अशोक तुपे

चहाचे किंवा वडे, मिसळ, डोसा आदींचे दुकान, गॅरेज, बांधकाम साहित्यपुरवठा.. मोटारसायकलीवरून खाद्यपदार्थ पोहोचते करण्याचे काम.. इंजिनीअर झालेली मुले आज ही सारी कामे करताहेत. नोकरीच्या मागे धावण्यात अर्थ उरला नाही, म्हणून गावातून शहरांत आलेले हे इंजिनीअर स्वस्थ नाहीत बसलेले.. 

इंजिनीअर झाल्यानंतर हवा तसा पगार मिळाला नाही म्हणून मूळचा लातूरचा असलेल्या अजित शिवाजीराव केरुरे याने पुण्यातील सदाशिव पेठेत ज्ञानप्रबोधिनीजवळ चहाचे दुकान सुरू केले. दुकानात ‘माझी पदवी फक्त लग्न जमवायला कामी आली. नोकरी शोधायला गेलो तेव्हा पदवीने जीव सोडला होता..’ असा मजकूर असलेल्या प्रतिमेला हार घातला. त्याची चर्चा समाजमाध्यमांतून सर्वदूर पोहोचली अन् अभियांत्रिकी क्षेत्रातील कमी झालेल्या नोकऱ्या, पॅकेजचा फुटलेला फुगा याचीच चर्चा सुरू झाली. आता कला किंवा वाणिज्य शाखेच्या पदवीधरांच्या बेरोजगारांच्या जशा फौजा गावोगाव आहेत तसेच इंजिनीअरिंग बाबतही घडेल, असा निराशावादही काहींनी व्यक्त केला. तर काहींना शिक्षणावर खर्च केलेला पसा वाया जाण्याची भीती वाटू लागली. विद्यार्थी व पालकांमध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली. पण हे सारे चित्र वरवरचे असल्याचे बघायला मिळते. मुळात नोकरी मिळाली नाही तरी विविध क्षेत्रांत यशस्वी होण्याचे कौशल्य मात्र अभियांत्रिकीच्या शिक्षणातून मिळत असते.. त्यामुळे काहीही करून जीवन जगण्याचे ‘जुगाड’ जुळविण्याचा प्रयत्न अनेक तरुण करत आहेत, त्यांना त्यात यशही मिळते आहे!

अभियांत्रिकीच्या पदवीने नोकरी मिळाली नाही पण त्या शिक्षणाने कौशल्य मात्र मिळाले, असे पुण्यात चहाचे दुकान टाकणारा अजित मान्य करतो. मुळात अभियांत्रिकीच्या शिक्षणात क्षमता, ताकद, नकारात्मक व सकारात्मक बाबी, धोके व संधी याचा विचार करायला (स्वॉट अ‍ॅनालिसिस) शिकविले जाते. त्यामुळे त्याचा फायदा मला धंदा निवडण्यापासून चहा तयार करण्यापर्यंत झाला. चहाची चव विकसित करताना तांत्रिक दृष्टिकोन कामी आला. त्यामुळे धंद्यात यश मिळाले. हा दृष्टिकोन अभियांत्रिकी शिक्षणामुळे मिळाल्याचा त्याचा दावा आहे. एका इंजिनीअरने चहा विकणे हेच मुळी समाजमान्यता मिळणारे नव्हते. पण आता केवळ नोकरी या मध्यमवर्गीय मानसिकतेतून तरुण व त्यांचे पालक बाहेर पडायला लागले आहेत. अनेक इंजिनीअर बटाटेवडा, मिसळ, डोसा, बिर्याणी यांची दुकाने टाकून किंवा थेट ऑनलाइन पद्धतीने विक्री करत आहेत. त्याला मान्यताही मिळू लागली आहे. मूळचा बेलापूर (ता. श्रीरामपूर) येथील कृष्णा सिकची या तरुणाने पुण्यात चक्क गॅरेज सुरू केले आहे. वाहनांच्या दुरुस्तीबरोबरच सुटे भाग तो विकतो. मात्र हे गॅरेज ऑनलाइन पद्धतीचे आहे. म्हणजे वाहनचालकाला घरबसल्या व्हॉटस्अ‍ॅप किंवा फेसबुकच्या माध्यमातून आपल्या वाहनाची नेमकी कशी दुरुस्ती केली जात आहे हेही दिसते. अनेक ऑनलाइन सेवा त्यात तो देत असतो. तर जेजुरीचा पण आता पुण्यात स्थायिक झालेल्या सूरज सस्ते याने बांधकाम व वाहन उद्योगाकरिता स्टार्टअप कंपनी सुरू करून काही संगणक प्रणाली पुरविल्या आहेत.

भडगाव (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील प्रसाद सभासद हा इंजिनीअर झाल्यानंतर शेती करतो. शेतीत अभियांत्रिकीचे कौशल्य त्याला कामी आले. ठिबक, विजेचा पंप, गोठा या सर्व ठिकाणी स्वत:चे तंत्रज्ञान वापरले. आज प्रसादच्या शेतीवरती कृषी पदवीधर, विद्यार्थी, शेतकरी यांच्या सहली जात आहेत. चित्रवाणी वाहिन्यांवर त्याच्या यशोगाथा प्रसारित होत आहेत. त्याच्यासारखेच प्रदीप कोलते, सचिन जाधव आदी इंजिनीअरही यशस्वी शेती करीत आहेत. अशा एक ना अनेक यशोगाथा विविध क्षेत्रांमध्ये  बघायला मिळतात. त्यामुळे नोकरी मिळाली नाही म्हणून बेकारीचे जीवन जगून पालकांचा बोजा मात्र इंजिनीअर बनलेले नाहीत. जीवनात यशस्वी होण्याचे एक कौशल्य त्यांना मिळाले आहे.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांचा पहिला ओढा असतो तो शहरातील चांगल्या महाविद्यालयात जाण्याचा. तेथे शिकत असताना काही जण पहिल्याच वर्षी नापास होतात. मग वर्ष वाया जाते. महाविद्यालयात अनेक कंपन्या मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांची नोकरी निश्चित करतात. पण गेल्या काही वर्षांपासून अनेक महाविद्यालयांत हे ‘कॅम्पस इंटरव्ह्य़ू’ होतच नाहीत. पूर्वी भल्या मोठय़ा पगाराची पॅकेजे मिळत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पॅकेजची चर्चा असायची. पुढे ते कमी झाले. आता तर या चर्चा संपल्यातच जमा आहेत.

इंजिनीअर होऊन बाहेर पडल्यानंतर आता पुढे काय, असा प्रश्न निर्माण होतो. पण घरी जाऊन शेती करायची नाही, हे त्याने मनोमन ठरविलेले असते. आर्थिक परिस्थिती चांगली असलेली मुले अमेरिका, जपान, जर्मनी आदी प्रगत देशांमध्ये ‘एमएस’सारख्या पदव्या संपादन करायला जातात. किंवा काही जण देशातीलच चांगल्या महाविद्यालयात ‘एमई’चे पदव्युत्तर शिक्षण घेतात. काही ‘एमबीए’कडे जातात, तर काही स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. अगदीच यूपीएससी, एमपीएससी नाही तर तलाठी व ग्रामसेवकापासून कोणतीही नोकरी स्पर्धा परीक्षेतून मिळवायची, हा त्यांचा संकल्प असतो. काही जण विविध कोर्स करतात. तर काही फ्रेंच, स्पॅनिश, जपानी अशा वेगवेगळ्या भाषा शिकतात. मार्केटिंग, सेल्स, रिअल इस्टेट अशा एक ना अनेक क्षेत्रांत नोकरी मिळवतात. काही ऑनलाइन कंपन्या, खासगी बँका, विमा या क्षेत्रांत जातात. कोणी एखादी लहानशी स्टार्टअप कंपनी चालू करतो, तर एखादा ऑनलाइन भाजीपाला विकतो. वेगवेगळ्या क्षेत्रांत जाऊन जीवन जगण्याची कला विकसित करून कसे का होईना पण ‘जुगाड’ जुळवून यशस्वी होण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

अभियांत्रिकीची पदवी मिळाल्यानंतर लगेच नोकरी किंवा अन्य संधी उपलब्ध होत नाहीत. पण शिकत असताना वसतिगृहात किंवा खासगी सदनिका घेऊन गावाकडून येणारी मुले राहत असतात. शिक्षण संपल्यानंतरही राहण्याची सोय होते. ही हजारो ठिकाणे म्हणजे हंगामी बेरोजगार असलेल्या इंजिनीअरांसाठी ‘आधार केंद्रे’ बनली आहेत. शिकलेले आणि नोकऱ्या करणारे विद्यार्थी कंपन्यांना खोलीवरच्या मित्रमंडळींचे संदर्भ देतात. त्यामुळे पुढल्या काहींना मुलाखतीचे कॉल येतात. काही खोल्यांमध्ये मुलेच इतकी समजूतदार की, मित्रांना नोकऱ्या मिळत नाही तोपर्यंत फुकट राहू दिले जाते. यापैकी काही बेरोजगार तरुण स्विगी, डोनजू, उबर ईटस् अशा घरपोहोच सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये मोटारसायकलवरून ‘डिलिव्हरी’ देण्याचे काम करून पैसे कमावतात आणि स्पर्धा परीक्षा किंवा अन्य कोस्रेस करतात. राज्यभरात कुठेही इंजिनीअरिंग केले की मग तरुण पुणे, मुंबई, नाशिक आदी शहरांमध्ये येतात. त्यांच्यासाठी ही पुनर्वसन केंद्रेच आहेत. या शहरांत अनेक तरुण एकमेकांना मदत करतात. कोणी कोणाला नोकरी मिळवून देतो. काय करायचे, कशी दिशा हवी, याचे मार्गदर्शन करतो. प्राचार्य, प्राध्यापक हेदेखील नोकऱ्या मिळवून देण्यासाठी धडपड करतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षे तरी महाविद्यालयात येऊन कॅम्पस इंटरव्ह्य़ू त्यांना देता येतो. महाविद्यालयांचे अस्तित्वही त्यावर अवलंबून असते. अशा प्रकारे जीवन जगण्याचा एक मार्ग सापडतो.

त्याला काही अपवादही असतात. काही अभियंत्यांना नोकरी मिळत नाही आणि भांडवल नसल्याने धंदाही नाही. असे अपवादाने गावाकडे परततात. काही अर्धवेळ घरची शेती करून जिल्ह्य़ाच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कंपन्यांमध्ये कमी पगाराची नोकरी करतात. आज तरी इंजिनीअर झाल्यावर बेकारीचे जिणे जगावे लागेल, असे दिसत नाही. मात्र फार मोठय़ा अपेक्षा अनेकांच्या पूर्ण झाल्या नाहीत, हेदेखील एक वास्तव आहे.

अभियांत्रिकी शिक्षणामुळे जागतिक भान मात्र तरुणांना आले आहे. जगातील नवे तंत्रज्ञान, आर्थिक, राजकीय बदलाचे होणारे परिणाम काय होतील, त्याची झळ स्वत:लाही कशी बसेल याची जाणीव झाली आहे. बदलत्या जगाबरोबर तो           आज धावत आहे. धावताना कधी थांबावे लागते, कधी ठेचा बसतात. कडू-गोड अनुभव येतात. त्यातून निभावून जाण्याचे सामर्थ्य व क्षमता त्यांच्यात विकसित झाली आहे. त्यामुळे अगदीच गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या नाही तरीदेखील जगण्याचा मार्ग शोधताना केलेली धडपड अगदीच वायाही जात नाही. अद्याप इंजिनीअरची प्रतिष्ठा खालावलेली नाही. शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नाकरिता मुली मिळत नाहीत. पण मुलीदेखील मोठय़ा संख्येने इंजिनीअर होतात. त्यांनाही इंजिनीअर नवरा हवा असतो. मोठय़ा शहरात कमी पगाराची नोकरी असली तरी दोघांच्या पगारावर त्यांचे भागते. शहरी संस्कृतीची ओढ अजूनही त्यांची थांबलेली नाही. ते भवताल त्यांना मिळते. गावाकडे ते पुन्हा परतत नाहीत.