सेवाभाव, संयम आदी गुण अंगी बाणवा, अशा मार्गदर्शनाची गरज भाजपला आहे याबाबत मात्र शंका नाही..
उत्तर प्रदेशातील एका जिल्हय़ात अल्पसंख्य असलेल्या हिंदूंविषयी भाजप अध्यक्षांना इतकी काळजी असेल तर अन्य प्रांतांतील अन्य अल्पसंख्याकांचा भारदेखील त्यांनी वाहायला हवा. तसे न करणे हा निवडक अल्पसंख्याकवाद झाला. काँग्रेस त्यासाठी ओळखली जात होती.
सत्ता मिळाली की इतरांना समजूतदारपणे वागा असे सांगणे सोपे असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा सोपा मार्ग निवडला. व्यक्ती असो वा राजकीय पक्ष, त्याच्या समजूतदारपणाची कसोटी तो अधिकारांत असताना कसा वागतो यात नसते. तर अधिकार नसताना त्याच्या समजूतदारपणाची पातळी काय आहे, यावर त्याचे व्यक्तिमत्त्व ठरत असते. तेव्हा या कसोटीस मोदी सरकार किती उतरते याचा हिशेब ज्याने त्याने मांडावयाचा आहे. येथे दखल घ्यावयाची आहे ती मोदी यांनी या अधिवेशनात भाजप कार्यकर्त्यांसाठी सांगितलेली सत्त्वगुणांची सप्तपदी. ती मांडण्याआधी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर विरोधाचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला. तो करताना भाजप जेव्हा विरोधात होता तेव्हा नेमके काय करण्यात धन्यता मानत होता, हा प्रश्नदेखील शहा यांनी या वेळी मांडला असता तर त्यात प्रामाणिकपणा दिसून आला असता. शहा यांनी उत्तर प्रदेशच्या समाजवादी सरकारवर आरोप करताना उत्तर प्रदेशातील शामली जिल्हय़ातील कैराना गावातून हिंदूंवर स्थलांतरित होण्याची वेळ आल्याचा दावा केला. येथे एक स्पष्टीकरण आवश्यक ठरते. समाजवादी पक्षाचा पत्कर घ्यावा असे त्या सरकारचे वर्तन नाही. परंतु ते सरकार नालायक आहे म्हणून लायक म्हणवून घेणाऱ्या पक्षाने त्यावर वाटेल तो आरोप करणे समर्थनीय ठरू शकत नाही. शहा यांचे म्हणणे असे की उत्तर प्रदेशात जे काही सुरू आहे ते लोकशाहीसाठी ठीक नाही. भाजपच्या अध्यक्षांचे हे विधान त्यांच्या बिहार निवडणुकांतील ‘‘.. तर पाकिस्तानात फटाके फुटतील’’ या विधानाची आठवण करून देणारे आहे. याची प्रमुख कारणे दोन. एक म्हणजे ते म्हणतात ते धादांत असत्य आहे. इंडियन एक्स्प्रेस आणि अन्यांनी केलेल्या पाहणीत हे स्पष्टपणे दिसून येते. शहा ज्यास समाजवादी पक्षाच्या विरोधात झालेले स्थलांतर म्हणतात त्यातील काही दहा वर्षांपूर्वी झालेले आहे, काही दिवंगत झाल्याने कैराना गावच काय पण हे जगच सोडून गेले आहेत अािण काहींनी दोन ते पाच वर्षांपूर्वी नोकरी- व्यवसायासाठी आपले गाव सोडल्याचे उघड झाले आहे. याचा अर्थ समाजवादी पक्षाच्या राजवटीच्या निषेधार्थ म्हणून हे स्थलांतर झालेले नाही. अािण दुसरे कारण म्हणजे त्या जिल्हय़ात अल्पसंख्य असलेल्या हिंदूंविषयी भाजप अध्यक्षांना इतकी काळजी असेल तर अन्य प्रांतांतील अन्य अल्पसंख्याकांचा भारदेखील त्यांनी वाहायला हवा. तसे न करणे हा निवडक अल्पसंख्याकवाद झाला. काँग्रेस त्यासाठी ओळखली जात होती. असो. मुद्दा मोदी यांनी घालून दिलेल्या सप्तपदीचा.
सेवाभाव, संतुलन, संयम, समन्वय, सकारात्मकता, संवेदना अािण संवाद हे पंतप्रधान मोदी म्हणतात ते सात गुण. हे भाजप नेते/कार्यकर्ते यांनी आत्मसात करावेत, असा मोदी यांचा सल्ला आहे. वास्तविक या गुणयादीस संपादकीय कात्री लावून पाचांत भागवता आले असते. उदाहरणार्थ संतुलन आणि संयम ही दोन स्वतंत्र पावले न करता एकातच चालू शकते. कारण संयम असल्याखेरीज संतुलन असू शकत नाही. तीच बाब संवाद अािण समन्वय यांची. हे गुणदेखील एकत्र करता आले असते. कारण समन्वयात संवाद हा अनुस्यूतच असतो. तेव्हा या सप्तसूत्रांची पंचमी होऊ शकली असती. परंतु भाषेशी खेळावयास आवडणाऱ्या पंतप्रधानांना पाचापेक्षा सात बरे असे वाटले असावे. असो. परंतु या अशा मार्गदर्शनाची गरज भाजपला आहे याबाबत मात्र शंका नाही. ती गरज किती आहे हे पाहावयाचे असेल तर एकनाथ खडसे यांच्यापर्यंत माग काढत यावयाचीदेखील गरज नाही. या अधिवेशनातच काय घडले त्यावरून हे कळावे. मोदी मंत्रिमंडळातील मंत्री मनेका गांधी यांचे सुपुत्र खासदार वरुण यांनी या अधिवेशनोत्तर मेळाव्याकडे पाठ फिरवणे पसंत केले. याचे कारण उत्तर प्रदेशचे संभाव्य मुख्यमंत्री म्हणून आपले नाव न जाहीर केले गेल्यामुळे वरुण फुरंगटून बसले होते, असे म्हणतात. तेव्हा त्यांच्या ठायी सेवाभाव नाही असा निष्कर्ष काढता येईल. मोदी यांनी प्रसृत केलेल्या सप्तगुणांतील पहिला क्रमांक या सेवाभावाचा आहे. भाजपतील अन्य अनेक नेत्यांप्रमाणे वरुण हे संघातून भाजपमध्ये आलेले नाहीत. अशी संघशिक्षा घेऊन भाजपत आलेल्यांत सेवाभाव असतो, असे म्हणतात. परंतु ते मान्य करण्याइतका पुरावा नाही. संघाची पाश्र्वभूमी घेऊन भाजपमध्ये आलेले अािण पुढे काँग्रेसी नेत्यांप्रमाणे विलासी इमले बांधण्यात मश्गूल असलेल्या भाजप नेत्यांची संख्या कमी नाही. तेव्हा काँग्रेस असो वा भाजप. एकदा का सत्ता मिळाली की सेवाभाव गायब होतो, हा अनुभव जनतेस नवा नाही. या सप्तगुणांत मोदी यांनी संयमाचादेखील आवर्जून समावेश केला, हे बरे झाले. ते ज्या पक्षाचे पंतप्रधान आहेत त्या पक्षास या गुणाची कधी नव्हे इतकी आज गरज आहे. साक्षी महाराज, साध्वी निरंजन ज्योती, गिरिराज सिंग, योगी आदित्यनाथ अशा एकास झाकावे अािण दुसऱ्यास काढावे अशा दर्जाचे हे नामांकित भाजपचेच सदस्य आहेत, हे जाणवल्यामुळे मोदी यांना या गुणसाधनेची गरज वाटली असावी. हे सर्व भगवे वस्त्रांकित. म्हणून एक वेळ त्यांच्या विधानांकडे दुर्लक्ष करता येईल. परंतु मग सुब्रमण्यम स्वामी यांचे काय? पंतप्रधान मोदी यांनी अगदी नवसाने राज्यसभेत मागून घेतलेल्या स्वामी यांनी आल्या दिवसापासून वाहय़ात विधानांचा रतीब घालावयास सुरुवात केली आहे, त्यात खंड पडण्याची लक्षणे नाहीत. त्याचबरोबर हा सल्ला पक्षाध्यक्षांनादेखील लागू होतो काय, हादेखील प्रश्न आहे. कारण पंतप्रधान मोदी यांनी तो देण्याआधी काही तास पक्षाध्यक्ष शहा यांनी उत्तर प्रदेशातून होत असलेल्या हिंदूंच्या कथित स्थलांतरावर भाष्य केले होते. मुळात हे स्थलांतराचे वृत्त हाच कसा बनाव आहे हे अनेकांनी दाखवून दिले असून ते संयमाचा अभाव असल्याचेच निदर्शक म्हणावे लागेल. वास्तविक भाजपने या स्थलांतरितांचा छडा लावण्यासाठी एक समितीदेखील स्थापन केली आहे. ही समिती सदर परिसराला भेट देणार असून सत्यशोधन करणार आहे. अशा वेळी तिच्या अहवालापर्यंत थांबणे हे अधिक शहाणपणाचे अािण संयमाचे द्योतक ठरले असते. तेव्हा संयम म्हणजे काय हे आज भाजपमधील अनेकांना समजावून सांगायला हवे असे पंतप्रधान मोदी यांना वाटले असेल तर ते योग्यच. मोदी यांनी दिलेला आणखी एक गुणसल्ला दखल घ्यायला हवा. तो म्हणजे संवाद. फक्त फरक इतकाच की अन्य गुण हे कमतरतेसाठी ओळखले जात असतील तर संवाद हा गुण अतिपुरवठय़ासाठी दखलपात्र ठरतो. म्हणजे अन्य गुणांची पातळी वाढवा असे जर भाजपवासीयांना सांगावे लागणार असेल तर संवादाची पातळी जरा कमी करा, असेही सुचवण्याची गरज आहे. त्यात नव्या पिढीच्या समाज माध्यमांमुळे तर संवादाचा अतिरेकच होताना दिसतो. कोणा अभिनेत्याचा/कलाकाराचा वाढदिवस आहे, साद संवाद. कोणाचे निधन झाले, साद संवाद. कोणाचा विजय असो वा पराजय. ही संवाद साधण्याची संधी काही सोडली जात नाही. परंतु संवादाच्या अभावाइतकाच अतिसंवादही मारक असतो, याचे भान असलेले बरे. मोदी यांच्या सप्तपदीमुळे ते येऊ शकेल.
त्यासाठी भाजपने निवड केली उत्तर प्रदेशची. या राज्यात पुढील वर्षांच्या सुरुवातीस निवडणुका आहेत. २०१९ साली पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी भाजपसाठी हा कौल महत्त्वाचा आहे. तेव्हा या सप्तपदीचा संदर्भ हा आगामी सत्तेसाठी आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.