विकास महाडिक

माथाडी कामगारांच्या आदल्या दोन पिढय़ांचा प्रवास हा असंघटितपणापासून संघटनेकडे, हताशेपासून उमेदीकडे झाला. मात्र आता, हा पेशाच संकटात आहे असे चित्र असताना, आजच्या माथाडी तरुणांची स्थिती काय आहे?

पश्चिम महाराष्ट्रातील आजचा तरुण आणि महाराष्ट्र राज्यस्थापनेच्या आधीचा तत्कालीन तरुणवर्ग यांमधला फरक फक्त काळाचाच नाही तर आर्थिक संधींचाही आहे. साठ वर्षांपूर्वी सातारा, अहमदनगर आदी जिल्ह्य़ांत असलेली दुष्काळजन्य स्थिती, घरोघरी अठरा विशे दारिद्रय़, शिक्षणाचा अभाव आणि रोजगाराच्या तुटपुंज्या संधी यामुळे मुंबईच्या व्यापारी बंदरात चढ-उताराचे काम करण्यास आलेल्या माथाडी कामगारांसारखी अवस्था आज महाराष्ट्रात नाही. तरीदेखील, अन्नधान्य व फळे यांच्या व्यापारउदिमाचे महत्त्वाचे केंद्र ठरलेल्या नवी मुंबई परिसरातील माथाडी कामगारांत किमान ३० टक्के तरुण आहेत.

राज्यात तीन लाखांपेक्षा जास्त असलेल्या माथाडी कामगारांमधील काही तरुणांनी पदवी घेऊनही हे काम स्वीकाल्याचे विदारक सत्य नाकारून चालणार नाही. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळजन्य भागातून आलेला हा कामगारवर्गच आता नामशेष होण्याच्या मार्गावर असून आपल्या उत्कर्षांसाठी आजही झगडताना दिसत आहे. माथाडी कामगाराची वाटचाल ही गिरणी कामगारांच्या मार्गावर सुरू असल्याने भविष्यात माथाडी कामगार दिसणार नाही असे चित्र आहे. त्यात हा तरुणही उद्ध्वस्त होणार आहे. हे सारे खरेच. पण आज नवी मुंबईत आल्यानंतर, पश्चिम महाराष्ट्रातील हे तरुण कसे राहतात? कसे जगतात? या प्रश्नांची उत्तरे आणखीच चक्रावून टाकणारी आहेत.

त्याआधी या कामगारांच्या इतिहासाकडे धावती नजर टाकू. साठ-सत्तर वर्षांपूर्वीपासून विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील रांगडा गडी मुंबईत रोजीरोटीसाठी आला. मुंबईतील गोदी कामगारांत मालाची चढउतार करण्याचे काम हा कामगार करू लागला. गावी गरिबी पाचवीला पुजलेली असल्याने त्याने पडेल ते काम करण्याची मानसिक स्थिती मुंबईत पाय ठेवतानाच केली होती; त्यामुळे कामाच्या ठिकाणीच एखाद्या कोपऱ्यात जेवणखाण करण्याची वेळ या कामगारावर आली होती. अशा वेळी त्यातील एका तरुणानेच- स्वर्गीय आण्णासाहेब पाटील यांनी- या असंघटित मेहनती कामगारांना १९६२ मध्ये एकत्र केले. संघटित होण्याची ही चळवळ तीव्र झाल्यानंतर १९६४ मध्ये कामगार कायद्याप्रमाणे या कामगारांसाठी एक संघटना स्थापन करण्यात आली. त्यानंतर याच संघटनेच्या दबावापुढे १९६९ मध्ये माथाडी कायदा संमत झाला. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक आणि शरद पवार यांनी या कामगार चळवळीला बळ दिले आणि ही चळवळ राज्यभर फोफावली. राज्यातील अनेक बाजार समित्या व कारखान्यांत तीन ते साडेतीन लाख माथाडी कामगार काम करीत आहेत. संघटित कामगारांप्रमाणे लाभ मिळवत आहेत. मुंबईतील घाऊक व्यापाराचे स्थलांतर नवी मुंबईत झाले, न्हावा-शेवा गोदीतून आयात-निर्यात होऊ लागली. त्यानंतर – विशेषत: १९९० च्या दशकापासून नवी मुंबई हे माथाडींचे मोठे केंद्रस्थान ठरले.

साठच्या दशकात माथाडी कामगार म्हणून पाठीवर ओझे वाहणाऱ्या कामगाराची पहिली पिढी तोवर एक तर कालवश झाली किंवा मुलाच्या पाठीवर आपले ओझे सरकवून गावी निघून गेली. यानंतर आली ती दुसरी पिढी, तीही आज वयाने चाळिशीपार किंवा पन्नाशीपार जाते आहे. गावाकडील दुष्काळजन्य स्थिती, दुर्गम भाग यामुळे या कामगाराचेही शिक्षण पूर्ण होऊ शकले नव्हते. त्यामुळे वडिलांच्या जागी ओझे उचलण्याचे काम या दुसऱ्या पिढीतील तरुणांनाही करावेच लागले. माथाडी कायदा संमत झाल्याने आणि कामगार संघटना सक्रिय असल्याने माथाडी कामगाराचे पाठीवरचे ओझे आता मात्र कमी झाले आहे. सुमारे अर्धशतकापूर्वी, गोदीत येणाऱ्या सातशे ते आठशे किलोच्या गोणी हे गावाकडच्या कुस्तीच्या आखाडय़ात तयार झालेले तीन-चार तरुण लीलया पेलत होते. नंतरच्या काळात वजन शे-दीडशेपर्यंत कमी करण्यास मालकांना भाग पाडले. आता तर ही ओझी ८० किलोच्या खाली आली आहेत. पूर्वी चढउताराचे काम करताना वाहन आणि दुकान यांच्यामध्ये एक फळी टाकून करावे लागत होते पण नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दुकानांच्या कठडय़ांना गाडय़ा लागतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या पिढीचे पाठीवरील ओझे काही अंशी कमी झाले. या दुसऱ्या पिढीच्या माथाडी कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण घेऊन पर्यायी नोकऱ्या स्वीकारलेल्या आहेत. यात डॉक्टर, वकील, अभियंता झालेले तरुणदेखील आहेत. मात्र शिक्षण घेऊनही नोकऱ्या उपलब्ध नसल्याने काही पदवी/पदविका घेतलेले तरुण, काही बारावी वा त्याहून कमी शिकलेले हे ओझे वाहताना दिसत आहेत.. ती आहे तिसरी पिढी.

ही तिसरी पिढी आदल्या पिढीपेक्षा निराळी दिसते. समाजात आपली ‘माथाडी’ ही ओळख त्यांना नको असते. यापैकी अनेक तरुण स्मार्टफोन वापरतात, जीन्स-टीशर्ट घालतात.. आणि महत्त्वाचे म्हणजे, कोणत्या ना कोणत्या गटाचे ‘कार्यकर्ते’ असतात!

माथाडी कामगारांच्या संघटनाच येथे १८ ते १९ असतील; त्यामुळे नेते, पदाधिकारीही तितकेच अधिक. त्यांना लागणारे कार्यकर्तेही अधिक. हे कार्यकर्तेगिरीचे काम माथाडी तरुण आज अधिकच रस घेऊन करताना दिसतात. शिवजयंतीसारखे कार्यक्रम, महापूजा, शिर्डीसारख्या पदयात्रा हे ‘सामाजिक उपक्रम’ अगदी हिरिरीने पार पाडले जातात, ते राजकारणाची पहिली पायरी म्हणूनच. ‘आपल्या बळावर नवी मुंबईतले दोन आमदार झाले’ या राजकीय शक्तीची जाणीव माथाडी तरुणाला आहे. माथाडी तरुणांची ताकद ठाणे- पनवेल भागापासून मुंबईपर्यंतच्या मराठा क्रांती मोर्चामध्येही दिसली आहेच आणि अशाच एका मोर्चानंतर स्थानिक बिगरमराठा समाजाशी रस्त्यावर हाणामाऱ्या झाल्या तेव्हा याच माथाडी वर्गाचे नाव घेतले गेले, ही घडामोडही अलीकडलीच आहे.

या कष्टकरी कामगारांच्या टोळ्यामध्ये संघटित गुन्हेगारी स्वरूपाचे लोकदेखील घुसले आहेत. टोळ्यांमध्ये कामगार कामाला लावण्यासाठी पैशाची देवाणघेवाणदेखील होत आहे. त्यामुळे सरळमार्गी तरुण कामगारांना हे काम नकोसे झाले आहे. ‘एका टोळीत अनेक कामगार झाल्यास सर्वाच्या वाटय़ाला येणारे उत्पन्न कमी होऊ लागले आहे. कमी कामगारांच्या टोळ्यांना उदरनिर्वाह होईल इतके उत्पन्न किमान मिळते,’ असे नवी मुंबईच्या ‘एपीएमसी’तील माथाडी कामगार प्रकाश देशमुख या तरुणाने सांगितले. त्यामुळे माथाडी पेशा सोडून काही मुलांनी इतरत्र नोकऱ्या स्वीकारल्या आहेत. याविषयी माथाडींसाठी निर्माण झालेल्या ‘आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा’चे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना विचारले असता ‘वास्तविक माथाडी चळवळ एका उदात्त हेतूने निर्माण करण्यात आली होती. त्यात आता मोठय़ा प्रमाणात घुसखोरी झाली आहे,’ असे ते म्हणाले. मात्र, ‘माथाडी कामगार करीत असलेल्या कष्टामुळे आता तिसरी पिढी शिक्षण घेत आहे. त्यामुळे या कामगारांच्या घरात आता डॉक्टर, वकील, इंजिनीअर झाले आहेत, मात्र शिक्षण घेऊनही नोकऱ्या न मिळाल्याने वडिलांच्या जागेवर काम करणाऱ्या तरुणांची संख्यादेखील जास्त आहे.’ यावर त्यांनी भर दिला.

फळ, भाजी, कांदा, बटाटा यांसारख्या घाऊक बाजारात बाजार ‘मुक्त व्यापार’ सुरू झाल्याने माथाडी कामगार हा पेशाच संकटात आला आहे. त्याविषयी, ‘माथाडी कामगारांचा प्रवास गिरणी कामगारांच्या मार्गावर सुरू असून शासनाची धोरणे ही माथाडी कामगारांसाठी धोक्याची घंटा आहे,’ असे आमदार आणि माथाडी नेते शशिकांत शिंदे सांगतात. मोठय़ा प्रमाणात बेकार होणाऱ्या या कामगारांच्या तिसऱ्या पिढीला सुशिक्षित आणि सक्षम बनविण्याची आता गरज आहे, हाच त्यांचाही सूर असतो.

माथाडी कामगार कायद्यामुळे कामगारांना आता बऱ्याच सुविधा मिळतात. राज्य सरकाने नवी मुंबईत सर्व माथाडी कामगारांना सवलतीच्या दरात घरे दिलेली आहेत. त्यामुळे गावातील काही उनाड तरुणांना माथाडी कामगार म्हणून कामाला लावताना साठ ते सत्तर हजार रुपये देऊन माथाडी कामगार म्हणून मार्गी लावण्याचे प्रमाण जास्त आहे. माथाडी कामगाराचा परवाना दोन-तीन लाखांना विकून गाव गाठलेल्या माथाडी कामगारांची संख्याही लक्षवेधी आहे. त्याहीपुढे, कागदोपत्री माथाडी म्हणून वावरत, स्वत:ऐवजी उत्तर प्रदेश- बिहारचे ‘बदली कामगार’ कामाला ठेवून स्वत: माथाडी कामगारास मिळणारी रक्कम घेऊन दहा-पंधरा हजार रुपये ‘बदली कामगारा’च्या हातावर टेकवणारेही महाभाग आहेत.  महाराष्ट्रातील तरुणांनी माथाडी कामच करावे, असे कुणीच म्हणणार नाही. परंतु हे काम करून एका पिढीने मुलांना उज्ज्वल भवितव्य दिले, ते भान आजच्या तरुणांत कमी दिसते आणि त्याऐवजी राजकारणाचा उन्माद अधिक दिसतो, ही चिंतेची बाब आहे.

vikas.mahadik@expressindia.com