घेऊन मुंबईतील शीख समाजाच्या सर्व संघटनांना, त्यांच्या प्रमुख व्यक्तींना आणि अन्य काही प्रतिष्ठित लोकांना त्या सभेकरिता निमंत्रित केलं. अख्खा षण्मुखानंद हॉल भरला होता. प्रकृतीच्या कारणास्तव बाळासाहेब त्या सभेला येऊ शकले नाहीत. त्यांनी नवलकर आणि मनोहर जोशी सरांना सभेसाठी पाठवलं. प्रमोद महाजन यांनी सुरुवात केली. तत्कालीन मुख्यमंत्री आले होते. आनंदवनातून खुद्द बाबा आमटे आले होते. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीनं मुंबईतील शीख समाजाचं भय नष्ट झालं. मुंबईत शांतता राहिली. शीख समाज निर्भय झाला. पण यामागे प्रमोदजींची कल्पकता आणि साहेबांचा पाठिंबा होता. या सभेचे पडसाद देशभर उमटले. इतके, की विचारून सोय नाही. गुप्तचर खात्यानं सरकारला रिपोर्ट दिला की मुंबईतील शीख समाजाने बाळासाहेब ठाकरे यांना साडेचार कोटी रुपये दिले. त्यामुळे मुंबई शांत राहिली. एकदा मी दिल्लीत गेलो असताना गृहमंत्री सरदार बुटा सिंग मला म्हणाले, ‘‘बरं झालं तुम्ही त्यांना (बाळासाहेबांना) साडेचार कोटी दिलेत ते. त्यामुळे मुंबईत शीख समाज टिकून राहिला!’’ मी ते ऐकून स्तंभितच झालो. बुटासिंगजींना म्हणालो, ‘‘अहो, जर शिखांनी बाळासाहेबांना शांततेसाठी साडेचार कोटी दिले हे खरं असतं तर मीसुद्धा त्यात पाच-पंचवीस हजारांची भर घातली असती ना? आम्ही कोणीच असं काही केलेलं नाही. आणि बाळासाहेब ही व्यक्ती असं काहीही करणारी नाही. उलट, मुंबईत शांतता राखायचं काम बाळासाहेबांनी केलं. त्यांच्याप्रती आपण कृतज्ञ असायला हवं.’’

त्यानंतर बाळासाहेब मला जेव्हा केव्हा भेटत तेव्हा माझ्याकडे बघून हसत आणि विचारत, ‘‘कुलवंतजी, माझे साडेचार कोटी कुठे आहेत?’’ त्यावर आम्ही दोघं मनसोक्त हसत असू.

त्या काळात बाळासाहेबांकडे पंजाबबद्दल कित्येक जण वेडय़ावाकडय़ा गोष्टी सांगायला येत. पण ते थारा देत नसत कोणाला. एकदा त्यांच्याकडे पंजाबमधून बिल्ला नावाचा एक तथाकथित हिंदू चळवळ्या माणूस आला होता. तो स्वत:ला कडवा शिवसैनिक मानत असे. त्याने बाळासाहेबांना काहीबाही सांगितलं : ‘‘पंजाब आता आमचा राहिला नाही. संध्याकाळी घरातून बाहेर पडणं मुश्कील झालंय. पंजाबमध्ये हिंदूंवर खूप अन्याय होताहेत, अत्याचार होताहेत. स्त्रियांवर बलात्कार होताहेत. बुटामध्ये मूत्र ओतून त्यांना ते प्यायला लावताहेत.’’ त्यानं सांगितलेल्या या गोष्टी ऐकून बाळासाहेब अस्वस्थ झाले. पण त्यांनी त्याही स्थितीत मनाला आवर घातला व मला फोन केला आणि विचारलं, ‘‘कुलवंतजी, इथं एक जण आलाय. तो म्हणतोय की, पंजाबात हिंदूंना खूप अन्याय सहन करावा लागतोय. त्यांचं जगणं अस झालंय.. वगरे.’’ ते दिवस अतिशय चिंताजनक होते. एक छोटीशी ठिणगीही मुंबईतील पंजाबी लोकांसाठी चिता ठरू शकली असती. मी साहेबांना म्हणालो, ‘‘असं कसं होईल? आम्हाला काय वेड लागलंय का? आम्हीही भारतीय आहोत. पंजाबातील आमचे बांधव असं करणार नाहीत. ताबडतोब आमच्या समाजाच्या लोकांना घेऊन मी तिथं येतो. या परिस्थितीत सर्वानी एकत्र भेटणं योग्य ठरेल.’’ काही महत्त्वाच्या पंजाबी बांधवांना मी फोन केला आणि त्यांना बोलावलं. त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. म्हणालो, ‘‘आजवर आपल्या मुंबईत शांतता आहे. परंतु ती भंग करण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करत आहे. आपण आपली भूमिका नीट समजावून सांगितली पाहिजे, नाहीतर हे शहर पेटेल.’’ त्यांना घेऊन मी दादरला शिवसेना भवनामध्ये पोचलो. तिथं साहेब आमची वाटच बघत होते. मी साहेबांच्या जवळच्या खुर्चीवर बसलो. बाकी सारे समोर बसले. त्यांनी त्या बिल्ला नावाच्या व्यक्तीला बोलावलं. बिल्ला छान दिसत होता. लांब केस, उंचापुरा, भगवे कपडे घातलेला. प्रभावशाली. बाळासाहेब बिल्लाला म्हणाले, ‘‘बिल्लाजी, अब आप बताइये, जो आपने हमें बताया था।’’ आम्हाला बघून त्यानं भाषा बदलली. ‘‘आपण पंजाबी आहोत. मूळचं आपलं नातं आहे, आपण एक आहोत..’’ वगरे सुरू केलं. साहेबांनी त्याला मधेच टोकलं. म्हणाले, ‘‘बिल्लाजी, ये सब बाते मत बताईये। बस- जो मुझे कहा था वही बात कहिये। पंजाबात हिंदूंवर अत्याचार होतोय, वगरे. स्त्रियांना मूत्र प्यायला लावतात, ते सांगा.’’ परंतु त्याने ‘आपण भाई-भाई आहोत..’ वगरे टेप पुन्हा सुरू केली. त्याचं ते बोलणं ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. बाळासाहेबांसमोरच मी त्याच्यावर बरसलो, ‘‘कुत्ते के बेटे! तुम्हारी हिंमत कैसे हुई, ये सब बोलने की। इथं आमच्या मुंबईत काहीही घडत नाहीये. आणि तू आग लावायला बघतोस? हे शहर शांत आहे ते तुला पाहवत नाही का? बालासाब, ऐसा कुछ भी नहीं हो रहा है।’’ बाळासाहेब माझ्या अवताराकडे पाहतच राहिले. म्हणाले, ‘‘कुलवंत, तुला एवढा राग येतोय म्हणजे हा बिल्ला खोटं बोलतोय. शांत हो. मी आहे ना?’’ गोरापान बिल्ला पार काळाठिक्कर पडला होता. त्याची षष्ठी करून साहेबांनी त्याला फ्राँटियर मेलने परत धाडला. बाळासाहेबांमधील कणखर आणि विवेकी नेता तेव्हा दिसला.

मुंबई शांत होती. आम्ही सुखात जगत होतो. त्यावेळी आमच्या ‘मिडटाऊन प्रीतम’चं बांधकाम सुरू होतं. ते पूर्णत्वाला पोचायच्या टप्प्यावर आलं होतं. एका पहाटे अचानक मोठा धमाका झाला. आम्ही ‘प्रीतम’मधील तिसऱ्या मजल्यावरच्या आमच्या घरात शांतपणे झोपलो होतो. मला  काही कळलं नाही, परंतु बिजी पहाटे उठून काही ना काही करत असायची. तिच्या लक्षात आलं, की खाली काहीतरी घडलंय. ती पटकन् तीन जिने उतरून खाली आली. तिनं पाहिलं की ‘प्रीतम’ आणि ‘मिडटाऊन प्रीतम’ यांच्या मधल्या जागेतून धूर येतोय. सगळीकडे काचा विखुरल्या आहेत. तोवर आम्हीही खाली आलो. त्या मधल्या जागेत कोणीतरी बॉम्ब टाकला होता. त्याचा उद्देश ‘प्रीतम’ नष्ट करण्याचा होता! पण बॉम्ब मधल्या जागेत पडला. दोन्ही इमारतींच्या काचा फुटल्या होत्या. तिथं असलेल्या कार्सचे टायर फुटले होते. परंतु मोठं नुकसान झालं नव्हतं. दादरसारख्या मध्यवर्ती भागात असं घडावं याचा सर्वानाच मोठा धक्का बसला होता.

त्या पहाटे स्फोटाच्या जागेवर सर्वात आधी पोचले ते वाय. सी. पवार. ते त्या भागाचे डीसीपी असावेत त्यावेळी. ही गोष्ट सर्वत्र पसरली. जवळच गृहराज्यमंत्री विलासराव सावंत राहत होते, तेही आले. थोडय़ाच वेळात बाळासाहेबांचा मला फोन आला. त्यांनी चौकशी केली. मला म्हणाले, ‘‘कुलवंतजी, त्यांचा उद्देश तुम्हाला घाबरवण्याचा आहे. मुळीच घाबरू नका. सरळ बिजींना, वहिनीसाहेबांना, मुलांना, नातवंडांना घेऊन जिथं स्फोट झालाय तिथं खुर्च्या टाकून बसा. त्यांना कळू दे, की तुम्ही या प्रकाराने घाबरला नाही आहात. मी आहे सोबत तुमच्या.’’ काही वेळानं ते स्वत: ‘प्रीतम’मध्ये आले.

थोडय़ा वेळाने पोलीस पथक आलं. त्यांनी चौकशी सुरू केली. पोलिसांनी खरं तर स्फोटाच्या जागेची तपासणी करायला हवी होती. परंतु ते अख्ख्या प्रीतम हॉटेलची तपासणी करायला लागले होते. मीही त्यांना पूर्ण तपासणी करू दिली. कुठंही काहीही सापडलं नाही. दुपारी ‘मिड् डे’ची खास आवृत्ती निघाली. त्यात ही बातमी हेडलाइन होती. लोकांनी याचं कौतुक केलं, की बॉम्बस्फोट होऊनही कोहली परिवार डगमगला नाही. उलट, प्रतिकारासाठी एकजुटीनं उभा राहिला. त्या दिव्यातून आम्ही बाहेर पडलो ते केवळ बाळासाहेबांच्या धीराच्या शब्दांमुळे. कणखर हृदयाचा आणि जिगरीचा माणूस होते ते. त्यानंतर एकदा साहेबांनी मला बोलावून सांगितलं, ‘‘कुलवंत, आता मी तुझ्या हॉटेलमध्ये येऊ शकणार नाही. माझ्यावर जर का हल्ला झाला आणि त्यात काही झालं, तर तू अडचणीत येशील. त्यापेक्षा तूच माझ्याकडे येत जा.’’ मी तर त्यांच्याकडे जातच होतो.

काही काळाने शिवसेना-भाजपची सत्ता महाराष्ट्रात आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. माझे सर्वाशीच स्नेहाचे संबंध होते. त्यात सर दादरचे. साहेबांबरोबर ‘पार्क वे’च्या काळापासून आमच्याकडे येणारे. मला वाटतं, १९९७ साल संपता संपता असेल किंवा १९९८ ची सुरुवात असेल, मुख्यमंत्री जोशी सरांचा एके सकाळी मला फोन आला. त्यांनी मला विचारलं, ‘‘तुम्हाला साहेबांचा फोन आला का?’’ मला तसा काही फोन आला नव्हता. मी ‘नाही’ म्हणालो. मग सर म्हणाले, ‘‘साहेबांचा फोन येईल. पण मला राहवत नाही म्हणून सांगतो..’’ ते कोडय़ात बोलत होते. काही क्षण थांबून मला म्हणाले, ‘‘आमच्या सरकारने तुम्हाला मुंबईचे शेरीफ म्हणून नियुक्त करायचे ठरवले आहे.’’

‘‘काय?’’ मी जोरात ओरडलो. माझा आनंद गगनात मावत नव्हता. हे पद अत्यंत मानाचं होतं, प्रतिष्ठेचं होतं. या महान शहराचा मी प्रथम क्रमांकाचा नागरिक बनणार होतो. तेवढय़ात सर म्हणाले, ‘‘कुलवंतजी, मला वाटलं की साहेबांचा तुम्हाला फोन आला असेल, म्हणून मी फोन केला. साहेबांना सांगू नका.’’ तोवर माझ्या मुलानं- टोनीनं डिंपीला फोनवर ही बातमी दिलीही. मी त्याच्या उत्साहाला आवर घातला. त्याला म्हणालो, ‘‘कोणाला काहीही सांगू नकोस.’’ काही वेळानं खुद्द बाळासाहेबांचा फोन आला. ते स्वत: फोनवर बोलत होते. त्यांनी विचारलं, ‘‘काय करत आहात?’’ मी म्हणालो, ‘‘सकाळचं आवरत होतो.’’ ते म्हणाले, ‘‘इथं आत्ता मातोश्रीवर याल का?’’ मी ‘लगेच येतो’ असं म्हणून टोनीला सोबत घेऊन निघालो. ‘मातोश्री’वर पोचलो. साहेब त्यांच्या त्या छोटय़ाशा खोलीत होते. आम्ही तिथं गेलो. साहेबांनी स्वागत करून बसवलं. मला म्हणाले, ‘‘कुलवंत, तुला एक बातमी द्यायची आहे. कालच आमची रात्री एक बैठक झाली. सरांनी विचारलं की, मुंबईचे शेरीफ कोणाला बनवायचं? आम्हाला अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती हवी आहे. मी त्यांना म्हणालो, ‘मी नाव सुचवू का? आपण कुलवंतसिंग कोहलींचं नाव सुचवू या.’’ सर्वानी त्याला मान्यता दिली. पण मी सर्वाना सांगितलं की, कुलवंतजींना ही बातमी मी स्वत: देणार; तुम्ही कोणीही सांगू नका. आता मला सांगा, तुम्ही मुंबईचे शेरीफ व्हायला तयार आहात ना?’’ सत्ताधारी पक्षाचा प्रमुख, सर्वेसर्वा मला हा प्रश्न विचारत होता. त्यातून त्यांचं मोठं मन आणि प्रेम दिसून येत होतं.

मी हरखलेलो. साहेबांना नमस्कार करून आशीर्वाद घेतला. त्यांना एवढंच म्हणालो, ‘‘तुमची आज्ञा प्रमाण. फक्त या आनंदाच्या बातमीवर माझी पत्नी विश्वास ठेवणार नाही.’’ तर ते म्हणाले, ‘‘वहिनीसाहेबांना मी स्वत: सांगतो.’’ त्यांनी ही बातमी माझ्या पत्नीला दिली आणि शुभेच्छाही दिल्या.

पाकिस्तानातून मुंबईत येऊन स्थिरस्थावर झालेल्या एका शीख परिवारातील व्यक्तीला बाळासाहेब ठाकरे या लोकनेत्यानं केवढं मोठं पद दिलं होतं! आणि ते देताना कोणताही आविर्भाव नव्हता. फळभाराने झाड लगडलेलं असतं तेव्हा ते नम्र होऊन झुकतं. परंतु त्याचा ताठ कणा मात्र कायम असतो आणि आभाळाकडे जाणारी दिशा पक्की असते. बाळासाहेब हे असं झाड होतं!

– कुलवंतसिंग कोहली

ksk@pritamhotels.com

शब्दांकन : नीतिन आरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2018 12:48 am

Web Title: kulwant singh kohli articles in marathi on unforgettable experience in his life part 10
Next Stories
1 बाळासाहेब नावाचा राजयोगी
2 ठाकरे नावाचं गारुड
3 मोठय़ा मनाचे यशजी
Just Now!
X